ताजे अपडेट

पत्रकाराला भर रस्त्यात मारले, शिवसेना आमदाराने शिवीगाळ केल्यानंतर घडली चीड आणणारी घटना

Spread the love

पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैचारिक मतभेद असू शकतात मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला अशी भर रस्त्यात चार ते पाच गुंडांकडून बेदम मारहाण होणे हे अत्यंत चिड आणणारे आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

जळगाव : विशेष प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. या चीड आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. राज्यात कायदा – सुव्यवस्था राहिलीय का असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

रोहित पवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची का? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, एका लोकप्रतिनिधीने पत्रकाराला शिवीगाळ करणे उचित नाही. परंतु जे काही आज घडले त्यांना रस्त्यात मारहाण केली हे अशोभनीय आहे. गुंडगिरीचे वातावरण पाचोऱ्यात झाले आहे. याचा निषेध आहे. पाचोरा तालुक्याचा इतिहास राजकीय सुसंस्कृतीचा आहे. मागच्या गोष्टीचे अनुकरण आपण केले पाहिजे. राजकीय वारसा जपला पाहिजे. पाचोऱ्यात याआधीही अनेक नेत्यांवर टीका झालीय. घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यामुळे सर्वांनी सुसंस्कृत वारसा जपणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात संताप
जळगाव जिल्ह्यात सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन एका स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमदार किशोर पाटील यांना ही टीका पचनी न पडल्याने त्यांनी पत्रकाराला थेट शिवीगाळ केली. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी होय ती ऑडिओ क्लीप माझीच आहे. मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय असा खुलासाही त्यांनी केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी जे केलं ते सांगायला मागे मागे हटणार नाही असे म्हणत आपण पत्रकाराला का शिवीगाळ केली हे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करताच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैचारिक मतभेद असू शकतात मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराला अशी भर रस्त्यात चार ते पाच गुंडांकडून बेदम मारहाण होणे हे अत्यंत चिड आणणारे आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

घटनेचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका