थिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

शहाजीबापूंना राष्ट्रवादीच पाडणार!

अरुण आसबे यांनी केला निश्चय

Spread the love

ट्रान्सफार्मरसाठी पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक लोकांना अंधारात ठेवून ट्रान्सफार्मरच्या कामाचे उद्घाटन आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शेळवे गावात दणक्यात झाले. ट्रान्सफार्मरच्या कामाच्या उद्घाटनाचे फोटो व माहिती आ. शहाजीबापू पाटील यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रसारित करण्यात आली. या कामात सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या अरुण आसबे यांनी एका व्हिडिओद्वारे आ. शहाजीबापू पाटील यांच्या या कृतीचा निषेध केला. त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहेत.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोल्याचे लोकप्रिय आमदार, “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम शहाजीबापू पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं केलाय. “केवळ पोकळ आश्वासने देवून फसविणाऱ्या या नेत्याचा “टप्प्यात कार्यक्रम करू” असा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस तथा माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू समर्थक अरुण आसबे असे त्या नेत्याचे नाव आहे. (Sangola MLA Shahajibapu Patil)

त्याचे झाले असे की, दोन दिवसांपूर्वी सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शेळवे (भाळवणी) या भागात दोन विद्युत ट्रान्सफार्मरचे उद्घाटन केले. वस्तुस्थिती अशी आहे की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस तथा माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू समर्थक अरुण आसबे यांनी 16/3/2022 रोजी महाविकास आघाडी मधील तात्कालीन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील शेळवे, खेडभाळवणी, उपरी या गावातील अतिरिक्त भार असणाऱ्या ठिकाणी व आवश्यक असणाऱ्या ठिकाणी सात डीपींची मागणी केली होती. (Nationalist Congress party)

त्यावेळी तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री यांनी “मागणी केलेल्या ट्रान्सफार्मरसाठी इस्टिमेट बनवून जिल्हा नियोजनमधून मंजुरी घ्यावी” असे रिमार्क मारून महावितरणला पत्र दिले होते. त्या अनुषंगाने महावितरणचे अधिकारी यांनी हे इस्टिमेट बनवून कार्यकारी अभियंता पंढरपूर यांच्यामार्फत अधीक्षक अभियंता श्री. सांगळे यांना सादर केले.

दिनांक 8/6/22 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे या ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शिफारस करण्यासाठी व मंजूर निधी मंजूर करण्यासाठी पत्र दिले होते. त्यावर पालकमंत्री यांनी सात डीपीसाठी मान्यता दिली व त्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

राष्ट्रवादीचे नेते अरुण आसबे

7/12/22 रोजी सातही डीपीसाठी टेक्निकल मंजुरी देऊन कामाला मंजुरी देण्यात आली. या सर्व डीपीची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांचा सर्व पाठपुरावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या भागातील जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही केला असल्याचे अरुण आसबे यांचे म्हणणे आहे.

बापूंनी डायरेक्ट केले उद्घाटन
ट्रान्सफार्मरसाठी पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक लोकांना अंधारात ठेवून ट्रान्सफार्मरच्या कामाचे उद्घाटन आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शेळवे गावात दणक्यात झाले. ट्रान्सफार्मरच्या कामाच्या उद्घाटनाचे फोटो व माहिती आ. शहाजीबापू पाटील यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रसारित करण्यात आली.

या कामात सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या अरुण आसबे यांनी एका व्हिडिओद्वारे आ. शहाजीबापू पाटील यांच्या या कृतीचा निषेध केला. त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहेत.

सदर व्हिडिओत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस तथा माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू समर्थक अरुण आसबे म्हणाले की, “आ. शहाजीबापू पाटील जरी आपण याचे उद्घाटन केले असले तरी मला यामध्ये कोणत्याही प्रकारची खंत नाही. कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंजूर केलेल्या कामाचा नारळ तुम्ही फोडत असाल तर आपण काय कामे केली याचा जाब किंवा याचे उत्तर तुम्हाला जनतेला द्यावे लागेल.”

ते पुढे म्हणाले की,
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम जनतेच्या प्रश्नासाठी कटिबद्ध राहिलेला आहे तुमच्यासारखी बोगसगिरी करण्यात आम्ही कधीही धन्यता मानत नाही.”

“त्या” १५ गावांवर मुद्दाम अन्याय
“ पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील एकूण पंधरा गावे सांगोला विधानसभा मतदारसंघात जोडण्यात आली आहेत. आ. शहाजीबापू पाटील यांनी नेहमीच या १५ गावांवर मुद्दाम अन्याय केला आहे. NRBC च्या पाणी वाटपात या १५ गावातील शेतकऱ्यांना मुद्दाम त्रास दिला जातो. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. दूजाभाव करणारा असला लोकप्रतिनिधी असण्यापेक्षा विना लोकप्रतिनिधींचे मतदार म्हणून राहायला आम्हाला काहीच कमीपणाचे वाटणार नाही” अशी टीका अरुण आसबे यांनी केली आहे.

