पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांचे आवाहन

मुंबई : विशेष प्रतिनिधी
देशातला शेतकरी सुखी समाधानी व्हावा, त्याला शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी – बियाणे, औषधे, औजारे, खते एकाच ठिकाणी माफक आणि मुबलक प्रमाणात मिळावी यासाठी पंतप्रधान किसान सुविधा केंद्रे देशभरात उभारण्यात आली आहेत. देशात अशी तब्बल दोन लाखांहून अधिक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा शुभारंभ आज २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी केले आहे.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे म्हणाले की, शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि कृषी सेवा पुरवणे हे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यामागे केंद्र सरकारचे मुख्य कारण आहे. बी – बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी गोष्टी योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
शेती उपयोगी गोष्टींबरोबरच शेतकरी शेती तज्ञांशी देखील संपर्क साधू शकतात. किसान समृद्धी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी एकत्रित व्यासपीठ आहे. इथे शेतकरी खरेदी – विक्रीसह विम्याचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण देखील करून देण्यात येईल. मातीच्या परीक्षणासोबतच शेतकऱ्यांना किसान समृद्धी केंद्रामध्ये तज्ञांचा सल्ला मिळवून देण्यात येण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती येथे मिळेल. खते, औषधे, किटकनाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल. टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. किटकनाशके, औषधे, बियाणे तसेच स्प्रेयर सारख्या वस्तू उपलब्ध होतील.

मोफत सल्ला आणि बाजारभाव कळेल
शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत, कोणत्या पध्दतीने घ्यावीत यासाठीचे मार्गदर्शन मिळणार आहे. कोणत्या बाजारपेठेत कोणत्या मालास काय दर आहे त्याची माहिती येथे मिळेल. पीक विमा योजना, हवामानाची माहिती, ड्रोन वापराची माहिती अशी वेगवेगळी माहिती या केंद्रातून शेतकऱ्यांना दिली जाईल.
तज्ञांचा सल्ला मिळेल
शेती क्षेत्राशी संबंधीत वेगवेगळ्या विषयातील तज्ञ, कृषी संशोधक, वैज्ञानिक यांच्याकडून विक्रेत्यांना मार्गदर्शन केले जाईल. खताचा योग्य प्रमाणात वापर कसा व्हावा, पिकाच्या वाढीमध्ये कोणते पौष्टीक घटक आवश्यक असतात, पिकावर रोग पडल्याची लक्षणे, माती परिक्षणानुसार खत वापराचे नियोजन, सेंद्रीय खतांचा वापर आणि फायदा , जैविक खतांचे फायदे, नॅनो फर्टीलाईझर याबाबतची माहिती वैज्ञानिक, संशोधक आणि तज्ञांकडून विक्रेत्यांना दिली जाईल.
सध्या देशभरातील एक लाखाहून अधिक खत विक्री केंद्रांचे रूपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आलेले आहे. आज २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान मधून देशभरातील योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी केले आहे.