कोरड्याठाक म्हैसाळ योजना पाहणीचा फार्स
कामेच अपूर्ण असतानाच केली गंडवागंडवी
सांगोला/नाना हालंगडे
शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यातच बंधिस्त पाईपलाईन मोठ्या प्रमाणात आहेत. अशातच या विभागाच्या एसीने काल डिकसळ येथे पाहणीचा दौरा केला. पण पाहणी करतानाही ही लाईन सुरू आहे का? की नुसताच डेमो होता हे पहावयास मिळाले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. त्यामुळे हा पाहणी दौरा नुसताच फोर्स ठरला.
म्हैसाळ योजना ही सांगोला तालुक्यातील सात गावांना उपयुक्त ठरत आहे. हेच पाणी तालुक्यातील गावांना सांगोला वितरीका क्रमांक १ व २ मधून मिळत आहे. यामध्ये वितरिका क्रमांक १ ही बांदिस्त पाइपलाईन तर २ ही पोट कॅनॉल द्वारे आहे. याच वितरिका क्रमांक १ मध्ये विस्तारित पाइपलाईन ही ३० किमीची आहे. पण यातील कामे अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी प्रमाणे केली आहेत. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. तर व्हॉल्वही नको त्या ठिकाणी बसविले आहेत.
अक्षरश: २० ते २५ हेक्टर क्षेत्र कोरडेच राहत आहे. व्हॉल्व ओढ्या मार्गातच सोडले आहेत. असे हे सर्व विदारक चित्र असताना संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांना आणून योजनेची कामे पूर्ण आहेत असाच काहीसा देखावा केला.
हे असे करीत असताना डिकसळ गावाजवळ हा कार्यक्रम असताना गावाला साधी माहितीही दिली नाही. पण बहाद्दर शेतकऱ्यानी याच अधिकाऱ्यांचे अन् ठेकेदारांचे अपूर्ण कामाचे पितळ उघडे पाडले.
डिकसळ गावात हेच विस्तारित लाईनचे जाळे पसरले आहे. अधिकारी अन् ठेकेदारांनी मनमानी प्रमाणे कामे केली आहेत. अनेक ठिकाणी चुकीचे व्हॉल्व सोडले आहेत. त्याचा शेतकऱ्याना काहीच उपयोग नाही. काल जो पाहणीचा फार्स झाला हा निव्वळ देखावा होता. याच गावातील अनेक वस्त्या यापासून वंचित आहेत. पाहणी केलेल्या लाईनचे टेस्टिंगही यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्या समोर केले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांशी संवाद न साधता एसी गाडीतून येवून, ऊन लागू नये म्हणून गोल टोपी घालून अवघ्या १० मिनिटातच इथून पळ काढला.
गरजेच्या ठिकाणी फिडरची वानवा
ज्या ठिकाणी फिडर होणे गरजेचे आहे अशा ठिकाणी फिडर नाहीत. येथे अधिकाऱ्यानी आपल्या मनमानी
प्रमाणे फिडर बसविले आहेत. त्यामुळे शेतीला पाणी मिळू शकत नाही. माझ्या शेतात फिडर बसविला आहे. तो २० फूट खड्यात आहे. अक्षरशा एक एकरही क्षेत्र भिजत नाही, असे संजय पाटील यांनी सांगितले.
मुख्य लाईनवरही दोन किमी अंतरावर फिडर नाहीत. येथील शेतकऱ्यांनी काय करायचे. ही सर्व कामे शेतकऱ्यांना विचारात न घेता, येथील अधिकाऱ्यांनी केली आहेत.
नुसता डेमोच म्हणा की?
म्हैसाळ योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी काल डिकसळ गावालगत असलेल्या वितरिका क्रमांक १ मधील विस्तारित पाइप लाइनचा पाहणी दौरा केला. पण ज्या ठिकाणी पाहणी केली त्यांच्या मागे अन् पुढे अनेक कामे अपूर्ण अन् दर्जाहीन केली आहेत. व्हॉल्वही चुकीच्या ठिकाणी बसविले आहेत. ज्या ठिकाणी पाहणी केली त्याठिकाणी चाचणी घेणे अपेक्षित होते पण असे काहीच घडले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुसताच डेमो पाहिला अन् दौरा केल्याचा फोर्स केला. पण उपस्थित शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबती केल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.