थिंक टँक स्पेशलराजकारण

सांगोल्यात शेकापही बंडखोरीच्या वाटेवर

डॉ. बाबासाहेब देशमुखांना स्वकीयांकडून आव्हान

Spread the love

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे वादळ घोंगावत असतानाच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सांगोला तालुक्यातही शेकापमध्ये बंडखोरीची लागण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला तालुक्यात पक्षातीलच मातब्बर नेत्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या नातवाला आव्हान दिले आहे. आमदार होण्याच्या नादात पक्ष विकू नका. पक्षात हुकूमशाही सुरू असून जिरवाजिरवीचे राजकारण कराल ते खपवून घेतले जाणार नाही. प्रसंगी आम्ही वेगळा विचार करू शकतो असे सांगत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.

शनिवारी सांगोल्यात शेकापमधील विविध नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थेट नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य बाबासाहेब कारंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, माजी उपसभापती संतोष देवकते, शाहू मेटकरी, हणमंत कोळवले, अमोल खरात, कोकरे सर यांच्यासह विविध गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सावे (ता. सांगोला) येथे शनिवारी तालुक्यातील अनेक नेतेमंडळी व विविध गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शेकापचे सध्या नेतृत्व करीत असलेले डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांना थेट इशारा दिला.

 

सावे (ता. सांगोला) येथे शनिवारी तालुक्यातील अनेक नेतेमंडळी व विविध गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

शिवसेना, राष्ट्रवादी नंतर शेकाप?
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे वादळ घोंगावत असतानाच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सांगोला तालुक्यातही शेकापमध्ये बंडखोरीची लागण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी माजली आहे. त्याचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता शेकापमध्येही अंतर्गत खदखद उफाळून आली आहे.
राज्यात शिवसेना फुटीचे वादळ शमते तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) फुटीचा धुरळा उडाला. आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न राज्यभरात चर्चिला जात असतानाच एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षालाही बंडखोरीची लागण होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

सावे येथे आयोजित बैठकीत सर्व प्रमुख नेते मंडळींनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर सडकून टीका केली. भाई गणपतराव देशमुख हे आजारी असताना त्यांच्या शेवटच्या प्रवासात तुम्ही कुठे होता असा सवाल उपस्थित केला आहे.

स्वार्थासाठी आघाडी आणि तडजोडी
शेकापचे ज्येष्ठ नेते बाबा कारंडे म्हणाले, प्रसंगी पक्ष विकू पण आम्हाला आमदार व्हायचे हीच सध्या काहींची भूमिका दिसून येत आहे. काहींच्या स्वार्थासाठी आघाडी आणि तडजोडी करण्याच्या नादात पक्षाचे नुकसान होत आहे. जातीपातीचे राजकारण केले नाही आणि करणार नाही ही आबासाहेबांची शिकवण आहे. मात्र, अन्याय खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

आबासाहेबांच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कुठे होता?
माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले, शेकापमधे जातीयवाद वाढला आहे. तो नाही संपला तर पक्ष संपायला वेळ लागणार नाही. असेच नेतृत्व कायम राहिले तर कधीच आपला पक्ष सत्तेत येणार नाही. आबासाहेबांच्या शेवटच्या दिवसात तुम्ही कुठे होता? असा थेट सवालही त्यांनी केला आहे.

पक्षामध्ये आज हिटलरशाही
पंचायत समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काटकर म्हणाले की पक्षामध्ये आज हिटलरशाही निर्माण झाली. फोटो वरूनही पक्षातफळी निर्माण होत असून भविष्यात आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकतो.

आमदारकीचाही व्यवहार कराल
पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष देवकते म्हणाले, राज्यात पुत्रप्रेम आणि रक्ताच्या वारसाला प्राधान्य देण्याच्या नादात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था झाली, असा आरोप त्यांनी केला. आपला पक्ष शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा प्रबळ नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा याची जबर किंमत मोजावी लागेल.

संतोष देवकते पुढे म्हणाले की, माणगंगा साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडीमध्ये निश्चितपणे व्यवहार झाला आहे. हे कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत व्यवहार करत असतील तर उद्या आमदारकीचाही व्यवहार करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. आता कशासाठी कोंबडं झाकून ठेवताय. दोन महिने थांबणार आहे, जर मस्ती केली तर सोडणार नाही, असा इशारा देवकते यांनी दिला.

पक्षातच जिरवा जिरवी सुरू आहे
या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सध्या शेकाप पक्षातच जिरवा जिरवीची भाषा सुरू आहे. नेतृत्वच पक्षात जिरवा – जिरवीची भाषा करीत असेल तर पक्ष वाढेल कसा?- अशी चिंता मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

शेकापला आत्मचिंतनची गरज
भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षात खदखद उफाळून येताना दिसत आहे. पक्ष एकसंघ ठेवण्याची जबाबदारी नवीन नेतृत्वावर असताना त्यात ते अपयशी ठरताना दिसत आहेत. यावर शेकापला आत्मचिंतनची गरज आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका