थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आज १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्याला कुणी तरी मूर्ख बनवतं आणि तरीही आपण चिडत नाही, हसण्यावारी नेतो असा वर्षभरातला एकमेव दिवस म्हणजे एप्रिल फूल. पण एक एप्रिल याच दिवशी का साजरा केला जातो हा मूर्ख शिरोमणीचा दिवस? काय कारणं आहेत त्यामागे? या दिवसाची काय परंपरा आहे? वाचा सविस्तर… (April Full Day)
एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया
एक एप्रिल म्हटले की, आपोआप हे गाणे आपल्या ओठांवर रेंगाळू लागते, ‘एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया’ आणि मग मनात दाटून येतात त्या असंख्य आठवणी, आठवणी ज्यांत आपण कोणाला तरी मूर्ख बनविलेले असते किंवा आपण तरी मूर्ख ठरलेलो असतो. हा मजेशीर जागतिक ‘मूर्ख दिन’ कसा चालू झाला हे आजही एक कोडेच आहे. अर्थात लोकांना मूर्ख बनविण्याची ही परंपरा कधीपासून सुरू झाली, याबाबत मतभिन्नता असली तरी काही लोक याची सुरूवात फ्रान्स तर काहीजण इंग्लंडमध्ये झाल्याचे सांगतात. ‘एप्रिल फूल डे’ला ऑल ‘फूल डे’ असेही म्हणतात.
समाजमान्यता मिळाली
बहुतेक जणांच्या मते या दिवसाचा उगम १५८२ साली फ्रान्समध्ये झाला. पोप ग्रेगरी १३ वे यांनी जुन्या प्रचलित ज्युलियन कॅलेंडरच्या जागी नवीन ग्रेगरियन कॅलेंडर वापरात आणायचे ठरविले त्यामुळे नवीन वर्षांरंभ १ एप्रिल ऐवजी १ जानेवारी ठरला. त्या काळी काही कर्मठ लोकांनी हा बदल स्वीकारायचे नाकारले तर दळणवळण, संदेशवहनाच्या साधनाच्या अभावी काही जणांपर्यंत हा बदलच उशिरा पोहोचला. जे लोक एक एप्रिललाच नवीन वर्ष साजरे करायचे त्यांना इतर जण मूर्ख ठरवू लागले व अशा रीतीने ‘एप्रिल फूल’चा जन्म झाला. तेव्हापासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘एप्रिल फूल’ बनविण्याच्या प्रथेला प्रारंभ झाला. कालांतराने ही प्रथा संपूर्ण युरोपात पसरली. पश्चिमी देशांत ‘एप्रिल फूल’ बनविण्याला समाज मान्यता मिळाली.
हा दिवस दोन प्रकारे साजरा केला जातो
प्रत्येक देशागणिक एप्रिल फूल डे साजरा करण्याची पद्धत बदलते. उदा. स्कॉटलंड मध्ये हा दिवस दोन प्रकारे साजरा केला जातो. पहिल्या दिवशी ‘हंट द गॉक’ म्हणून तर दुसऱ्या दिवशी ‘टेली डे’ म्हणून. टेली डेला माणसाच्या पाश्र्वभागावर आधारित थट्टामस्करी, चेष्टा केली जाते. उदा. ‘किक मी’ सारखा नाठाळ स्टिकर पाश्र्वभागावर चिकटविणे किंवा एखादी लांबलचक शेपटीच चिकटविणे. पोर्तुगालमध्ये या दिवशी मित्र एकमेकांवर पीठ उडवतात. इंग्लंड मध्ये या दिवशी ज्या मूर्खाना फसविले जाते त्यांना गॉब्स किंवा गॉबी म्हणतात व ज्यांच्यावर विनोद केले जातात त्यांना ‘नूडल’ म्हणतात.
दिवसभर जोक्स आणि मजेचा सिलसिला
फ्रान्स मध्ये ज्यांना मूर्ख बनविले जाते. त्यांच्यापाठी पेपरचे फिश (मासा) चिकटवले जातात व मग मोठ्याने ‘एप्रिल फिश’ म्हणून चिडविले जाते. या दिवशी हास्य विनोदाचे काही नियम नसतात, कायदा नसतो. ब्रिटन ,ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिके मध्ये एप्रिल फूल ची मजा दुपार पर्यंत चालते, तर फ्रान्स, आयर्लंड, इटली, दक्षिण कोरिया, जपान, रुस, नेदरलँड, जर्मनी, ब्राझील, कँनडा व अमेरिका इथे दिवसभर जोक्स आणि मजेचा सिलसिला चालू असतो.
