“त्या” अंध दाम्पत्यास घर द्या : बापूसाहेब ठोकळेंची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला शहरात राजाराम बंडगर व त्यांची धर्म पत्नी हे दाम्पत्य अंध आहे. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. राहायला घर नाही.. खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. हे अंध दांपत्य सांगोला बस स्थानकाच्या आडोशाला बेसहारा अवस्थेत जीवन कंठत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रशासनाने शहराच्या हद्दीत सदरच्या कुटुंबास घरजागा द्यावी अशी मागणी बहुजन नेते तथा बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे यांनी मुख्याधिकारी आणि तहसीलदारांकडे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन बापूसाहेब ठोकळे यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, डोळ्यांनी अंध असलेले राजाराम बंडगर हे सपत्नीक अत्यंत हलाखीच्या जीवन जगत आहेत. दोघेही अंध असल्याने त्यांना भिक मागून जगावे लागते. राहण्यास हक्काचे घर नसल्याने ते दोघेही सांगोला बस स्थानकाच्या आडोशाला राहत आहेत.
उन्ह, वारा, पाऊस, थंडी अशा सर्व ऋतूत त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अशावेळी समाजातील मोठा वर्ग अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही.
बंडगर दांपत्यास माणुसकीच्या भावनेतून नगर परिषदेने शहराच्या हद्दीत सदरच्या दांपत्यास हक्काची जागा द्यावी, अशी मागणी केली आहे.