थिंक टँक न्यूज नेटवर्क (नाना हालंगडे) : कोरोना एकदाचा गेला म्हणून बिनधास्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने हळूहळू फास आवळायला सुरुवात केली आहे. सोलापूर शहरात दररोज रूग्णसंख्या वाढू लागली असून एका कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूने महासंकटाची चाहूल दिसून येत आहे.
जिल्ह्यात १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड अॅन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्टचे ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. यात ३ पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे.
महिलेच्या मृत्यूने महासंकटाची चाहूल
धक्कादायक बाब म्हणजे, कोरोना साथीने ग्रस्त असलेल्या एका ८० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मयत झालेली महिला ही सोलापूर शहरातील बुबणे चाळ, रेल्वे लाईन परिसरातील आहे. मृत महिलेचे वय ८० होते. त्यांना दमा, पक्षाघात झाला होता. संबंधित वृद्ध महिलेला सोलापूर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना ११ मार्च २०२३ रोजी पहाटे शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोलापूर शहरात कोरोना सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. झोपडपट्टी भागातील अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जास्त गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका आहे.
शहरात कोरोनाचे १५ रुग्ण
सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात एकूण १५ रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. झोपडपट्टी भागातील अनेक ओपीडींमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजार शहरात फोफावत आहे. सोलापूर शहर आरोग्य प्रशासन आणि जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.