आज गटारी उत्सव, मोफत कोंबडीचे वाटप होणार!
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
यंदा गटारी अमावास्या सोमवारी येत असल्याने अनेकजण आज रविवारीच गटार उत्सव साजरे करण्याच्या बेतात आहेत. अशातच कोंबडी प्रेमींसाठी एक तिखट न्यूज आहे. भाजपकडून गटारी निमित्त मोफत कोंबडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.
मुंबईच्या प्रभादेवीत लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका बॅनरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गटारी अमावस्येनिमित्त कोंबडी वाटप, अशा आशयाचा हा बॅनर होता. १५ जुलै सायंकाळी सहा वाजता प्रभादेवी नाका येथे हे कोंबडी वाटप केलं जाणार असल्याचा दावा या बॅनरवर करण्यात आला होता.
संपूर्ण महाराष्ट्रात गटारी अमावास्या ही एका उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. गटारी अमावास्येनंतर लगेचच श्रावण महिना सुरू होत असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार करत नाहीत. त्यामुळे गटारीच्या दिवशी अनेकजण मनसोक्तपणे मांसाहारावर ताव मारतात. यावर्षी सोमवारी गटारी अमावास्या असल्याने बहुतांश लोक हे रविवारीच हा उत्सव साजरा करणार आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून या मेसेजमध्ये मोफत कोंबडी वाटप करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
गटारीच्या निमित्ताने मोफत कोंबडी वाटप होत असल्याने हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. ‘सेवा हेच संघटन’ असा उल्लेख करुन अमावस्येनिमित्त कोंबडी वाटप करण्यात येणार असल्याचा एक बॅनर मुंबईत झळकला होता. त्या बॅनरवर मोदी-शाह यांच्यासह राज्यातील नेत्यांचे फोटो होते. फ्लेक्सवर भाजपचा स्पष्टपणे उल्लेख केला असला तरी तो बॅनर लावला कुणी, याबद्दल माहिती मिळाली नाही.
भारतीय जनता पार्टीच्या कोकण विकास आघाडीच्या नावाने सध्या सोशल मीडियावर ‘ गटारी ‘ निमित्त मोफत कोंबडी वाटप कार्यक्रमाचा मेसेज व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता मुंबईतील प्रभादेवी नाका येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्हायरल मेसेजमध्ये काही आयोजकांची नावे देखील देण्यात आली आहेत. यात मुंबई सचिव सचिन शिंदे, भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर, चेतन देवळेकर यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यात पंतप्रधान नरंद्र मोदी, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील वापरण्यात आले आहेत. मात्र, हा मेसेज आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपने यू – टर्न घेतला आहे.
आयोजक म्हणतात मी नव्हेच
या संदर्भात पत्रकारांनी आयोजक सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , गेली कित्येक वर्ष दादर माहीम विभागात कार्यरत असून पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे . काही खोडसाळ प्रवृत्तींनी माझी प्रतिमा खराब. करण्यासाठी कोंबडी वाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमात माझ्या फोटोचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे . अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम घेण्यास मी सांगितले नव्हते.
या मोफत कोंबडी वाटपाच्या कार्यक्रमाला माझा कोणताही पाठिंबा किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. मी स्वतःही या प्रकाराची चौकशी करत आहे. तसेच ज्यांनी कोणी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे, त्यांना योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तरी आपणास माझी नम्र विनंती आहे की, सदर माहिती ही खोटी असून त्या पद्धतीचे मेसेज फॉरवर्ड करणे थांबवावे. मी एक सामाजिक जाणीव जोपासणारा जबाबदार व्यक्ती असून सदरहू उपक्रमात माझे नाव, फोटो गोवण्यात आल्याने माझी प्रतिमा खराब होत आहे. दादर माहीम विभागात मी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तसेच इतर क्षेत्रात युवा, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. आपण माझ्या या विनंतीचा सन्मान राखाल ही अपेक्षा…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बॅनरची शहानिशा करायला म्हणा की मग मोफत कोंबडीच्या आशेने म्हणा काही मंडळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता वरळी नाका येथे पोहोचलीच. पण दुर्दैवाने त्यांच्या हाती कोंबडीच्या ऐवजी निराशाच आली. कोणा अज्ञाताने खोडसाळपणा म्हणून हा बॅनर लावल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं.