जुनी पेन्शनसाठी ३ नोव्हेंबरला दिल्लीत धरणे आंदोलन
२००५ नंतर सेवेत आलेल्या देशातील १.५ कोटी कर्मचाऱ्यासाठी हे आंदोलन : डॉ. आर. बी. सिंह
सोलापूर : २००५ नंतर शासकीय आणि निमशासकीय सेवेत आलेल्या देशातील १.५ कोटी आणि महाविद्यालय व विद्यापीठातील ७.५ लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर ३ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही प्रमुख मागणी मान्य झाली नाही तर देशाबरोबरच राज्यातील सत्ताधारी पक्ष हा सत्ताधारी राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय महाविद्यालय व विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी दिला आहे.
महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडून मान्य झाल्याने कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरच्या वतीने कृतज्ञता मेळावा छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये झाला. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथपाल नागनाथ नवगिरे होते. डॉ.सिंह म्हणाले, ” हे आंदोलन महाराष्ट्रातील १८ लाख कर्मचाऱ्यांसाठीही आहे.
कॉन्ट्रॅक्ट नेमणूक पद्धत रद्द करा. तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील क्लस्टर कॉलेज, खासगी कॉलेज व परदेशी विद्यापीठ यामुळे शिक्षकेतर कर्मचारी आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर मोठा अन्याय होणार आहे. छोट्या शाळा व छोटी महाविद्यालय बंद झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार? त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणाविरुद्धही हे आंदोलन आहे. भारतातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी यूजीसीच्या कक्षेत आणण्यासाठीही आमचा लढा केंद्रशासनाकडे कायम आहे.”
दिवाळीपूर्वी सातव्या वेतन आयोगाचा फरक
दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे चार हप्ते मिळतील. तसेच प्रलंबित असलेली प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चितीही लवकरच होईल. १०,२०,३० हा कालबध्द पदोन्नतीचा आणि कमीत कमी ५० टक्के नोकर भरतीचा शासन निर्णय वर्षाअखेर निघण्यासाठी राज्य महासंघ प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष राजा बढे यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजा बढे, उपाध्यक्ष मेघराज पंडित, माधव राऊळ, खजिनदार अनिल लबरे आदी उपस्थित होते.
युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी प्रास्ताविक केले. युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, खजिनदार राहुल कराडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, सिद्धेश्वर स्वामी, आण्णा गवळी, शशिकांत दूनाखे, हणमंत खपाले, जयश्री ताई माने-देशमुख व सुरेश वाघमारे यांनी त्यांचे स्वागत केले. दत्तात्रय पवार यांनी सूत्रसंचालन केले. इमाम लालका यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.