थिंक टँक स्पेशल
Trending

पै. मारुती वडार : पाकच्या महाकाय पैलवानाला धूळ चारणारा पैलवान

सरकारने वडार आर्थिक विकास महामंडळाला दिले नाव

Spread the love

पै. मारुती वडार यांच्यासारखा वडार समाजातील रांगडा माणूस कुस्तीच्या तालमीत रमला आणि वादळी मल्ल म्हणून गाजला. ६ मार्च १९६५ रोजी कोल्हापूरच्या खासबाग मैदानात मारुती वडार विरुद्ध पाकिस्तानचा भीमकाय मल्ल रफिक यांच्यातील लढतीत मारूती वडार यांनी घिस्सा डावावर रफिकला चितपट करून ते मैदान गाजवले होते. पैलवान दारासिंग, पैलवान रंधवा यांच्याबरोबरच्या त्यांच्या कुस्त्याही गाजल्या होत्या.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
पै. मारुती वडार यांची तगडी शरीरयष्टी बघण्यासारखी होती. राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना भुरळ घालणार्‍या पैलवानांपैकी मारुती वडार हे एक होते. परदेशात सलग ३६ कुस्त्या जिंकून आल्यानंतर कराडच्या या सुपूत्राचा यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्या हस्ते १९६८ ला दिल्लीत सत्कार केला होता.

हिंदकेसरी किताब पटकावणाऱ्या पै. मारुती वडार यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने “हिंदकेसरी पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ” नुकतेच स्थापन केले आहे.

त्यानिमित्त हा खास वृत्तांत..

पै. मारुती वडार यांच्यासारखा वडार समाजातील रांगडा माणूस कुस्तीच्या तालमीत रमला आणि वादळी मल्ल म्हणून गाजला. ६ मार्च १९६५ रोजी कोल्हापूरच्या खासबाग मैदानात मारुती वडार विरुद्ध पाकिस्तानचा भीमकाय मल्ल रफिक यांच्यातील लढतीत मारूती वडार यांनी घिस्सा डावावर रफिकला चितपट करून ते मैदान गाजवले होते. पैलवान दारासिंग, पैलवान रंधवा यांच्याबरोबरच्या त्यांच्या कुस्त्याही गाजल्या होत्या.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार त्यांना ओळखत. मुंबईतील वल्लभभाई मैदानातील कुस्तीवेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभिनेते धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा हे देखील मारुती वडार यांच्या कुस्ती कौशल्याने आणि भारदस्त शरीरयष्टीमुळे प्रभावित झाले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर हे मारूती वडारांचे चाहते होते.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे देखील मारुती वडार यांच्या कुस्ती कौशल्याने आणि भारदस्त शरीरयष्टीमुळे प्रभावित झाले होते.

समाजाचे लाडके आप्पा
पै. मारुती वडार यांना आप्पा या नावाने ओळखले जात असे. ते समाजाचे लाडके आप्पा होते. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत केवळ जिद्दीच्या जोरावर आप्पांनी कुस्ती क्षेत्रात जागतिक स्तरावर केलेला प्रवास थक्क करणारा आहे. आप्पा यांची ओळख कुस्तीचा लौकीक सातासमुद्रापार नेणारा मल्ल (Wrestler ) म्हणून आहे. मारुती वडार यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडकवला होता.

आप्पांना इंग्लंडला बोलावले
आप्पा यांचा लौकीक ऐकून इंग्लंडच्या स्पोर्ट असोसिएशनने त्यांना इंग्लंडला बोलावून घेतले. तेथे दोन वर्षे त्यांनी फ्री स्टाईल प्रकारच्या प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. मारुती वडार यांच्या दंड थोपटण्याच्या आणि फेटा बांधण्याच्या शैलीबद्दल परदेशातील कुस्ती शौकिनांना मोठे आकर्षण होते. तेथील प्रेक्षकांनी त्यांची आठवण म्हणून त्यांच्या फेट्याचे तुकडे जवळ ठेवून घेतले होते.

हिंदकेसरी किताब पटकावणाऱ्या पै. मारुती वडार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने “हिंदकेसरी पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ” नुकतेच स्थापन केले आहे. त्यामुळे समाजबांधव तसेच कुस्ती प्रेमीमधून आनंद व्यक्त होत आहे.

सुनील गावसकर होते मोठे चाहते
महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना लहानपणापासून कुस्तीबद्दल आकर्षण होते. त्यांना कुस्तीपटू व्हायचे होते. त्यामुळे ते कुस्तीपटू मारुती वडार यांचे मोठे चाहते होते. मारुती वडार यांना खेळासाठी लागणारे साहित्य हे सुनील गावसकर स्वतः घ्यायचे, असा किस्सा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे.

