शहाजीबापूंनी सुर बदलला, म्हणाले, अजितदादांनी सांगोल्याला नेहमी झुकतं माप दिलं
Shahajibapu Patil Sangola
महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी माझ्या सांगोला मतदारसंघावर कुठंही अन्याय केलेला नाही. किंबहुना अजितदादांनी माझ्यासाठी थोडं ढळतं माप दिलं. कारण मी पूर्वी २० ते २५ वर्षे पवारांसोबत काम केले आहे. अजित पवारांसोबत आमचा व्यक्तीगत जिव्हाळा आहे. माझ्यावर ते खवळतात, पण दादांचं माझ्यावर प्रेम आहे, असा दावाही बापूंनी केला.
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
महाविकास आघाडीत अजित पवारांनी निधी देताना सांगोला तालुक्यावर अन्याय केला अशी भूमिका वारंवार मांडणाऱ्या आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी आपला सूर बदलला आहे. “अजित पवार (Ajit Pawar) निधी देताना आमच्यावर अन्याय करतात, असा गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा सूर होता. त्यावेळी तो मी माध्यमांसमोर मांडला होता. त्यावेळी मी वैयक्तीक दुखणं कधीही मांडलं नाही. आता परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा रागानं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले होते. दादांना ते आवडलं असतं, तर त्यांनी पहाटे शपथविधी कशाला घेतला असता”, असा उलटा सवाल करत आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे. (Ajit Dada did not want to go with Uddhav Thackeray and Congress : Shahaji Patil)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना अर्थमंत्री पद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकारांजवळ आपले मन मोकळे केले.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत अजित पवार यांना जायचं नव्हतं. ती त्यांची भूमिका होती. पण, शरद पवारसाहेबांच्या हट्टामुळे आणि तीन दिवस समजूत घालून त्यांना परत आणलं गेलं. महाविका आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद अजितदादांनी निराशेतच स्वीकारलं.”
सांगोल्याला झुकतं माप
महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी माझ्या सांगोला मतदारसंघावर कुठंही अन्याय केलेला नाही. किंबहुना अजितदादांनी माझ्यासाठी थोडं ढळतं माप दिलं. कारण मी पूर्वी २० ते २५ वर्षे पवारांसोबत काम केले आहे. अजित पवारांसोबत आमचा व्यक्तीगत जिव्हाळा आहे. माझ्यावर ते खवळतात, पण दादांचं माझ्यावर प्रेम आहे, असा दावाही बापूंनी केला.
आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी दादांची
अजित पवार हे अर्थमंत्री झाल्याने सांगोला तालुक्याला न्याय मिळेल असा विश्वास बापूंना आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांची फाईल कुठेही जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मदत करत होते. आता तीनही पक्ष त्यांचे झाले आहेत. या तीनही पक्षातील आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. हे तीनही नेते समर्थपणे आपली भूमिका पार पाडतील, असा आमदार म्हणून मला विश्वास आहे. सांगोला तालुक्यावर ते अन्याय करणार नाहीत.”
मीडियाने विपर्यास केला
शहाजीबापू यांनी गुवाहाटीला जाण्यापूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलताना अजित पवार हे शिवसेना आमदारांना दुय्यम वागणूक देतात, निधी देताना दूजाभाव करतात असा आरोप केला होता. स्वतःचाच आरोप बापूंनी खोडून काढला. उलट माझ्या बोलण्याचा मीडियाने विपर्यास केला असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “भाजपसोबत अजित पवार यांना महाराष्ट्राचा गाडा हाकायचा होता, त्यामुळे ते आता आवडीने शिवसेना-भाजपसोबत आले आहेत. त्यांच्यासोबत आता प्रगल्भ विचाराचे एकनाथ शिंदे आहेत, त्यामुळे ही त्रिमूर्ती महाराष्ट्राचा चांगली विकास करेल, सरकार व्यवस्थित चालेल, आता कुठेही नाराजी दिसणार नाही”, असेही शहाजी पाटील यांनी नमूद केले.
बापू ठाम भूमिका घ्या
बापूंनी अजित पवार यांच्याबाबत नुकतीच मांडलेली भूमिका तालुक्यातील जनतेला बुचकळ्यात टाकणारी आहे. बापूंनी ठाम भूमिका घ्यावी असा सूर जनतेतून उमटत आहे.