ही परंपरा इंग्रजांनी आपल्यासोबत आणली
पारतंत्र्याच्या काळात इंग्रज अधिकारी त्यांच्या त्यांच्यात अशा प्रकारचा खेळ खेळायचे. पुढे इंग्रज त्यांच्या या खेळात भारतीयांनाही सामावून घेऊ लागले. भारतीयांनाही दुसर्यांना मूर्ख बनविण्याचा धंदा फार आवडला. भारतीय मनोरंजनवादी. त्यांनी हा खेळ पटकन उचलला.
अफवा पसरविण्यात, थट्टा-मस्करी करण्यात माध्यमामधले लोक पण हिरिरीने भाग घेतात. हाच ट्रेंड पुढे अमेरिका, ब्रिटनमध्येही रुळला. भारतात ही परंपरा इंग्रजांनी आपल्या सोबत आणली. पारतंत्र्याच्या काळात इंग्रज अधिकारी त्यांच्या त्यांच्यात अशा प्रकारचा खेळ खेळायचे. पुढे इंग्रज त्यांच्या या खेळात भारतीयांनाही सामावून घेऊ लागले. भारतीयांनाही दुसर्यांना मूर्ख बनविण्याचा धंदा फार आवडला. भारतीय मनोरंजनवादी. त्यांनी हा खेळ पटकन उचलला.
प्रसारमाध्यमेही याबाबतीत अजिबात मागे नाहीत
बघता बघता मूर्ख बनविण्याचा दिवस पुर्या भारत देशात साजरा केला जाऊ लागला. इंग्रज आपल्यातून निघून गेले, पण त्यांची ही विचित्र परंपरा भारतात कायम राहिली. पण ही प्रथा भारतीयांनी जशीच्या तशी आपल्या गळी उतरवली नाही. त्याला भारतीय स्वरूप देण्यात आले. प्रसार माध्यमेही याबाबतीत अजिबात मागे नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९५७ साली बीबीसीने प्रसारित केलेली बातमी. ज्यात स्विस लोक स्पॅगेटीचे पीक घेत आहेत व झाडाला नूडल्स लागल्या आहेत असे दाखविण्यात आले होते. १९८२ मध्ये ब्रिटिश दूरचित्रवाणीने ‘एप्रिल फूल’ च्यानिमित्ताने एक सनसनाटी बातमी देऊन खळबळ उडवून दिली होती. सेंटपाल संग्रहालय त्याच्या मूळ ठिकाणावरून हटवून रिजेंट पार्क मध्ये ठेवण्यात आले आहे, अशी ती बातमी होती.
तेव्हा कॉ. डांगेंनी याला विरोध केला
८० च्या दशकात एका वृत्तसंस्थेने ‘इराण-इराक दरम्यानचे युद्ध विनाअट संपले’ अशी बातमी देऊन आश्चर्यात टाकले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. कित्येकदा ‘एप्रिल फूल’ बनविण्याच्या अशाप्रकारच्या सनसनाटी बातम्यांमुळे वाईट परिणामांनाही सामोरे जावे लागले आहे. आपल्या भारतातही वृत्तपत्र माध्यमांनी त्यांचे अनुसरण केले आहे. माध्यमांच्या अशा सहभागामुळेच जेव्हा दिल्लीश्वरांनी ‘एक एप्रिल’ हा संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा दिवस ठरविला तेव्हा कॉ. डांगेंनी याला विरोध केला. कारण त्यांच्या मते लोकांना ही बातमी खोटी वाटली असती.
टीका करणार्यांची संख्याही काही कमी नाही
‘मुर्खांना इथे कुठे आलेय महत्त्व?’ असे म्हणणार्यांनाही कधी वाटलं नसेल की, त्यांच्या साठीही एक दिवस राखून ठेवला जाईल. खरे तर ‘मूर्ख दिवस’ साजरा करणार्यांवर टीका करणार्यांची संख्याही काही कमी नाही. याला सुपीक डोक्यातलं पीक असं संबोधलं जातं. परंतु, हा दिवस साजरा करणार्या मदोन्मतांना कशाचीच पर्वा नाही. ते आपल्या अकलेला एक दिवस सुट्टी देतात. जगातल्या सार्या समस्यांचं कारण बुद्धीमत्ता आहे. समस्यांच्या उकलीसाठी बुद्धी वापरली जाते. मग एक दिवस बुद्धीचा वापर न करता मूर्खात निघालं म्हणून काय बिघडलं? असा त्यांचा सवाल आहे.