स्व. गणपतराव देशमुखांच्या कर्तृत्वाला कलंक
आ. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेताना अरुण आसबे म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांनी अत्यंत आदर्शवादी पद्धतीने सांगोला तालुक्याचे नेतृत्व केले. विरोधकही त्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत द्यायचे. सभागृहात त्यांची भाषणे महत्त्वपूर्ण होती. असा आदर्शवादी राजकारणाचा वारसा असलेल्या सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आ. शहाजीबापू पाटील करत आहेत. हे या मतदारसंघातील जनतेचे दुर्दैव असल्याची टीका अरुण आसबे यांनी केली.

टप्प्यात कार्यक्रम करू
आगामी विधानसभा निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. आ. शहाजीबापू पाटील यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सहकार्य केलेले त्यांचे सहकारीही त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील यांचा “टप्प्यात कार्यक्रम करू ” असा खणखणीत इशारा अरुण आसबे यांनी दिला आहे.

एक कोटी कशाला दोन कोटी घ्या!
आ. शहाजीबापू पाटील यांच्या मजेशीर कार्यपद्धतीवर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते अरुण आसबे म्हणाले की, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे मतदारसंघात गेल्यावर लोकांना वेड्यात काढतात. एखाद्या ओढ्यावर एखाद्याने पूल बांधण्याची मागणी केल्यावर आ. शहाजीबापू पाटील हे ” या कामाला किती खर्च लागेल?” असे अधिकाऱ्यांना विचारतात. त्या अधिकाऱ्याने “१ कोटी खर्च येईल” असे सांगितल्यावर “एक कोटी कशाला? दोन कोटी घ्या” असे आश्वासन ते देतात. २ कोटीच काय २ रुपयेही त्या कामासाठी मिळत नाहीत. टक्केवारीच्या राजकारणामुळे सांगोला तालुक्याचा विकास खुंटला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अरुण आसबे यांनी केला आहे.

आ. शहाजीबापू पाटील यांना चॅलेंज
राष्ट्रवादीचे नेते अरुण आसबे म्हणाले की, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील एकूण पंधरा गावे सांगोला विधानसभा मतदारसंघात जोडण्यात आली आहेत. आ. शहाजीबापू पाटील यांनी नेहमीच या १५ गावांवर मुद्दाम अन्याय केला आहे. एनआरबीसीच्या पाणीवाटपातही या गावावर सातत्याने अन्याय झाला आहे. आपण आमदार झाल्यापासून या पंधरा गावांसाठी प्रत्येकी किती निधी दिला आहे. किती कामे केली आहेत. त्याची आकडेवारी जाहीर करावी, असे चॅलेंज राष्ट्रवादीचे नेते अरुण आसबे यांनी दिले आहे.

दोन-दोन पोलिस गाड्या कशाला?
राष्ट्रवादीचे नेते अरुण आसबे म्हणाले की, “आ. शहाजीबापू पाटील हे मतदारसंघात भेटीसाठी जाताना त्यांच्यासोबत मागे एक आणि पुढे एक अशा पोलिसांच्या दोन गाड्या असतात. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. आ. शहाजीबापू पाटील असे कोण व्यक्ती आहेत की, त्यांना पोलीस संरक्षण घेण्याची गरज वाटते.? ते कोणाला घाबरतात?” असा सवालही अरुण आसबे यांनी केला.

कोण आहेत अरुण आसबे?
अरुण अशोक आसबे हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस या पदावर काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच राष्ट्रवादीच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते समजले जातात. त्यांनी स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्यासमवेत पंढरपूर भागात पाणी प्रश्नावरही काम केले आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत.

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील उमद्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अरुण आसबे यांनी “जयंत चषक क्रिकेट” स्पर्धेचे मागील महिन्यात आयोजन केले होते. त्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. अरुण आसबे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतही जवळचे संबंध आहेत.

अरुण आसबे यांनी आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर केलेल्या या टीकेला आ. शहाजीबापू हे कोणते प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सांगोला भागात प्रचार करू : आसबे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप चांगले संबंध आहेत. मागील निवडणुकीत पक्षातीलच काहीजणांकडून याला हरताळ फासण्यात आला. असे असले तरी २०१९ च्या निवडणुकीत आम्ही भाळवणी गटातील १५ गावामधून शेकापच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळवून दिले आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार आम्ही शेकापला मोठी ताकद देवू. मी स्वतः सांगोला तालुक्यातील गावांमध्ये प्रचार करणार असल्याची माहिती अरुण आसबे यांनी “थिंक टँक”शी बोलताना दिली.

अरुण आसबे यांचा व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका