थिंक टँक स्पेशल

बापू : राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीतील ज्ञाननिष्ठ सैनिक 

प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांचा अभ्यासपूर्ण लेख

Spread the love
कळंब येथील ज्येष्ठ साहित्यिक स्मृतीशेष एफ. एन. कसबे तथा विजयानंद यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या औचित्यावर बुधवार, दि. १५ मार्च, २०२३ रोजी एफ. एन. कसबे यांच्या अनेक स्मृती जतन करणाऱ्या ‘जीवनयात्री: एक संघर्षगाथा’ या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यात या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि विचारवंत प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे, प्रा. डॉ. बाळासाहेब मागाडे (संचालक -थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर), के. व्ही. सरवदे, रमेश बोर्डेकर, पंडित कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. थिंक टँक पब्लिकेशन्स ॲन्ड डिस्ट्रिब्युशन्स या प्रकाशन संस्थेमार्फत या स्मृती ग्रंथाची निर्मिती केली असून या स्मृतीग्रंथाचे संपादन विशाल शिवाजीराव वाघमारे आणि संघरत्न फकिरचंद कसबे यांनी केले आहे. या स्मृतीग्रंथात एकूण २६ जणांनी लेख लिहून एफ.एन कसबे यांच्या जीवन कार्यावर आणि स्मृतींवर प्रकाशझोत टाकला आहे. हा प्रकाशन सोहळा शुभमंगल कार्यालय, मोहा रोड़, कळंब येथे सकाळी ११:०० वाजता होणार असून या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल वाघमारे आणि संघरत्न कसबे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत तथा लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी या ग्रंथासाठी अभ्यासपूर्ण  प्रस्तावना लिहिली आहे. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हा प्रस्तावानापर लेख प्रसिद्ध करत आहोत.. 
बापू : राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीतील ज्ञाननिष्ठ सैनिक 
स्मृतीशेष एफ. एन. कसबे हे शैक्षणिक, सामाजिक विश्वातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. एफ. एन. बापूंनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सामाजिक चळवळीला गती दिली. परिवर्तनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी अनेकांच्या मनःपटलावर स्पष्ट आणि स्वच्छ अशी स्वप्रतिमा उमटवली. ज्ञाननिष्ठा, सामाजिक निष्ठा, वाङमयीन निष्ठा आणि धर्मनिष्ठा या चार सद्गुणांनी ते सर्वांचे आदर्श ठरले. त्यांनी स्वतःच्या संपूर्ण सेवा कालावधीत असंख्य माणसे जोडली. विद्यार्थ्यांना सहकार्य केले. अनेकांच्या आयुष्याला व्रतस्थवृत्तीने स्वावलंबन दिले. स्वकर्तृत्वाने अनेकांच्या समोर आदर्श ठेवला. सामाजिक, धार्मिक व वाङमयीन कार्याचा केंद्रबिंदू ते ठरले.
आपण वावरतो त्या समाजाला एक प्रबुद्ध चेहरा अर्पण करण्याची संवेदनशील वृत्ती जोपासणारा तपस्वी, आपल्यात आज नाही. हे वास्तव स्वीकारून त्यांच्या विचारांची परंपरा पुढे घेऊन जाणे हाच ‘जीवनयात्री : एक संघर्षगाथा’ या स्मृतीग्रंथाचा उद्देश असावा असे मला वाटते.
बापूंची जीवननिष्ठा देखील पुढच्या पिढीसाठी अनुसरणीय अशीच आहे. वाचन, चर्चा, चिंतन व लेखन या ज्ञानप्रक्रियेत जसे रममाण व्हायचे तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यातही स्वत: ला झोकून द्यायचे. त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांचे नि शोधनिबंधांचे दृष्य परिणाम नव्या पिढीवर झालेले स्पष्टपणे दिसतात. त्यांच्या या बौद्धिक व समाजसुधारणेच्या कार्यामुळेच कळंब व मराठवाड्यातील अनेक भागात एक चांगले वातावरण तयार झालेले होते. त्यांच्या अढळ समाजनिष्ठेमुळे समाजबदलाचे व विकासाचे वातावरण तयार झाले. राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक प्रश्नांसंबंधी त्यांनी निर्भयपणे सातत्यपूर्ण केलेले प्रबोधन निश्चितपणे उस्मानाबाद जिल्ह्यातील परिसरात उपयुक्त, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांच्या या कार्यामुळे बापू केवळ एक व्यक्ती ठरलेले नसून एक संस्कार संस्थाच झालेले आहेत. म्हणून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि वाङमयीन क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांसाठी बापू एक मानदंड ठरले आहेत, असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपण वावरतो त्या समाजाला एक प्रबुद्ध चेहरा अर्पण करण्याची संवेदनशील वृत्ती जोपासणारा तपस्वी, आपल्यात आज नाही. हे वास्तव स्वीकारून त्यांच्या विचारांची परंपरा पुढे घेऊन जाणे हाच ‘जीवनयात्री : एक संघर्षगाथा’ या स्मृतीग्रंथाचा उद्देश असावा असे मला वाटते.
बापू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीतील एक ज्ञाननिष्ठ सैनिक होते. २६ जानेवारी १९५० ला भारताला व भारतातील लोकांना स्वातंत्र्य मिळाले. भारतातील प्रजा ही नागरिक बनली. तिला व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले. भारतीय माणसांना त्यांचा चेहरा, त्यांचे अवयव त्यांना परत मिळाले. बुद्धानंतरचा पहिला मानवी मुक्तीचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीपणे लढला नि एका बलाढ्य अशा प्रजासत्ताक भारताची निर्मिती झाली. हा पुढे आंबेडकर भारत, प्रबुद्ध भारत म्हणून ओळखला जावा यासाठी ज्ञानजागर सुरू झाला यात शेकडो भारतीयांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यात एफ. एन. कसबे बापूंचाही खारीचा वाटा आहे. राष्ट्रनिर्माणाच्या लढ्याला आपल्या खांद्यावर घेऊन, नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ज्या-ज्या व्यक्तींनी स्वीकारली त्यांच्या स्मृती सांभाळून ठेवण्याचे कार्य यापुढे निष्ठापूर्वक नि निर्व्याजपणे झाले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
प्रतिगामी समाज नि देशद्रोह्यांनी ‘सुवर्णभारत’ व ‘प्रजासत्ताक भारत’ उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले. सर्व भारतीय त्याला वेळोवेळी बळीही पडले; परंतु येणाऱ्या काळात प्रबुद्ध भारतीय युवकांनी प्रेरणादायी व मार्गदर्शक स्मृतींना जोपासण्याचे अविरत कार्य केले पाहिजे. त्या शिवाय आपले नि देशाचे अस्तित्व टिकून राहणार नाही. हे करतांना कदाचित आपला द्वेष केला जाईल, आपल्यावर बहिष्कार टाकला जाईल, आपली निंदा नालस्ती केली जाईल, आपल्या संधी नाकारल्या जातील, आपल्याला गुन्हेगार ठरविले जाईल. आपले अस्तित्वही नाकारले जाईल. मात्र हा राष्ट्रनिर्माणाचा प्रबुद्ध जागर अविरतपणे नि सातत्यपूर्ण भावनेने चालवला पाहिजे.
मी विद्यार्थी असल्यापासून कळंब शहराशी जोडला गेलो आहे. या मातीशी माझे नाते वैचारिकतेचे जसे आहे तसेच ते भावनिकतेचेही आहे. या भूमीने नव नवे विचारप्रवाह स्विकारले जोपासले नि वाढवलेलेही आहेत. एकूणच उस्मानाबाद जिल्हा हा नेतृत्वगुण असलेला जिल्हा आहे. ‘जातील तिथे नेतृत्व करतील’ हा या मातीचा गुणधर्म आहे. म्हणूनच मला बापूंचा अभिमान वाटतो. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेडकरी जाणीवेचे विश्व विकसित करण्यासाठी क्षण नि क्षण वेचला, अशा संस्कार केंद्रांच्या स्मृती जिवंत ठेवणे आवश्यक आहे. या हेतूनेच या स्मृतीग्रंथाची निर्मिती झाली असावी यात शंका नाही . त्यासाठी मी विशाल वाघमारे व संघरत्न कसबे यांना धन्यवाद देतो की त्यांनी बापूंचा हा स्मृतीग्रंथ संपादीत करून एका अविस्मरणीय कार्याची सुरूवात केली आहे. समाजातील चांगली माणसे स्मृतीशेष होत आहेत. त्याबरोबरच राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीही गतप्राण होत आहेत.
या घटनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. विचार आणि कार्य दिशाहीन बनले आहे. अशाही स्थितीत ‘जीवनयात्री : एक संघर्षगाथा’ या बापूंवरील स्मृतीग्रंथाची निर्मिती करून बापूंच्या ‘रत्नांनी’ हे कार्य हाती घेणे मला फारच मोलाचे वाटते. आज घडीला वडीलांची संपत्ती-पैसा यावरच अनेकांचे सौख्य सामावते. परंतु संघरत्न कसबे, राजरत्न कसबे, आनंद कसबे यांनी बापूंच्या विचारनिष्ठा व जीवननिष्ठांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य हाती घेऊन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. बापूंनी जो जिव्हाळा समाजमनात पेरला तोच जिव्हाळा, प्रेम त्यांच्या आप्तस्वकीयांपैकी संघरत्न, राजरत्न, आनंद, प्रा. अनिल कांबळे, बालाजी गायकवाड, आदित्य कांबळे, मयंक कांबळे, सुबोध कसबे, रत्नमाला कांबळे, पूनम गायकवाड, सुरेखा सोनवते, आम्रपाली कसबे, सीमा कसबे इत्यादी सर्वांमध्ये तो दिसतो.
या स्मृतीग्रंथाचे मुख्य संपादक विशाल वाघमारे यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते की, त्यांनी अत्यंत कौशल्याने लेखांचे संपादन केले आहे. लेखकांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे, त्यांच्याशी संपर्क करणे याबरोबरच बापूंच्या वैचारिक निष्ठांना नात्यांच्या भावनिकतेची झळ पोचू न देता तो बाज कायम ठेवला आहे. विशाल वाघमारे हे मुळातच वैचारिकतेचा साज असलेले व्यक्तिमत्व आहे. अण्णांच्या संस्कारातून त्यांची वैचारिक आणि वैज्ञानिक भूमिका विकसित झाली आहे. त्यामुळेच ‘जीवनयात्री : एक संघर्षगाथा’ हा स्मृतीग्रंथ कौटुंबिक न होता समाजासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक ठरला आहे. बापूंच्या स्मृतीग्रंथातून मला बापूंविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी नक्कीच मोठी बाब आहे. मी संघरत्न, राजरत्न, आनंद, प्रा. अनिल कांबळे आणि विशाल वाघमारे यांना मनस्वी धन्यवाद देतो आणि बापूंच्या प्रबुद्ध स्मृतींना विनम्र आदरांजली वाहतो.
– प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे ‘तक्षक’, गांधीनगर,
बिलोली, जि. नांदेड मो. ९४२०६७१७५ 
ग्रंथामध्ये समाविष्ठ लेख आणि लेखकांची नावे
१. माणसं जोडणारा माणूस : डी. डी. गायकवाड
२. नित्य उद्योगी बापू (आजोबा) : आदित्य अनिल कांबळे
३. एफ. एन. कसबे : व्यक्ती आणि वाङमय : पंडित कांबळे
४. वात्सल्यरूप बापू : मयंक अनिल कांबळे
५. माझे प्रेमळ आजोबा : सुबोध संघरत्न कसबे
६. माझे मार्गदर्शक : दिलीप सूर्वे
७. निःस्पृह आणि लोभस व्यक्तिमत्व : के. व्ही. सरवदे
८. बापूंचा शेवटचा प्रवास : रत्नमाला कांबळे
९. घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी : प्रा. अनिल कांबळे
१०. नाती जपणारा सच्चा माणूस : बी. एन. शीलवंत
११. अष्टपैलू बापू : संघरत्न कसबे
१२. प्रवाहाच्या विरूद्ध वाहणारे बापू : किसन जाधव
१३. माझा मायेचा आधार : आम्रपाली कसबे
१४. साठवण एकुलत्या आठवणीची : बालाजी गायकवाड
१५. उज्ज्वल भविष्याचे काळजीवाहक : पूनम गायकवाड
१६. वडीलांसमान सासरे : सीमा राजरत्न कसबे
१७. जीवनयात्री विजयानंद : योगीराज वाघमारे
१८. नात्यातला ओलावा :  सुरेखा सोनवते
१९. ही पोकळी कशी भरून काढायची? : रमेश बोर्डेकर
२०. बापू , तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहोत : राजरत्न कसबे
२१. सामाजिक चळवळीतला सच्चा कार्यकर्ता : डी. टी. वाघमारे
२२. बापू : वर्गमित्र आणि सच्चा साथी : भीमराव पांचाळ
२३. मुलांच्या आवडी – निवडी जपणारे पिता : आनंद कसबे
२४. एक परिवर्तनशील व्यक्तिमत्व : सी. आर. घाडगे
२५. कुशल कर्माने जीवन साफल्य केलेले बापू  : त्रिवेणी कसबे
२६.  बहुगुणसंपन्न बापू : विशाल वाघमारे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका