सांगोल्याच्या तहसीलदारपदी संजय खडतरे
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोल्याच्या तहसीलदारपदी संजय खडतरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे तहसीलदार अभिजित पाटील यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या जागी संजय खडतरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय खडतरे हे पुणे येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे ते मूळचे सांगोला येथील आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाकडून नुकतेच काढण्यात आले आहेत.
सांगोला तालुक्यातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे कार्य नूतन तहसीलदार संजय खडतरे साहेब यांच्या हातून घडेल असा आशावाद बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केला.
नूतन तहसीलदार संजय खडतरे यांनी यापूर्वी सांगोला तहसील कार्यालयात विविध पदांवर काम केले आहे. सामाजिक जाणीव असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सांगोला येथील मसणजोगी कुटुंबातील एका मुलीला दत्तक घेऊन तिचे शिक्षण पूर्ण केले. तसेच मोठ्या थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. स्वतः कन्यादान केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जडणघडण
तहसील कार्यालयात शिपाई म्हणून काम करणार्या आपल्या स्वर्गवासी पित्याच्या अकाली निधनामुळे कुटूंबातील सदस्यांची होणारी उपासमार व हालअपेष्टा टाळण्यासाठी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली कारकून पदाची नोकरी स्विकारुन मोठ्या जिद्दीने, कष्टाने आणि स्वकर्तृत्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, “तहसीलदारांच्या शिपायाचा मुलगा तहसीलदार” होण्याची किमया सांगोला शहरातील संजय खडतरे यांनी करुन दाखविली आहे.
सांगोला शहरातील खडतरे गल्ली येथील रहिवासी असलेले कै.भगवान हरिबा खडतरे हे सांगोला तहसील कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत होते. तुटपुंज्या सरकारी पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना प्रचंड हाल व यातना भोगाव्या लागत होत्या. प्रपंचाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी त्यांना सुट्टीच्या दिवशीही छोटा-मोठा उद्योग व व्यवसाय करावा लागत होता. परंतु त्यांनी परिस्थितीशी दोन हात करत हार न मानता आपला संसार नेटाने चालवला. पत्नी, दोन मुली, दोन मुले असा मोठा परिवार सांभाळताना त्यांनी मुलांना शिक्षणासाठी कधीही कांही कमी पडू दिले नाही. परंतु, शिपाई म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवाने निधन झाले.
अचानकपणे उदभवलेल्या या कटू प्रसंगामुळे खडतरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोन बहिणी,लहान भाऊ व आई या सर्वांची जबाबदारी संजय खडतरे यांच्यावर येवून पडली.त्यामुळे, स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून व पुढील आयुष्याची स्वप्ने बाजूला ठेवून वडिलांच्या जागेवर अनुकंपाखाली ते शासकिय सेवेमध्ये रुजू झाले.
जीवनाचा खडतर प्रवास
सांगोला येथे नोकरी करत असताना अगदी खडतरे आडनांवाप्रमाणेच त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास सुरु होता. अल्प पगारात घरखर्चाचा मेळ बसेना म्हणून त्यांनी स्टेशन रोडवरील टपरीवजा दुकानात ‘पायल फुटवेअर’ या नावाने छोटा चप्पलचा व्यवसाय सुरु केला.त्यांच्या कष्टाला, धडपडीला व प्रयत्नाला हळूहळू वाट मिळू लागली होती. कुटूंबियांच्या सक्रिय पाठबळावर त्यांनी तालुक्यातील पहिलाच प्रयोग म्हणून कमलापूर जवळील औद्योगीक वसाहत येथे बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन रेडीमेड चपला बनविण्याचा कारखाना सुरु करण्याचे धाडस केले.
अल्पावधीतच त्यांची ही उत्पादने जिल्हाभर लोकप्रिय होवून त्यांच्या या धाडसाला फुटवेअर क्षेत्रात चांगलेच यश मिळाले. व्यवसायाची व्याप्ती वाढल्याने ती जबाबदारी आपल्या धाकट्या लहान भावावर सोपवून दरम्यानच्या काळात त्यांनी स्वतःच्या, बहिणींच्या व भावाच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली.स्वतःचे राहिलेले अर्धवट शिक्षण व भविष्याची पाहिलेली स्वप्ने ही त्यांनी नोकरी,व्यवसाय व प्रपंच सांभाळत करत पूर्ण केले. तसेच प्रशासनाच्या खात्यांतर्गत परीक्षा देऊन त्यामध्येही त्यांनी उज्वल यश संपादन केले.
महसूल खात्यात त्यांनी आजपर्यंत सांगोला,मंगळवेढा व मोहोळ तालुका येथे मंडल अधिकारी म्हणून कांही काळ सेवा केली.त्यानंतर पुणे येथील मावळ तहसील व पुणे शहर येथे नायब तहसीलदार म्हणून काम केले असून त्यांना नुकतीच तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांची दोन्ही मुलेही उच्चशिक्षित असून मुलगा परदेशात शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी आयर्लंड मधील कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असून तेथेच स्थायिक झाला आहे. तर,मुलगी पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला आहे. अशारितीने,जिद्दीने,कष्टाने आणि स्वकर्तृत्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, “तहसीलदारांच्या शिपायाचा मुलगा तहसीलदार” होण्याची किमया सांगोला शहरातील संजय खडतरे यांनी करुन दाखविली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सांगोला तहसीलदार पदावर संजय खडतरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.