माढा लोकसभा शिवसेना लढणार आणि जिंकणार : प्रा. लक्ष्मण हाके

निमगाव (म.) | विशेष प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढणार आणि जिंकणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली.
माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, माढा लोकसभा हा मतदारसंघ बागायती आणि जिरायती असा समिश्र आहे. शिवसेनेला मानणारी सांगोला, माण, खटाव, फलटण तालुक्यातील जिरायती भागातील जनता कारखानदार आणि सोयीचे राजकारण करणाऱ्या दलबदलू नेत्यांना वैतागली आहे. मोहिते-पाटील असोत किंवा रणजितसिंह निंबाळकर असोत. यांना माढा लोकसभा मतदासंघातील जनतेचे काहीही पडलेले नाही.
सांगोला तालुक्यातील डाळिंब शेती असो किंवा बागायती भागातील ऊसदर, दुधदर असोत इथले लोक्रतिनिधीं उदासीन आहेत. खासदार रणजिसिंह निंबाळकर यांनी संसदेत एकदाही मतदासंघातील प्रश्नांवर तोंडसुद्धा उघडले नाही. निवडणूक तोंडावर आली की पत्रकार परिषद घ्यायची आणि कुठल्या तरी कामाचे श्रेय घ्यायचे एवढा एककलमी कार्यक्रम विद्यमान खासदार यांचा आहे.
मोहिते-पाटील गट नेहमीच कारखाने, दूध संघ वाचविणे एवढाच त्यांचा राजकीय आवाका आहे. भाजपला महाराष्ट्रातील जनता वैतागली असून दलीत, भटके विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्यांक समुदाय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. महाराष्ट्राचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण असो किंवा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. भाजपच्या विरोधात, लोकशाही वाचविण्यासठी अठरापगड जाती जमाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात भाजपला गाडल्यावाचून राहणार नाहीत असे प्रतिपादन प्रवक्ते प्रा लक्ष्मण हाके केले.
माढा तालुक्यातील भूताष्टे येथे, सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे आणि माळशिरस तालुक्यातील निमगाव (म) येथे मागील तीन दिवसांत शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले होते. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनीही वरील तिन्ही मेळाव्यात मार्गदर्शन केले. वरील तिन्ही तालुक्यात सोळा शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माळशिरस तालुका प्रमुख संतोष राऊत, सांगोला तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे, श्याम तात्या मदने, नागनाथ मगर, गोरख पवार, सचिन कदम, सोमनाथ मगर, भावसाहेब मगर, सीताराम पवार, विकास बोडरे, संभाजी अडगळे, तानाजी चव्हाण, प्रा. सतिष कुलाळ, डॉ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.