- प्रा. ज्योती वाघमारेंना कामगारांनी दिले आशीर्वाद
- तब्बल १७ हजार ९ जणांची झाली आरोग्य तपासणी
- चक्क पोलीस उपायुक्त बनल्या डॉक्टर
सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेनेच्या बुधवारी सतनाम चौक येथे झालेल्या आरोग्य शिबिराने सर्व विक्रम मोडले. या शिबिरात तब्बल १७ हजार ९ जणांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पोलीस उपायुक्त आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. दिपाली काळे यांनीही काही रुग्णांची तपासणी करुन कामगारांना सुखद धक्का दिला.
शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, सोलापूर महानगपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर समन्वयक दिलीप कोल्हे, संयोजिका आणि शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले तुकाराम मस्के, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संयोजक प्रियदर्शन साठे, मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम, मोची समाजाचे अध्यक्ष विजय मरेड्डी उपस्थित होते.
या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, बालरोग तपासणी, विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार, दात, नाक, कान, घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग तपासणी, इसीजी, रक्तदाब, मेंदूच्या विविध तपासण्या, मधुमेह तपासणी, आवश्यक रक्त चाचण्या करण्यात आल्या. या शिबिरात एकूण ६० प्रकारच्या तपासण्या आणि औषधोपचार करण्यात आले.
यावेळी तपासणी, औषधोपचारासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कोपलवार, अभिजीत भंडारे, आशिष परदेशी, दीपक पाटील, समर्थ मोटे, भीम वाघमारे, अभिषेक म्हेत्रे, मोहन जंगम, लखन म्हेत्रे, मच्छिंद्र लोकेकर, अर्जुन शिवसिंगवाले आदींनी परिश्रम घेतले.
अभिजीत भंडारे यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर विजय मरेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले.
शासकीय योजना मिळाली नाही तरीही होणार शस्त्रक्रिया : प्रा. शिवाजी सावंत
सोलापुरात शिवसेनेतर्फे सुरू असणाऱ्या महाआरोग्य शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ज्यांना शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे अशा नागरिकांवर शासकीय योजनांमधून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ज्या शस्त्रक्रियांना शासकीय योजना लागू होणार नाहीत अशा शस्त्रक्रिया सीएसआर फंडाच्या माध्यमातून केल्या जातील, असे यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थित कामगारांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.