खासदारकी जाऊनही इंदिरा गांधींनी देश जिंकला
राहुल गांधींना हे जमेल का?
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठे राजकीय वादळ उठले आहे. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसमध्ये आता कुठे आत्मविश्वास वाढत असताना राहुल यांच्यावरील कारवाईने सर्वजण हादरले आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष अशा घटनेला पहिल्यांदा सामोरे जात नाहीये. याही पूर्वी राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनाही अशा प्रकरणास सामोरे जावे लागले होते. (rahul gandhi disqualified as lok sabha mp)
इंदिरा गांधी यांची खासदारकी गेली
1978 मध्ये इंदिरा गांधी यांची खासदारकी गेली होती. इंदिरा गांधी (indira gandhi) यांनाही या संकटाचा सामना करावा लागला होता. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 18 नोव्हेंबर 1978 रोजी इंदिरा गांधींच्या खासदारकीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. कर्नाटकच्या चिकमंगलूरमधून पोटनिवडणूक जिंकलेल्या इंदिरा गांधी यांनी विशेषाधिकाराचा भंग केला, असा आरोप करण्यात आला होता. .
सात दिवस झाली चर्चा
इंदिरा गांधी यांच्या प्रकरणावर सात दिवस याप्रकरणावर संसदेत चर्चा झाली. त्यानंतर इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. हा खरे तर त्यांना मोठा दणका होता.
इंदिरा गांधींचं दमदार कमबॅक
आणीबाणी उठवल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व जय प्रकाश नारायण करत होते. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसला अवघ्या 154 जागांवर समाधान मानावे लागले होते. यूपी, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश यासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. स्वत: इंदिरा गांधी यांना रायबरेलीतून पराभवाचा सामना करावा लागला होता.
खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ‘डरो मत’ अशा घोषणा दिल्या आहेत. खासदारकी रद्द झाल्यानंतर इंदिरा गांधींनी दमदार पुनरागमन केले होते.
त्याशिवाय इतर दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला होता. काँग्रेसच्या पराभवानंतर मोरारजी देसाई यांचे सरकार आले अन् त्यानंतर गांधी कुटुंबाविरोधात कारवाई सुरु झाली. 1978 मध्ये संजय गांधींना अटक झाली अन् त्यांनतर इंदिरा गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यादरम्यान कर्नाटकमधील चिकमंगळूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली. इंदिरा गांधी यांनी पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला होता. या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधी यांच्याविरोधात समाजवादी नेता वीरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत 70 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवत इंदिरा गांधी संसदेत पोहचल्या, पण काही महिन्यातच त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
त्यानंतर इंदिरा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा सुरु केला. बिहारपासून ते गुजरात आणि दक्षिणेतील राज्यात इंदिरा गांधी यांनी सभा घेतल्या. या सभेमुळे काँग्रेसला उभारी मिळाली. 1980 मध्ये पक्षांतर्गत फुटीमुळे जनता पार्टीचे सरकार कोसळले अन् सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली. इंदिरा गांधींच्या समोर जगजीवन राम आणि चौधरी चरण सिंह यासारख्या दिग्गज नेत्यांचे आव्हान होते.. पण इंदिरा गांधी यांनी ही राजकीय लढाई जिंकत काँग्रेसचे पुनरागमन केले.
1980 मध्ये काँग्रेसने 529 पैकी 363 जागांवर विजय मिळवला. चौधरी चरण सिंह यांच्या पक्षाला 41 तर जनता पार्टीला 31 जागांवर समाधान मानावे लागले.
एक शेरनी सौ लंगूर
खासदारकी रद्द झाल्यानंतर संसदेतून इंदिरा गांधी बाहेर पडत होत्या, तेव्हा काँग्रेस खासदारांनी ‘एक शेरनी सौ लंगूर, चिकमंगलूर-चिकमंगलूर’ अशी घोषणाबाजी केली.
45 वर्षानंतर पुनरावृत्ती
आता 45 वर्षानंतर सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णायामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ‘डरो मत’ अशा घोषणा दिल्या आहेत. खासदारकी रद्द झाल्यानंतर इंदिरा गांधींनी दमदार पुनरागमन केले होते, राहुल गांधी आजीने केलेला करिश्मा करणार का? असा सवाल आहे.
राहुल गांधींना तुरुंगवास होणार?
मानहाणी केस प्रकरणात सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा वरील न्यायालयाने रद्दबातल ठरवली नाही तर त्यांना शिक्षा भोगण्याशिवाय पर्याय नसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे
प्रादेशिक पक्षांना इशारा
राहुल गांधींना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेमुळे राजकीय वातावरण भयभीत झाले आहे. पंतप्रधानांच्या विरोधात बोलाल तर तुमचा राहुल गांधी होईल, अशी शाब्दिक रेटारेटी त्यांच्या समर्थकांतून होऊ शकते.
हेही वाचा