थिंक टँक / नाना हालंगडे
संपूर्ण महाराष्ट्रासह सांगोला तालुक्यात गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारी राज्य कामगारांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सांगोला पंचायत समितीसह तहसील कार्यालयावर बेमुदत असा हजारो कामगारांच्या उपस्थितीमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला.
या धडक मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते पी.सी.झपके, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम आप्पा धांडोरे, तानाजी पाटील इत्यादीसह सांगोला तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव, सर्व शिक्षिका भगिनी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी क्षेत्रातील सर्व कर्मचारी वर्ग,सर्व आरोग्य सेवक, जलसंधारण विभागातील सर्व कर्मचारी, पंचायत समिती विभागातील सर्व कर्मचारी,जिल्हा परिषद विभागातील सर्व,तहसील विभागातील सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले होते.
या मोर्चाच्या सुरुवातीला सर्व कर्मचारी वर्ग सांगोला पंचायत समिती प्रांगणामध्ये एकत्रित जमला. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब देशमुख व श्री.झपके सर यांनी पंचायत समिती आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार समर्पित केला. तेथून मोर्चाला सुरुवात झाली.
जुनी पेन्शन योजना मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये आजपासुन सुरू असलेल्या सर्व विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सांगोला तहसील कार्यालयासमोर उपस्थित संपकरी कर्मचाऱ्यांच्या संपाला महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष मा.आ.दिपक आबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित दर्शवून पाठिंबा दिला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शासन दरबारी या मागणीसाठी आपण आग्रही राहुन जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही उपस्थित संपकरी कर्मचाऱ्यांना देऊन या मागणीचे निवेदन यावेळी नायब तहसीलदार यांचेकडे देऊन संपकरी कर्मचाऱ्यांना तीव्र भावना शासन दरबारी योग्यरीत्या पोहोचवाव्यात अशी विनंती केली.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख हे उपस्थित कर्मचारी वर्गाला संबोधित करताना कामगारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. सर्व कामगारांनी पंचायत समिती परिसर घोषणांनी दणाणून सोडला. यावेळी डॉ. देशमुख यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित केले. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष नेहमीच पिढ्यानपिढ्या शेतकऱ्याचे व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक यशस्वी आंदोलन केलेले आहेत. त्यामध्ये यशही मिळवलेले आहे.
तशाच प्रकारच्या गर्भित इशारा सत्ताधारी राज्य सरकारला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिला. कामगारांचा अंत न पाहता जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही हा कायदा पुन्हा आणावा. अन्यथा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावरची आरपारची लढाई लढेल, असा थेट इशारा दिला.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणाही केल्या. श्री.झपके सर यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. सध्याच्या सरकारवर हल्लाबोल चढवला. सत्ताधारी सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे तात्काळ पेन्शन योजनेस सर्व प्रलंबित प्रश्न सोडवावेत असा सूर आवळण्यात आला.
सांगोला पंचायत समितीचे प्रतिनिधी यांनाही यावेळी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालय येथे धडकला. यावेळीही सर्व कर्मचाऱ्यांनी हा घोषणा देऊन एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, “बाबासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”! आशा घोषणेने परिसर दणाणून सोडला.
सांगोला तहसील कार्यालय प्रतिनिधी श्री.बडवे साहेब यांनाही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख, प्रा.पी.सी झपके यांच्या हस्ते हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.