सांगोला आगाराला कोणी वाली आहे का?
विद्यार्थ्यांना नाहक त्रास; तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर मिळते बस
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला आगाराचा कारभार सध्या आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय असा झाला आहे. येथे कोणाचा कोणालाच मेळ नाही. त्यातत भरीला भर म्हणजे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी तालुक्यातील त्यामुळे तर जादाच त्रासदायक. अशातच आगारप्रमुखाला “मी श्रेणी दोनचा अधिकारी. मला कशाला एसटी संदर्भात तक्रारी विचारता?” याचा गर्व. त्यामुळे सांगोला तालुक्यातील घेरडी, पारे, हंगीरगे, डिकसळ, नराळे व हबिसेवाडी येथील 100 ते 120 विद्यार्थ्यांना सहा तासाचा प्रवास एसटीच्या गैरसोईमुळे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजता गेलेली लेकर सायंकाळीं पाच वाजता घरी पोहचत आहेत.
“प्रवाशांच्या सेवेसाठी” ही बिरुदावली मिरवणाऱ्या एसटी सेवेची सांगोला तालुक्यात खूपच मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. चौकशी कक्ष नावालाच आहे. सकाळी 11:30 वाजताची सांगोला-नराळे बस कधीच वेळेवर सोडली जात नाही. 12:30 वाजताची सांगोला-जत बस तर हिला वेळापत्रकच नाही. साडे अकराची नराळे दोन वाजता तर साडे बाराची जत 3 वाजता सांगोला आगारातून सोडली जाते. याबाबत विचारला केली असता कोणीच ताकाला तूर लागू देत नाही. याचा सर्व त्रास शालेय मुलांना अन् मुलींना होत आहे.
वरील सर्व गावांचे सांगोल्यापासूनचे अंतर 35 ते 45 किलोमिटर इतके. सकाळी उपाशी गेलेली मुलं दिवसभर प्रवासाने व्याकूळ होत आहेत. पण कोणीच दाखल घेत नसल्याने यांचे शाळा शिकणेही जिकिरीचे झाले आहे. विकासाच्या गप्पा मारणारे नेते सांगोल्यातील एसटीच्या गैरसोय बाबत कोणीच दाखल घेत नाहीत. कारण नेत्यांचा एसटी प्रवासाचा संबंध नाही. त्यामुळे दुखणं कसं समजणार? त्यातच भरीला भर म्हणजे आगारप्रमुखाचा मी पणा येथे आड येत आहे.
यातील 12:30 वाजातांची एसटी सेवा तर 50 वर्षापासूनची आहे .पण हिला ना टाइमटेबल. हीच गाडी अ वर्गातील उत्पन्न ही 15 हजाराच्या पुढे देते. त्याच नंतर पुन्हा 5:30 ही गाडी याच मार्गावर दुसरा फेरा करीत असते. मात्र, पहिलाच फेरा वेळेवर जात नसल्याने दुसरा फेरा मुक्कामी सांगोल्यातून रात्री 7 वाजता सुरू होतो. त्यावेळेला शालेय मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होते. तर या सर्व बाबींची शहानिशा करण्यासाठी गेले असता थातुरमातुर उत्तरे दिली जातात. तक्रार पुस्तिका दिली जात नाही.
याबाबत सांगताना सतीश कोरे म्हणाले की, माझ्यासह माझ्या भावाची मुलगी सांगोला येथे अकरावीचे शिक्षण घेत आहे. सकाळी सहा वाजता घरून जातात. कॉलेजचे टायमिंग 7:30 ते 11:30 वाजेपर्यंतचे. मात्र, एसटीची सेवा चांगली नसल्याने मुलींना घरी येण्यास 4 ते 5 वाजतात. याच आमच्या लेकरानी कुणाकडे दाद मागायची?
याबाबत सांगताना शिवाजी भंडारे म्हणाले की, माझीही मुलगी 11 वी सायन्सला संगोल्यात शिक्षण घेते. पण कॉलेज चार तासांचे अन् प्रवास सहा तासांचा अशी अवस्था आहे. कोणीच दाद घेत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व पालक मिळून सांगोला आगारप्रमुखाला जाब विचारणार आहोत.
सांगोला आगारातील आगारप्रमुखाच्या त्रासाला वैतागून आम्ही आता विभाग नियंत्रक सोलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यातूनही मार्ग निघाला नाही तर आगार प्रमुखाला घेराव घालून जाब विचारणार असल्याचे रासपचे राज्य सरचिटणीस सोमा मोटे यांनी सांगितले.
सांगोला आगारातील या सततच्या गैरसोईमुळे आता या सर्वच गावातील पालक हैराण झाले असून येत्या दोन दिवसात सुधारणा झाली नाही तर आगारातच येवून आंदोलन तसेच आगारप्रमुख हटाव मोहीम राबवणार असल्याचे अनेक पालकांनी सांगितले.
म्हणे मी क्लास टू अधिकारी
सांगोला आगाराचा कारभार हाकणारा आगारप्रमुख हा कोणाचे म्हणणे ऐकून घेत नाही. तर हा कनिष्ठ दर्जाच्या तालुक्यातच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऐकून मनमानी प्रमाणे कारभार करीत आहे. उलट “मी क्लास टू अधिकारी आहे, मला कशाला एसटीच्या तक्रारी सांगता?”, असेही म्हणतो. चौकशी कक्षातून योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे तर सांगोला आगाराचे तीन तेरा झाले आहेत. अशा या अकार्यक्षम अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून याला घरी बसवावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस सोमा मोटे यांनी विभाग नियंत्रक सोलापूर यांच्याकडे केली आहे.
जनावरापेक्षा ही वाईट अवस्था
आमच्या डिकसळ गावाकडे सांगोल्याहून येण्यासाठी दिवसभरातून दोनच गाड्या आहेत. पण या दोन्हीही गाड्यांना ना टाइमटेबल. तीन – चार तासांच्या प्रतिक्षेनंतर एसटी लागली की जनावरांसारखी मुलांची गर्दी होते. त्यामुळे मुलींचे खूप हाल होते. पण कोणीच दखल नाहीत.आता आम्ही एसटीची सुविधा मिळत नसल्याने मुलींचे शिक्षण बंद करावयाचे का? यात सुधारणा झाली नाही तर याच आगारप्रमुखांचा साडीचोळी देवून आमच्या भागातील मुलींच्या हस्ते सत्कार करणार आहोत. आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या सांगोला तालुक्यात खूपच वाईट अवस्था आहे, असेही सतीश कोरे यांनी सांगितले.
सांगोला-नराळे ही सकाळी 11:39 वाजताची एसटी दुपारी 2 वाजता सोडली जाते. तर सांगोला-जत ही दुपारी 12:30 वाजताची एसटी 3 वाजता सोडली जाते. त्यामुळे शिक्षणासाठी असलेल्या मुलींना नाहक त्रास सोसावा लागतो. हीच गाडी नंतर 5:30.वाजता घेरडी-पारे-डिकसळ मार्गे सोडली जाते. पण पहिलाच फेरा वेळेत जात नसल्याने पुढील सेवाही मिळत नाही.यावेळीही रात्री मुलींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
कर्मचारी म्हणतायेत साहेब चांगला
सांगोला आगारातील अनेक कर्मचारी म्हणतातेय “साहेब चांगले आहेत” पण त्यांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी तथा वाहतूक नियंत्रक ही मनमानीप्रमाणे काम करीत आहेत. हीच मंडळी तालुक्यातील स्थानिक आहेत. त्यामुळं मला कोण काय करतंय? याच आविर्भावात असतात. त्यामुळे आम्हाला डूटयीला जातानाही 2 ते 3 तास आगारात बसावे लागते. हे असे घेरडी, पारे डिकसळच मार्गावर वारंवार घडत आहे.
साडेबाराच्या गाडीचे रोजच तीनतेरा
सांगोला आगारातून 12:30 वाजता सांगोला-जत ही गाडी घेरडी, पारे, डिकसळ मार्गे गेली 50 वर्षापासून धावत आहे. पण गेली कित्येक महिण्यापासून याच गाडीला टाईमटेबल नाही. 2 ते 3 वाजलेनंतर ही गाडी सोडली जाते. त्यानंतर याच गाडीचा दुसरा फेरा सायंकाळी याच मार्गावरून साडे पाच वाजता असतो. पण पहिलाच फेरा वेळेवर जात नसल्याने दुसऱ्या फेऱ्यालाही टाईमटेबल नाही. ही गाडी अ वर्गातील आहे. या गाडीचे दिवसाचे उत्पन्नही 12 ते 15 हजार रुपये असते. पण नियोजनाचा बोजवारा उडाल्याने या गाडीची वाट लागली आहे. त्यामुळे शालेय मुले, मुली तसेच अन्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
दुसऱ्या मार्गावर गाड्याच गाड्या
सांगोला आगारातून दिवसभरातून अकलूज आणि पुण्यासाठी कित्येक गाड्या धावतात. पण तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र सेवा देण्यात हे आगार कमी पडीत आहे. गाड्या नाहीत हे कारण सांगितले जाते. काही वेळापूर्वी आगारप्रमुख निसार नदाफ यांना शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. तालुक्यातील जनतेला सेवा द्या. शालेय मुलांना त्रास देवू नका. इथून पुढे असे झाले तर आगाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.