डॉ.श्वेता येडवे दिग्दर्शित लघुपट देशात तृतीय
डिकसळ आश्रमशाळेचे शिक्षक संजय येडवे यांची कन्या
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आयुष मंत्रालय भारत सरकार व आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था जामनगर (गुजरात) यांच्या संयुक्तरित्या आयोजित केलेल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत डॉ.श्वेता येडवे दिग्दर्शित लघुपटाला तृतीय क्रमांक मिळाला.
श्वेता येडवे ह्या डिकसळ आश्रमशाळेचे आदर्श शिक्षक संजय येडवे यांची कन्या आहेत. त्या बीईएमएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोरडी तर कॉलेजचे शिक्षण जत येथे झाले होते.
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी श्वेता येडवे यांनी ‘आयुर्वेदातील सध्याच्या काळातील विरुद्ध आहार’ या विषयावर दहा मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली होती.
पिझ्झा, बर्गर हे पदार्थ त्याच बरोबर hot chocolate browni तसेच सर्व प्रकारचे मिल्कशेक याचा आयुर्वेदाने विरुद्ध आहार म्हणून समावेश केला आहे. या विरुद्ध आहार सेवनाने होणारे आजार याबद्दल या लघुपटात माहिती दिली आहे. त्याच बरोबर योग्य आहार कोणता असावा याची माहिती दिली आहे. बाहेरचे जंक फूड शरीरासाठी किती अपायकारक आहे याचे वर्णन या लघुपटात केलेले आहे.
यामध्ये कलाकार म्हणून पुष्पांजली हाडें, कांचन चव्हाण, गौरी शिंदे, सिमरन मगदूम, समीर शहा, साबीर शेख, निसार शहा, अमोल गायकवाड,संकेत कुंभार, अनंत पाटील, निखिल माकोडे या विद्यार्थ्यांनी भूमिका केली आहे.
या स्पर्धेत देशभरातून 173 हून अधिक महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. त्यातून या निर्मितीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
याकामी प्राचार्य डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. माधव पठाडे, डॉ. प्रीती रावळ, डॉ. शर्मिली पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.