स्वातंत्र्याच्या चळवळीत वाणीचिंचाळे गावाचे भरीव योगदान
या चळवळीचे लोन सगळीकडे पसरले. ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना तुरुंगात डांबण्यास सुरुवात केली. त्याचा असा परिणाम झाला की यामुळे येथील विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते गिरणी कामगार, एकत्र येऊन सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध फेरी काढण्यात आली.
चले जावच्या चळवळीवेळी सांगोला तालुक्यात अकोल्याचे शामराव लिगाडे रावसाहेब पतंगे, अँड. कृष्णाजी धडपळे, नागोराव चितळे, वाणीचिंचाळे येथील सदाशिव पाटील, सिद्धगोंडा घुणे यांनी तालुक्यातील एखतपूर, जवळा, घेरडी, जुनोनी, नाझरे, वाणीचिंचाळे आदी ठिकाणी निषेध सभा व मिरवणुका घेतल्यामुळे अनेकांना तुरुंगवास भोगावे लागला.
दांडियात्रेच्या काळात सांगोला येथील अव्वल कारकून असणारे नागोराव चितळे मामा हे पहिले सत्याग्रही होते. चितळे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली 1967 साली या देशसेवेच्या कार्यात गावातील शंकर स्वामी, शंकर झाडबुके, सदाशिव पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.
सन 1937 ते 1945 या कालावधीत सांगोला तहसील कार्यालयावर चितळे (मामा) गोपीनाथ पांडे, राम कदम, टकले मास्तर, चंद्रशेखर झपके, शंकर गवळी, महादेव भंडारे, महादेव बुंजकर, चांदणे यांच्या समवेत मोर्चा काढण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण होती. कारण या चळवळीमध्ये संपूर्ण भारत व्यापला होता. सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावामध्ये स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटती राहिली. यामध्ये अनेकांना अटक झाली तर काही भूमिगत राहून ब्रिटिशांना प्रखर विरोध केला.
अखिल भारतीय काँग्रेसने अधिवेशनात ठरल्याप्रमाणे महात्मा गांधी यांच्या चलेजाव या चळवळीला बांधील राहून 1937 ते 1945 या कालावधीत गावोगाव मेळावे घेऊन गावागावातून प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. यामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, चरखा चलेंगे स्वराज्य लेंगे अशा घोषणा देत गावोगावी ब्रिटिशाविरुद्ध आंदोलन केले.
यामध्ये वाणीचिंचाळे येथून सदाशिव पाटील, रंगनाथ पवार, सिदगोंडा घुणे, शंकर स्वामी, तुकाराम पाटील, धोंडाप्पा कोळी इत्यादी कार्यकर्ते होते. सर्वजण भोसे, लेंडवेचिंचाळे, येड्राव निंबोणी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, आलेगाव या ठिकाणी आंदोलन केले व गावागावातून स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.
या चळवळीमध्ये 3×3 मापाच्या खादीच्या तुकड्यावर चले जाव, निकल जाओ, असे शिक्के मारून गायगव्हाण, वाकी, सांगोला कडलास या ठिकाणी चिटकवले. या गावांमध्ये झाडावर, देवळावर, चावडीवर चिटकवले. लोणविरे येथे चळवळीतील श्री गुलाब लोखंडे यांना सांगोला इंग्रज पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सदाशिव पाटील व महादेव बुंजकर पोलीसांना तुरी देऊन फरार झाले.
अण्णासाहेब सहस्रबुद्धे व यांचे बंधू बुवा सहस्रबुद्धे शंकरराव देव, सावित्रीबाई मदने अशा मंडळींनी सासवड येथे कार्य जिवंत ठेवण्याचे ठरवले. यामध्ये बुलेटीन छापणे, गावोगाव वाटप करणे या कामासाठी वाणिचिंचाळे येथे बुलेटीन मशीन आणले होते. मंगळवेढा येथील जानकीबाई लागू या त्याच्या मुख्य होत्या. हे मिशन माहिती होऊ नये म्हणून सदाशिव पाटील व इतर कार्यकर्ते जानकीबाई लागू यांच्या घरी खड्डा खाणून ठेवत असे. त्यावर सरपण टाकत असे. हे मशीन रात्री 12.30 वा नंतर सुरू करून छापण्याचे कार्य करत असायचे.
हे तयार केलेले बुलेटीन सुताच्या पिळामध्ये बांधून सांगोला येथे रेल्वेमध्ये चिंधीच्या गुंडाळी मध्ये बांधायचे व रेल्वेमध्ये टाकायचे. त्यावर ती लक्ष ठेवून रेल्वेमध्ये बसून बार्शी येथे डाँ. विनायक आपटे यांच्या सुलाखा या बंगल्यावर पोहोच करायचे. विनायक आपटे (बार्शी )व सदाशिव पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते.
महादेव दऱ्याप्पा बुजंकर व सदाशिव पाटील या दोघांची भेट कुर्डुवाडी येथे झाली व त्यानी ब्रिटिशाविरोधात छापलेली बुलेटीन वाटपाचे कार्य मोठ्या धाडसाने केले. पुढील काळात या चळवळीला बळ देण्याचे ठरवले.
• भूमिगत चळवळीमध्ये साताऱ्याच्या प्रतिसरकारमध्ये सहभाग :
कोल्हापूरमध्ये भूमिगत कार्यकर्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यकर्त्यासमवेत भूमिगत होऊन वाणीचिंचाळे येथे घुणे यांच्या मळ्यामध्ये या कार्यकर्त्यांना दडविले. त्यामध्ये पांडुरंग तिवारी, गणपत धडाम ,मुल्ला व जत येथील कार्यकर्ते होते. या भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांना जेवणाच्या डब्यातून गुप्त संदेश पाठवायचे काम वाणीचिंचाळे गावांमधील अनेक क्रांतिकारकांनी केले. 1945 साली साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे हरिजनासाठी मंदिर खुले केले. त्यावेळी वाणिचिंचाळे येथील सदाशिव पाटील त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी नोंदवला.
• रिलीफ योजनेमध्ये सहभाग :
सन 1947 ते 1951 या कालावधीमध्ये सुतकताईची रिलीफ योजना आली. या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचे काम येथील अनेक क्रांतिकारकांनी केले. यामध्ये सुतकताईचे कार्य केले.
• 1953 मध्ये बार्डोली येथे कार्य :
सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतण्या माधवभाई पटेल यांनी सरंजाम कार्यालयातून धुनाई मुडीया पिंजणकाम पाठविला. या दोन्ही वरती विविध प्रयोग करून हाताने फिरविण्या ऐवजी पायाच्या पायडलचा तयार करून त्याला गती देऊन कामाचा वेग वाढवला. नंतर हा चितळे मामा, गुलाब लोखंडे व सदाशिव पाटील यानी बनवलेल्या धुनाई मुडीया माधवभाई पटेल यांनी मागिवला. बार्डोली येथे काम अत्यंत सफाईने करून दाखवले. सन १९५३ मध्ये बार्डोली, बास्कोई, डरे (मध्यप्रदेश) अशा चार ठिकाणी माधव भाई पटेल यांनी मार्गदर्शन करण्यासाठी वाणीचिंचाळे येथील सदाशिव पाटील यांना नेले.
• 1954 मध्ये सुतकताई प्रदर्शनामध्ये सहभाग :
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभाई पटेल यांनी 40 दिवसाचे रामलीला मैदान दिल्ली येथे प्रदर्शन भरवले यामध्ये वाणिचिंचाळे गावातील सदाशिव पाटील यांची निवड झाली.या सूतकताई स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला.
* विनोबा भावे यांना चरखा दिला
विनोबा भावे यांनी कृष्ण दास यांची कडे चरखा मागणी केली .कृष्णदास भाई यांनी सदाशिव पाटील यांच्याकडे आठ दिवस चरखा दिला व माझ्या योग्य असा रिपोर्ट घेऊन विनोबांना सुपुर्द करण्यात आला.
1955 वाणिचिंचाळे येथे अखिल भारतीय सर्वोदय मेळावा झाला. त्यावेळी मुंबई प्रांताचे मंत्री मांजर्डेकर देशभक्त बबनराव बडवे, देशभक्त बाबुराव जोशी हे हजर राहिले हा ऐतिहासिक मेळावा झाला.
1956 तानाजी ठाकरे धुळे येथील व चितळे मामा यांनी नवीन सुतकताई केंद्र सुरू केली. यामध्ये अंबर चरखा किसान चरखा, बाज( बांबू) चरखा अशा चरख्याची निर्मिती करून लोकांना प्रशिक्षण दिले.
भिवघाटात खानापूर या ठिकाणी केंद्र केले. केंद्राखालील गावे रेणावी ,सुलतान गादे ,हिवर पळशी, जरंडी, घाटनांद्रे ढालगाव ,अशी गावी होते. यामध्ये सदाशिव पाटील व जगन्नाथ करडे यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
* 1958 भुदान चळवळीमध्ये गावाचं योगदान :
1958 साली विनोबा भावे यांची भुदान चळवळ पंढरपूर येथे झाली .यामध्ये सांगोला येथील शिवलिंग दुधने यांच्याबरोबर वाणिचिंचाळे येथील सदाशिव पाटील यांनी भूदान चळवळीमध्ये शंकरराव देव, वासुदेव चितळे ,यांच्यासह कार्य केले.
वाणीचिंचाळे गावातील या क्रांतिकारक लोकांनी इंग्रजांच्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध अनेक मार्गाने लढा देण्याचे महत्त्वाचे काम केले. हा इतिहास आपण विसरू शकत नाही.
शब्दांकन- श्रीमती. विठाबाई सदाशिव पाटील (स्वातंत्र्यसैनिक सदाशिव पाटील यांच्या पत्नी)