पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती
सोलापूर, दि.२४- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी बुधवारी केली.
बुधवारी दुपारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. यास सर्वांनी मान्यता दिली. नियुक्ती झाल्यानंतर नूतन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. गौतम कांबळे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांचे बीए, एमए, एम फिल, पीएच. डीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पूर्ण झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील २४ वर्षे अध्यापनाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. ग्रामीण विकास, सामाजिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचे अर्थकारण या विषयावर त्यांचे विशेष अभ्यास व संशोधन आहे. प्रशासकीय कामाचाही संचालक व विभाग प्रमुख म्हणून त्यांना सहा वर्षाचा अनुभव आहे. त्यांचे अनेक शोध निबंध व पुस्तके प्रकाशित आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी पूर्ण केलेली आहे व पाच विद्यार्थी पीएचडी करत आहेत. मलेशिया आणि फिनलँड परदेश अभ्यास दौरा देखील त्यांचा पूर्ण झालेला आहे. डॉ. कांबळे यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद विद्या परिषद परीक्षा व मूल्यमापन मंडळ या सर्व अधिकार मंडळांवर त्यांनी काम केलेले आहे. त्यांचे ५ संशोधन प्रकल्प पूर्ण झालेत. अशा अभ्यासू व तज्ञ प्राध्यापकाची विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून डॉ. कांबळे यांच्या रूपाने निवड झाल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी सांगितले. नवीन विद्यापीठ सुधारणा कायद्यानुसार निवड झालेले डॉ. कांबळे हे पहिलेच प्र-कुलगुरू ठरले आहेत.
प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी यापूर्वी विद्यापीठाच्या विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. उत्तम प्रशासकीय जाण असलेले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे.