थिंक टँक न्यूज नेटवर्क (नाना हालंगडे) : महाराष्ट्राची शान असलेल्या शाहिरी लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी पंढरपूर येथे राज्यस्तरीय शाहिरी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून १२ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सद्भावना भवन, पंढरपूर येथे रविवारी सभापती सोमनाथ आवताडे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड, लोककलावंत भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रमेश खाडे, नादखुळा लावणी ग्रुपचे संचालक गणेश गोडबोले, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर विजय व्यवहारे, लोककलावंत मंगलताई जाधव, शाहीर सचिन जाधव,परशुराम पवार कालिदास सोनावणे, अण्णा शिर्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालय आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबीर श्रीक्षेत्र पंढरपूर सद्भावना भवन येथे २० दिवस चालणार असून या शिबिरामध्ये राज्यातील, विविध जिल्ह्यातील २१ शिबिरार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ २० शाहीर २०दिवस प्रशिक्षक, व्याख्याते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन, प्रशिक्षण देणार आहेत.
आजच्या शिबिराच्या उद्घाटनानंतर व्याख्याते म्हणून ज्येष्ठ शाहीर बाळासाहेब मालूसकर, पुणे यांनी पारंपरिक शाहिरी लोककलेचे महत्त्व, शाहिरी परंपरा याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक पोवाडे सादर करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद मिळत आहे.२० दिवसांच्या शिबिराने शाहिरी लोककला जतन व संवर्धन होण्यास निश्चित प्रोत्साहन मिळेल. असे शाहिरी प्रशिक्षण शिबीराचे संचालक शाहीर सुभाष गोरे यांनी सांगितले.