सांगोला बाजार समिती निवडणुकीत आठ अर्ज अवैध
शेकापला फाईट देण्यासाठी मोठी फिल्डींग
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. यंदा प्रथमच शेकापला फाईट देण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील, भाजप, शिवसेना नेते एकत्र आले आहेत. शेकाप या निवडणुकीत एकाकी झुंज देत आहे. तिसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने स्वतंत्रपणे उमेदवार दिले आहेत. (Sangola bajar samiti election)
या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी एक अर्ज नामंजूर तर आठ अर्ज अवैध असे १२७ अर्ज वैध झाले झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दिली.
सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची बुधवारी छाणणी झाली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात झालेल्या छाननीत दाखल १३६ पैकी १२७ अर्ज वैध ठरले. तर एका उमेदवाराचा अर्ज नामंजूर ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दूरगुडे यांनी जाहीर केले.
अर्जातील व जातीच्या दाखल्यावरील नावात बदल असल्याने सुनिता भजनावळे यांचा अर्ज अवैध झाला. शेतकरी व रहिवासी असल्याचा दाखला न जोडल्याने शशिकांत गडहिरे यांचा अर्ज अवैध झाला. उचित दाखला न जोडल्याने तानाजी कवठेकर यांचा अर्ज अवैध झाला.
व्यापारी व ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती या दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज असल्याने सुरज बनसोडे यांचा एक अर्ज अवैध झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखला नसल्याने संजय पाटील यांचा अर्ज अवैध झाला. शेतकरी असल्याचा दाखला नसल्याने विमल मिसाळ यांचा अर्ज अवैध झाला.
जमिनीचे क्षेत्र कमी असल्याने सविता मोहिते यांचा अर्ज अवैध झाला. दोन मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रावर एकच सूचक व अनुमोदक असल्याने तानाजी खांडेकर यांचा अर्ज अवैध झाला.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागा असून सर्वसाधारण गटातून ७ जागेसाठी ५५ अर्ज, महिला गटातून २ जागेसाठी ९ अर्ज, इतर मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी ५ अर्ज, इतर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून एका जागेसाठी १० अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागा असून सर्वसाधारण गटातून २ जागेसाठी २७ अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी ६ अर्ज, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून एका जागेसाठी २ अर्ज दाखल झाले आहेत.
व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी १० अर्ज तर हमाल व तोलार मतदारसंघात एका जागेसाठी ३ अर्ज असे १८ जागेसाठी १२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
रंगीत तालीम
येत्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. वर्षभरातच विधानसभेचीही पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील सत्तास्थाने आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्ष झपाटून कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेतकरी कामगार पक्षानेही या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.
हेही वाचा
सांगोल्यात खा.शरद पवारांच्या हस्ते होणार आ. रविंद्र धंगेकरांचा सत्कार