गुन्हेगारीताजे अपडेट

दोघा गुंडांना ठार करणारा लवलेश होता हनुमान भक्त, भजनेही करायचा

वडिलांचे हात वर, आईचा विश्वास बसेना

Spread the love

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला आणि माजी खासदार राहिलेल्या गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अजीम ऊर्फ अशरफ अहमदची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या झाली. यातील तिन्ही आरोपी हे सर्वसामान्य घरातील आहे. आपली मुले असा मर्डर करू शकतात यावर त्यांच्या पालकांचा अजूनही विश्वास बसत नाही.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
माफिया डॉन तथा माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा माजी आमदार अशरफ अहमद यांच्या मारेकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. तीन आरोपींपैकी एक असलेल्या लवलेश तिवारी (रा. बांदा) यांच्या वडीलाने लवलेश हा अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे सांगून त्याच्यासोबत आमचे संबंध नव्हते स्पष्ट केले. त्याच्या आईने मात्र मुलाच्या नशिबाला दोष देत हनुमानभक्त असलेला, भजने म्हणणारा मुलगा असे वागू शकणार नाही, असा दावा करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

शनिवारी संध्याकाळी प्रयागराजमधील रुग्णालयाबाहेर तीन सशस्त्र तरुणांनी गोळीबार करून दोन गुंडांची हत्या केली होती. लवलेश तिवारी (बांदा), सनी (हमीरपूर) आणि अरुण (कासगंज) अशी तिघांचीही नावे आहेत. आता या दोघांची हत्या करणाऱ्यांबाबत बरीच माहिती समोर येत आहे.

वडिलांशी जमत नव्हते
शूटर लवलेश तिवारी हा बांदा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी तो घरी आल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पत्रकारांना सांगितले.

मीडियाशी बोलताना लवलेशचे वडील यज्ञ तिवारी हे आपल्या मुलावर नाराज असल्याचे दिसून आले. लवलेश हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असं त्याच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

परोपकारी स्वभावाचा : लवलेशची आई
लवलेशची आई आशा तिवारी यांना आपल्या मुलाबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. धार्मिक स्वभावाचा असलेला लवलेश असे कृत्य करू शकतो यावर त्याच्या आईचा विश्वासच बसत नाहीये. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशा तिवारी म्हणाल्या, ‘तो हनुमानचा परम भक्त होता, हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय तो चहाही घेत नव्हता. तो भजन म्हणायचा, भजन मंडळीतही जायचा. पण, त्याच्या नशिबात काय लिहिले होते माहित नाही. तो परोपकारी स्वभावाचा होता, आपलं काम सोडून तो नेहमी इतरांची मदत करत राहायचा.

आता त्याच्या नशिबात काय लिहिले आहे माहित नाही’. हे सांगताना त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. मुलाला अखेरचे कधी भेटले असं विचारलं असता आशा देवी म्हणाल्या, ‘एक आठवडा झाला तेव्हापासून त्याच्यासोबत काहीही बोलणं झालं नाही. त्याचा फोनही बंद असायचा’

कोण आहे लवलेश तिवारी?
लवलेश तिवारी याने १२ वी पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. यापूर्वीही तो एका गुन्ह्यात तुरुंगात गेला होता आणि सुमारे दीड वर्ष तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. सध्या अतिकच्या मारेकऱ्यांची पोलिस चौकशी करत आहे. हत्येच्या हेतूबाबत त्याने सांगितलं की, मोठा माफिया बनण्यासाठी त्याने अतिक आणि अशरफची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे.

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींचा समावेश असून त्यापैकी लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे. अरुण मौर्य हा कासगंजचा, तर तिसरा आरोपी सनी हा हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

अरुण उर्फ कालिया कोण आहे?
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद दोघांची शनिवारी रात्री तीन शूटर्सनी हत्या केली. हत्येनंतर तिन्ही हल्लेखोर हात वर करून पोलिसांना शरण आले. या हत्याकांडात सहभागी असलेल्या शूटर्सपैकी एक यूपीच्या कासगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. जीआरपी पोलिसांच्या हत्येप्रकरणी तो यापूर्वीच तुरुंगात गेला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो कासगंजच्या बाहेर गेला होता. (Who is Arun aka Kalia, the shooter who shot Atiq and Ashraf?)

प्रयागराजच्या धुमनगंज मेडिकल कॉलेजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर गोळीबार करणारा शूटर अरुण मौर्य हा कासगंजमधील बघेला पुख्ता गावचा रहिवासी आहे. गावात तो अरुण मौर्य उर्फ ​​कालिया या नावाने ओळखले जायचा. अरुण लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो मोठा झाल्यावर सोरोन शहरात जाऊन राहू लागला.

2014-15 मध्ये, कासगंज बरेली-फर्रुखाबाद रेल्वे मार्गावर उजयनी आणि सोरोन दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये दरोडा टाकल्यानंतर एका कॉन्स्टेबलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अरुण तुरुंगात गेला. त्यानंतर त्याचे तार गुन्हेगारांशी जोडले गेले आणि तो गुन्हेगारीच्या जगात वावरत गेला. अरुणला दोन लहान भाऊ देखील आहेत, ते फरीदाबादमध्ये राहतात आणि रद्दीचे काम करतात.

अरुणची आई सविता आणि वडील हिरालाल दोघेही आता या जगात नाहीत. अरुण मौर्य यांची मावशी लक्ष्मी देवी आणि काका गावात राहतात. मावशी लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, तो आठ वर्षांपूर्वी सोरोनमध्ये राहण्यासाठी आला होता. त्यानंतर तो आजतागायत कासगंजला आला नाही. तो गावात यायचा, पण कोणाशी बोलत नसे. प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येची बातमी मिळताच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सनी सिंहवर १५ गुन्हे दाखल
सनी सिंह हा हमीरपुर जिल्ह्यातील कुरार येथील राहणारा आहे. त्याच्यावर जवळपास १५ गुन्हे दाखल आहेत. सनीचा भाऊ पिंटूने सांगितलं की, १० वर्ष झालं तो घरी आला नाही. सनीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, सनीच्या एका भावाचाही मृत्यू झाला आहे. तर, पिंटू हा चहाचे दुकान चालवतो.

अरुण मौर्यने पोलीस कर्मचाऱ्याचा केलाय खून
कासगंज येथील सोरों पोलीस ठाण्याच्या परिसरात अरुण मौर्य हा राहत होता. अरुणच्या आई-वडिलांचा १५ वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तर, अरुणला दोन छोटे भाऊ आहेत, त्यांचं नाव धर्मेंद्र आणि आकाश आहे. अरुणने जीआरपी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याचा खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला.

लवलेशने भोगली तुरुंगवासाची शिक्षा
लवलेश तिवारी हा कोतवाली येथील क्योतरा परिसरातील राहणार आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं, लवलेशसी त्यांचा काहीही संबंध नाही. तो कधीतरी घरी येत-जात होता. लवलेशवर ४ गुन्हे दाखल आहेत. लवलेशने एकाप्रकरणात एक महिना तुरुंगवासही भोगला आहे. दुसऱ्या प्रकरणात एका मुलीला चापट मारल्यामुळे त्याला दीड वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तिसरे प्रकरण दारूशी निगडीत आहे.

 

हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका