आंबेडकरी चळवळीच्या इतिहास लेखनाची गती वाढवा
योगीराज वाघमारे यांचे प्रकाशन सोहळ्यात आवाहन
सोलापूर : प्रतिनिधी
सध्या देशात इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन केले जात आहे. आपणास सोयीचा असणारा, खोटा इतिहास लिहिला, पसरवला जात आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी लेखकांनी चळवळीचा इतिहास नेटाने पुढे आणावा, लोकांपर्यंत पोहचवावा आणि जतन करावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले.
कवी चंद्रकांत मागाडे लिखित आणि थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित “सूर्य कोपणाऱ्या विस्तवाच्या प्रदेशात” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आंबेडकरी नेते अजितभाऊ गायकवाड, कामगार नेते अशोक जानराव, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सारीपुत्र तुपेरे, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. एम. डी. शिंदे, पत्रकार डॉ. बाळासाहेब मागाडे उपस्थित होते. हा कार्यक्रम बौद्धांचा दानमय बुद्धविहार, रमापती चौक येथे झाला.
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे पुढे म्हणाले की, इतिहासातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळत असते. मागच्या पिढीतील इतिहास वाचून अनेक पिढ्या आपली वाटचाल करीत असतात. शालेय अभ्यासक्रमातून महापुरुषांचा इतिहास हद्दपार झाला आहे. चुकीच्या व्यक्तींचे उदात्तीकरण केले जात आहे. अशा स्थितीत आंबेडकरी साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. आंबेडकरी चळवळीतील हिरे प्रकाशझोतात नाही आणले तर ती माणसे विस्मृतीत जातील. तसे झाले तर नवीन पिढी माफ करणार नाही. चंद्रकांत मागाडे यांनी आपल्या झाडूवाल्या आईच्या आयुष्याचा संघर्ष या काव्यसंग्रहात मांडला आहे.
सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. एम. डी. शिंदे म्हणाले की, ड्रेनेज साफ करताना दर सहा महिन्याला चार – दोन कामगार मरतात. त्यांना कोणतीही साधने दिली जात नाहीत. कोणत्या युगात आपण राहत आहोत? कामगार मेले की पाच – दहा लाखांची मदत देवून त्याच्या आयुष्याची किंमत केली जाते. अशा दुर्घटना घडल्या की अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी होते. मात्र गुन्हा दाखल कोण करणार? पोलिसांनीच स्वतः असे गुन्हे दाखल करावेत. चंद्रकांत मागाडे यांनी स्वच्छता कामगारांचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे.
सुप्रसिध्द समीक्षक डॉ. सारीपुत्र तुपेरे म्हणाले की, आई या विषयावर अनेकांनी लिहिले. मात्र झाडूवाल्या आईवरील कवितांचा हा एकमेव काव्यसंग्रह असावा. चंद्रकांत मागाडे यांच्या कविता वास्तवदर्शी आहेत. रुपकांचा वापर अत्यंत चपखलपणे केला आहे. उन्ह, वारा, पाऊस, थंडी हे ऋतू झाडूकाम करणाऱ्या महिलांना किती त्रासदायक ठरतात त्याचे चित्रण केले आहे. मागाडे यांच्या कविता आभासी प्रतिमांची मांडणी करत नाहीत. आपण जे भोगले, अनुभवले तेच त्यांनी कवितेत मांडले आहे. कष्टकरी आईवर कविता लिहून नारायण सुर्वे यांनी एक मार्ग तयार केला. त्याचे रूपांतर आता महामार्गात होताना दिसत आहे.
कामगार नेते अशोक जानराव म्हणाले की, महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे दुःख जवळून पाहिले, अनुभवले. महापालिकेत स्वच्छतेचे काम सर्वाधिक लोक मागासवर्गीय आहेत. ही बाब भूषणावह नाही. मात्र पर्याय उभा करण्याची ताकद नसल्याने अनेकांनी हा व्यवसाय स्वीकारला. अनेक झाडूकाम करणाऱ्या महिलांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. अनेक मुले चांगल्या पदांवर काम करत आहेत.
लोकप्रिय नेते अजितभाऊ गायकवाड म्हणाले की, चंद्रकांत मागाडे यांनी हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन घडविले आहे. त्यांच्या आईने आयुष्यभर झाडू घेऊन शहर स्वच्छ करण्याचे काम केले. अत्यंत कष्टातून आपले कुटुंब उभा केले. त्यांच्या आईच्या व्यथा मांडण्याचे काम या काव्यसंग्रहात केले आहे. चंद्रकांत मागाडे यांनी पुढील काळातही समाजाला दिशा देणारे लेखन करावे. मी त्यांच्या पाठीशी आहे.
यावेळी कवी चंद्रकांत मागाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी तर सूत्रसंचालन नागसेन माने यांनी केले.