कोल्हापूरचा वाघ
पै. मारुती वडार यांच्याशी कुस्ती खेळण्यासाठी सातारा परिसरात तोडीचा मल्ल नव्हता. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर गाठले. मोतीबाग तालमीत ते कुस्तीचे धडे गिरवू लागले. कोल्हापूर, दावणगिरी (कर्नाटक), पंजाब, दिल्ली, अजमेर (राजस्थान) येथील मैदाने त्यांनी गाजवली. पाकिस्तानी मल्ल भिल्ला पंजाबी, पै. चंदगीराम, पै. मेहेरदीन यांच्यासारख्या मल्लांना त्यांनी आस्मान दाखवले.

कुस्ती मैदान जिंकल्यानंतर कुस्ती शौकिनांनी हत्तीवरून मिरवणुका काढल्या होत्या.

लहान-मोठ्या सुमारे अडीचशे कुस्त्या त्यांनी केल्या. दावणगिरी येथील मैदानात भुडन चार्लीला चितपट केल्यानंतर तसेच मुंबई, पुण्यातील कुस्ती मैदान जिंकल्यानंतर कुस्ती शौकिनांनी हत्तीवरून मिरवणुका काढल्या होत्या.

जागतिक मल्ल
जागतिक मल्लांच्या वारसा यादीत मारुती वडार यांच्या नावाची नोंद आहे. इंग्लंड, फ्रान्स, न्यूझीलंड, पाकिस्तानसह दहा देशांत आपल्या कुस्तीचे प्रावीण्य दाखवत देशाचा नावलौकिक वाढविला. परदेशात सलग ३६ कुस्त्या जिंकून आल्यानंतर कराडच्या या सुपूत्राचा यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्या हस्ते १९६८ ला दिल्लीत सत्कार घडवून आणला होता.

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस ब्रिटनच्या काउंट बार्टली या महान मल्लाला मारुती वडार यांनी कॉमनवेल्थ हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये १५ व्या फेरीपर्यंत बरोबरीत रोखले होते. मारूती वडार हे आपला मोठा प्रतिस्पर्धी असल्याचे बाली यांनी मान्य केले होते. मारुती वडार यांच्या परदेशातील तत्कालिन कुस्त्यांच्या जाहीराती आज देखील पाहायला मिळतात.

कुस्तीपंढरी कोल्हापुरच्या खासबाग मैदानाप्रमाणेच पुण्यातील डेक्कन जिमखाना मैदान कुस्तीसाठी प्रसिद्ध होते. येथेही अनेक दिग्गज मल्लांच्या प्रेक्षणीय व निकाली कुस्त्या पुणेकरांनी पाहिल्या आहेत. 27 मे 1962 ला डेक्कन जिमखान्यावर पुण्याचे एकेकाळचे प्रसिद्ध मल्ल गोविंद तारु यांनी ठेकेदाराची भूमिका बजावताना एक नंबरला रु. 4101 इनामाची, पंजाब, हरियाणा गाजवणारे पै. बंतासिंग वि. महाराष्ट्र गाजवणारे पै.मारुती वडार यांच्यात निकाली कुस्ती ठरवली. यासह इतर प्रेक्षणीय आठ कुस्त्या होत्या.

पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होणाऱ्या या मैदानाला त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती श्री. कृष्णराव तु. गिरमे अध्यक्ष म्हणून लाभले होते. पै.मारुती वडार हे कराड तालुक्यातील काले गावचे. त्यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. याच वर्षाअखेरीस झालेल्या पाचव्या हिंदकेसरी स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारताना अजिंक्यपदाच्या लढतीत मास्टर चंदगीराम यांच्याकडून पराभूत झाले. पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी परदेशात गेले. तेव्हा सलामीनंतर त्यांच्या शड्डू ठोकण्याच्या शैलीवर तेथील प्रेक्षक इतके चकीत झाले की त्यांची आठवण म्हणून त्यांच्या फेट्याचे तुकडे जवळ ठेवून घेतले. पै. बंतासिंग हे पतियाळा, पंजाबचे गाजलेले मल्ल पुण्यात कुस्ती लढण्यासाठी प्रथमच येत होते. दिल्ली येथे 1959 साली पार पडलेल्या दुसऱ्या हिंदकेसरी स्पर्धेत अजिंक्यपदाच्या अंतीम लढतीत पै. श्रीपती खंचनाळे यांना अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी झुंजविले. उत्तरेकडील दिग्गज मल्लांशी चितपट कुस्त्या करुन मोठे नाव कमावले होते.

त्यांच्या या अलौकिक कार्याची दखल घेत २००७ मध्ये क्रीडा प्रबोधिनीने मानाचा क्रीडा भूषण पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला होता. 6 मे 2011 रोजी हिंदकेसरी मारुती वडार यांचे निधन झाले.

हिंदकेसरी किताब पटकावणाऱ्या पै. मारुती वडार यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने “हिंदकेसरी पै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ” नुकतेच स्थापन केले आहे. त्यामुळे समाजबांधव तसेच कुस्ती प्रेमीमधून आनंद व्यक्त होत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका