सांगोल्यात आ. रवींद्र धंगेकरांचा जंगी सत्कार होणार
लोणारी समाज बांधव करणार सत्कार

- सांगोल्यात आ. रवींद्र धंगेकरांचा जंगी सत्कार होणार
- लोणारी समाज बांधव करणार सत्कार
- आदित्य ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंची उपस्थिती
सांगोला / नाना हालंगडे
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारणारे जिगरबाज आमदार रवींद्र हेमराज धंगेकर यांचा सांगोल्यात भव्यदिव्य असा सत्कार करण्यात येणार आहे. सांगोला तालुक्यात बहुसंख्येने असलेल्या लोणारी समाज बांधवांकडून याचे आयोजन करण्यात येत आहे. (MLA Ravindra Dhangekar Pune)
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व माजी पर्यावरण मंत्री विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा सत्कार कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तालुक्यात लोणारी समाजाची 90 हजारहून अधिक लोकसंख्या
सांगोला तालुक्यात लोणारी समाजाची संख्या तुलनेत मोठी आहे. तालुक्यातील 45 गावात हा लोणारी समाज विखुरलेला आहे. 90 हजार इतकी यांची लोकसंख्या असलेल्या या समाजाची राजकीय निर्णय प्रक्रियेत मोठी ताकद आहे.
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी, कष्टाळू आणि जिद्दी समाज म्हणून तालुक्यात या समाजाची ख्याती आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ. रवींद्र धंगेकर हे लोणारी समाजाचे असल्याने त्यांच्या रूपाने एक सक्षम लोकप्रतिनिधी लोणारी समाजाला मिळाला आहे. त्यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचे कौतुक करण्यासाठी या भव्य अशा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयात सांगोल्यातील बांधवांचे योगदान
राज्यात लोणारी समाजाचा दुसरा आमदार होण्याचा मान आ. धंगेकर यांनी मिळविला असून त्यांच्या विजयासाठी सांगोला तालुक्यातील लोणारी समाज बांधव पुण्यात ठण मांडून होते. आ. धंगेकर विजयात सांगोल्यातील लोणारी समाज बांधवांचे मोठे योगदान आहे.
येत्या 15 दिवसाच्या आत सांगोला शहरात हा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. याच सत्कार समारंभाच्या अनुषंगाने सांगोल्यात रविवारी लोणारी समाज बांधवांची बैठक झाली.
चारवेळा नगरसेवक
आजपर्यंतच्या ७५ वर्षाच्या इतिहासात विधिमंडळात लोणार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे आमदार रवींद्र धंगेकर हे ठरले आहेत. शिवसेनेतून रवींद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर ते मनसेत गेले. मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर पुढे ते काँग्रेसमध्ये आले. धंगेकर हे ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनसामान्यात त्यांची उंची वाढत गेली.