थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून गेलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान भगवान थोरात (वय ९१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वृध्द पत्नीसह चार विवाहित पुत्र, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
अलिकडे राजकारणापासून दूर राहिलेले थोरात यांना गेल्या अनेक दिवसांपासून हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकाराने ग्रासले होते. प्रकृती खूपच बिघडल्यामुळे त्यांच्यावर गेल्या ११ मार्चपासून सोलापुरात एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम जीव संरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रूग्णालयात धाव घेऊन थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. परंतु अखेर शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गांधी घराण्याशी एकनिष्ठ नेता
सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे पेशाने वकील होते. ते माढा तालुक्यातील निमगाव येथील मूळ राहणारे होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले.
देशभर जनता पक्षाची लाट, थोरात निवडून आले
१९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. नंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही. पुढे १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ पर्यंत असे सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते.
इंदिरा गांधी यांच्यावर अढळ निष्ठा
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यामुळेच त्यांना लोकसभेत प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. पंढरपूर मतदारसंघात विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचे फारसे योगदान नव्हते. पंढरपूर मतदारसंघात ‘खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशा शब्दांसह मौनी खासदार म्हणून त्यांची हेटाळणी होत असे.
परंतु तरीही लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येत असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या दरबारी थोरात यांची ‘लोकप्रिय नेता’ म्हणूनच नोंद होती. त्यांनी माढा येथे जगदंबा मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी केली होती. परंतु ती थोड्याच काळात बंद पडली.
रामदास आठवले यांच्याकडून पराभव
१९९९ साली काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या. तेव्हा पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून दूर राहिले होते.
नशीबवान खासदार
देशातील मोजक्या नशीबवान राजकारण्यांमध्ये संदिपान थोरात या माजी खासदाराचे नाव घ्यावे लागेल. कोणतेही कर्तृत्व नसलेल्या या इसमाने १९ ७७ , ८० , ८४ , ८ ९ , ९ १ , ९ ६ आणि ९ ८ अशा सात वेळेस सलग २१ वर्षे पंढरपूर लोकसभा मतदारसंघाची खासदारकी भूषवली. १९७७ मध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत पंढरपूर राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे नेतृत्व योग्य उमेदवाराच्या शोधात होते. वकील असलेल्या संदिपान थोरातांनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज केला होता.
माढा तालुक्याचे रहिवाशी असलेल्या संदिपान थोरातांना केवळ ते वकील आहेत या एका कारणामुळे यशवंतराव चव्हाण यांनी उमेदवार म्हणून निवडले. देशभर आणि महाराष्ट्रभर काँग्रेस विरोधात वारे वाहत होते तरी पंढरपूर मतदारसंघाला या वाऱ्याचा स्पर्शही झाला नव्हता. त्यामुळे थोरात हे ७७ मध्ये सहजगत्या खासदार म्हणून निवडून आले . १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर संदिपान थोरात यांनी तातडीने इंदिरा गांधी यांच्या इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. इंदिरा काँग्रेस गाठणारे ते महाराष्ट्रातील पहिले खासदार होते . ही पुण्याई त्यांना १९९ ८ सालापर्यंत उपयोगी पडली. आपल्या बाजूने उभा राहिलेला पहिला खासदार याची नोंद इंदिरा गांधींनी घेतली होती.
त्यामुळे १९८० मध्ये इंदिरा काँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी मिळाली. १९८० मध्ये थोरातांच्या विरोधात होते रेड्डी काँग्रेसचे लक्ष्मण ढोबळे. यशवंतरावांचा ढोबळेंवर जीव होता. या मतदारसंघात यशवंतरावांना मानणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. तरीही इंदिरा लाटेमुळे थोरात ८० मध्ये निवडून आले . पुढे १९८४ , ८ ९ , ९ १ , ९ ६ आणि ९८ केवळ गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे थोरात यांना उमेदवारी मिळत गेली , १९८४ पासून थोरात यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात या मतदारसंघातील प्रबळ अशा मोहिते – पाटील गटाने नेहमीच विरोध केला . मात्र , त्यांच्या विरोधाला डावलण्यात आले.
थोरात हे निवडून आल्यानंतर मतदारांना पाच वर्षांनीच दर्शन द्यायचे. मौनी खासदाराबरोबरच बेपत्ता खासदार ही उपाधीही संदिपान थोरातांनी मिळवली होती. मतदारसंघातील काँग्रेसचे सर्व आमदार थोरातांना इच्छा नसतानाही पक्षादेश म्हणून मदत करत असत . सामान्य जनतेला किंमत न देणारे थोरात हे स्वपक्षीय आमदारांचीही पत्रास ठेवत नसत . त्याकाळात या मतदारसंघावर विजयसिंह मोहिते – पाटलांचे वर्चस्व होते . या वर्चस्वामुळे थोरात विनासायास निवडून येत . १ ९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर थोरातांची मक्तेदारी संपुष्टात आली. राष्ट्रवादीने या मतदारसंघातून रामदास आठवलेंना उममेदवारी दिली. थोरातांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद सोनिया गांधी पंढरपुरात आल्या . मात्र आपल्या सासूबाई इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे सोनियांना मतदारांना प्रभावित करता आले नाही. मोहिते – पाटील गटाच्या ताकदीमुळे रामदास आठवले थोरातांना पराभूत करून सहजगत्या निवडून आले . त्यानंतर थोरातांचे पाच वर्षांने होणारे दर्शनही दुर्मिळ झाले.