गुन्हेगारी

पत्रकारांसमोरच माजी खासदार आणि आमदाराला गोळ्या घालून केले ठार

प्रयागराज येथे गुंडाराजचा थरार

Spread the love

अतीकचे संपूर्ण जीवन गुन्हेगारीने व्यापले होते. गुन्हेगार आणि राजकारणाच्या इशाऱ्यावर तो नाचला. त्याने अब्जावधींचे साम्राज्य उभे केले. गुंडगिरीतून कायदा खिशात घालून तो वावरला. १९६२ मध्ये अलाहाबादच्या धूमनगंजमध्ये जन्मलेल्या अतीकचे वडील गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यामुळे गुन्ह्याचा त्याला वारसा मिळाला होता. त्यातच तो लहानाचा मोठा झाला.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी रात्री कुख्यात गुंड तथा माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ तथा माजी आमदार अश्रफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पत्रकारांना बाईट देत असतानाच पत्रकाराच्या वेशात आलेल्या दोघांनी अगदी जवळून डोक्याला पिस्तूल लावून या गुंडांचा खात्मा केला. अतिक अहमद-अश्रफ अहमद यांची हत्या करणारे तीनही हल्लेखोर प्रयागराज जिल्ह्यातले नव्हते. हल्लेखोर हे प्रयागराज बाहेरचे असून ते गेल्या ३ दिवसांपासून रेकी करत होते. कालही तिन्ही हल्लेखोर येथे आले होते जिथे आज ही घटना घडली. UPSTF तीनही हल्लेखोरांची चौकशी करत आहे. या घटनेने देशात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Atiq Ahmed & his brother Ashraf Ahmed were shot dead while they were being taken for medical examination in Prayagraj.)

काही तासांपूर्वी मुलाचे एन्काऊंटर
अशरफ आणि अतिक याच्या हत्येच्या काही तासांपूर्वी अतीक अहमदचा मुलगा असद यालाही यूपी पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. शनिवारीच अतिकचा मुलगा असद याला दफन करण्यात आले होते. मुलाच्या दफनविधीच्या काही तासांनंतर, अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली.

माफिया अतिक अहमद याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केले होते.

25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांचा भरदिवसा खून केल्याचा आरोप झाला. 28 फेब्रुवारी 2006 रोजी, राजू पाल खून खटल्यातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला त्याच्या साक्षीशी संबंधित प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावली. 2007 मध्ये अतिकने सोनिया गांधी यांच्या नातेवाईकाची मालमत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, पीएमओच्या नाराजीनंतर ताबा सोडला.

2012 मध्ये 10 न्यायाधीशांनी त्याच्या खटल्याच्या सुनावणीपासून स्वतःला दूर केले. 2018 मध्ये अतिक अहमदवर लखनऊमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला देवरिया तुरुंगात नेऊन मारहाण केल्याचा आरोप होता. यूपीच्या तुरुंगात असतानाही अतिक तुरुंगातूनच आपला गुन्हेगारी व्यवसाय चालवत होता. अतिक अहमदवर कारवाई करण्यासाठी त्याला गुजरातमधील साबरमती कारागृहात हलवण्यात आले.

पंतप्रधानांविरोधात निवडणूक
2019 मध्ये अतिक अहमद याने वाराणसीमधून पंतप्रधान मोदीं विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. गुजरातच्या साबरमती कारागृहातूनही अतिकच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नाहीत. 24 फेब्रुवारी 2023 रोजी राजू पाल खून प्रकरणाचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्यासह त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोन हवालदारांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर झाला.

हल्लेखोरांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट
अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर प्रयागराजमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे व कलम 144 लागू करण्यात आले असून काही भागात लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. SWAT कमांडो फोर्स, PAC, RAF आणि इतर जिल्ह्यांमधून देखील पोलिसांना रवाना करण्यात आले आहे. प्रयागराजच्या चकिया भागात दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची माहिती हाती येत आहे. प्रयागराजमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

घटनास्थळी हल्लेखोरांनी सोबत आणलेला कॅमेरा आणि बुम माईक पडली होती.

अतिक : आमदार, खासदार… अब्जाधीश
अतीकचे संपूर्ण जीवन गुन्हेगारीने व्यापले होते. गुन्हेगार आणि राजकारणाच्या इशाऱ्यावर तो नाचला. त्याने अब्जावधींचे साम्राज्य उभे केले. गुंडगिरीतून कायदा खिशात घालून तो वावरला. १९६२ मध्ये अलाहाबादच्या धूमनगंजमध्ये जन्मलेल्या अतीकचे वडील गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यामुळे गुन्ह्याचा त्याला वारसा मिळाला होता. त्यातच तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यावर १९७९ मध्ये पहिला खटला चालवला गेला. तो पुढे राजकारणात उतरला. २७ व्या इ वर्षी आमदार झाला. त्याच्यावर १०० हून जास्त गुन्हे दाखल आहेत. ४४ वर्षांत पहिल्यांदा त्याला उमेश पाल अपहरण प्रकरणात जन्मठेप झाली. त्याच्या गँगचा क्रमांक २२७ होता. राजकारण – गुन्हेगारी जीवन जगणाऱ्या अतीकने कोट्यवधींची माया जमवली होते.

डझनभर राज्यांत त्याने पाय पसरलेले होते. खंडणी, अनेक प्रकारची कंत्राटे यातून त्याने अब्जावधी रुपये कमावले. उमेशपाल हत्याकांडनंतर त्याची ४१५ कोटींची संपत्ती जप्त झाली. एकूण २३६८ कोटी रुपयांचा आर्थिक तडाखा देण्यात आला.

पत्रकारानं सांगितल्या प्रत्यक्ष घडामोडी!
दरम्यान, प्रयागराजमध्ये घडलेल्या या सगळ्या थरारक घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी अनुभव पीटीआयचे पत्रकार पंकज श्रीवास्तव यांनी सांगितला आहे. “प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफला मेडिकल चेकअपसाठी आणलं होतं. माझ्यासोबत अजून काही पत्रकार होते. आम्ही त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी अचानक अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. अतिक अहमद आणि अशरफ दोघं जमिनीवर पडले. ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला. आम्हालाही थोडी जखम झाली”, असं श्रीवास्तव म्हणाले.

किमान १५ ते २० गोळ्या झाडल्या गेल्या. ३ ते ४ हल्लेखोर होते. आमच्या एका सहकाऱ्यानं मला धक्का दिला. त्यामुळे मी खाली पडलो आणि गोळी माझ्या डोक्यावरून निघून गेली. त्यामुळे माझा जीव वाचू शकला. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे. आत्तापर्यंत दोन पिस्तुलं ताब्यात घेण्यात आली आहेत”, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.

पाहा कशा झाडल्या गोळ्या

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका