थिंक टँक स्पेशल

नात्यातील २७ जणांचे मृत्यू.. तरीही अहिल्यादेवींनी धीरोदात्तपणे राज्य टिकवले, वाढविले

डॉ. प्रभाकर कोळेकर यांचा अभ्यासपूर्ण लेख

Spread the love

अहिल्यादेवींचे सांसारिक जीवन दु:खाने भरलेले होते. जवळच्या नात्यातले अनेक मृत्यू त्यांनी पाहिले. पती खंडेराय होळकर, सासरे मल्हारराव होळकर. मुलगा मालेराव याशिवाय सासू, आई, वडील, भाऊ, जावई, मुलगी, नातू आदी २७ जागांचे मृत्यू पाहिले. जवळच्या नात्यातील पुरुष मंडळी नसताना संसारातले हे दुख: पचवून २९ वर्ष जिद्दिने, बाणेदारपणे आपला कर्मयोग आचरत राहिल्या. हा त्यांच्या मनाचा खंबीरपणा अभ्यासनीय आहे.

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना भारताच्या इतिहासात 18 वे शतक हे संक्रमणाचे व बदलाचे होते, हे आपणाला लक्षात घ्यावे लागेल. तो काळ अनेक बंधनांचा, अनिष्ठ रुढी परंपरेच्या गर्तेत अडकलेला होता. अशाही परिस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय, सामाजिक, प्रशासनिक कार्य करत स्वात:ची वेगळी ओळख निर्माण केली. स्वताचे कौटुंबिक दुःख बाजूला ठेऊन एक असामान्य व्यक्तिमत्व, मुत्सद्दी राज्यकर्ती, कुशल प्रशासक, प्रजावत्सल, महान रणनितीतज्ञ व धर्मनिरपेक्ष म्हणून मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

इ.स १७५४ मध्ये झालेल्या कुंभेरीच्या लढाईत पति खंडेरावाचा मृत्यू होऊन २९ व्या वर्षी त्यांच्यावर वैधव्याची कुल्हाड कोसळली. पण पतीच्या मृत्युनंतर न डगमगता त्यांनी आपले कार्य सुरु केले. राज्यभाराचे तंत्र, प्रशासनातील लोककल्याणकारी धोरणे, धार्मिक व सांस्कृतिक कार्य, पर्यावरण व जलसंवर्धनाच्या योजना आजच्या काळात अनुकरणिय आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीप्रीत्यर्थ सहा. प्राध्यापक धनंजय टाकळीकर यांनी रेखाटलेले चित्र.

1) प्रशासन जलद गतीने होण्यासाठी म्हणून आपली स्वत:च्या धर्मपरायन वृत्तीनुसार निरपेक्ष न्यायदान व्यवस्था सुरु करुन सामान्य लोकांना समान न्याय देण्याचे काम केले. गुन्हेगारांना शिक्षा करताना अहिल्यादेवीचा मानवतावादी दृष्टीकोन होता. माणूस दुरर्वतनापासून परावृत्त व्हावा. यासाठी त्यांनी कडक पावले उचलली, पण कोणत्याही व्यक्तिचे त्यांचे आयुष्यभराचे नुकसान करने नाही. आदिवासी, भिल्ल, कोळी, पेंढारी या लुटमार करणान्या लोकांचे प्रबोधन करून त्यांचे पुनर्वसन केले.

2) शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सुधारित बी-बियाणे, कर्जाच्या सोयी उपलब्ध करून प्रोत्साहन दिले. स्थानिक व देशभरातील कारागिरांना व उद्योगांना आश्रय दिला. आपल्या राज्यात कुटिर उद्योग सुरु केले. लोककलाकारांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहित केले. त्यांच्या कलेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला.

3) आपले राज्य लष्करीदृष्ट्या बलशाली व्हावे म्हणून त्यांनी परंपरगत शस्त्र – अस्त्रा बरोबरच नवीन कवायती सैन्यांची उभारणी केली. यासाठी पगारी तत्त्वावर फ्रेंच सैनिकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली. महिलांकरिता स्वतंत्र कवायती फौज तयारी केली. युध्दामुळे जनसामान्यांचे नुकसान होते व जिवीतहानी होते, म्हणून युद्ध टाळण्यावर त्यांचा भर होता. परंतु शांततेचा गैरफायदा विरोधकांनी घेऊन नये म्हणून त्या सतत लष्करीदृष्ट्या तयार असत.

4) स्त्रीयांच्या स्वरक्षणासाठी व तिला समान संधी देण्यासाठी अहिल्यादेवींनी लष्कारात स्वतंत्र पलटण तयार करून स्त्रीकर्तृत्व जगाला दाखवून दिले. बालविवाह, हुंडा प्रतिबंध यासाठी कायदे केले. राज्यात असा हुकूम काढला होता की, विवाहसमयी कन्येकडून जो कोणी द्रव्य घेईल ते द्रव्य सरकारी जमा करून दंड करण्यात येईल. बालविवाह व रोटीबेटीच्या प्रथेला न जुमानता आपली मुलगी मुक्ताचा विवाह १८ व्या वर्षी केला. अनाथाश्रम, बालकाश्रम, व महिलाश्रम उभारून जनतेस त्यांनी आधार दिला. अहिल्यादेवींचे हे कार्य काळानुसार पुरोगामी व स्त्रियांना न्याय देणारे होते.

अहिल्यामातेने आपल्या राज्यातील चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करणा-या पराक्रमी पुरुषाला माझी मुलगी देईन असा आदेश काढला. यशवंतराव फणसे या धाडसी तरुणाने चोर व लुटारुंचा बंदोबस्त करण्याचे काम केल्याने त्यांच्या जात आणि धर्माचा विचार न करता आपली मुलगी मुक्ता हीचा आंतरजातीय विवाह करून जातीभेदाच्या भितीला तडा दिला.

5) अध्यात्माला सामाजिकतेची जोड देऊन लोककल्याण करता येते. हे अहिल्यादेवीच्या धार्मिक कार्यातून स्पष्ट होते. त्या धार्मिक होत्या, परंतु अंधश्रध्दाळू नव्हत्या. सदाचार आणि सर्वधर्म सहिष्णूतेचे धोरण त्यांनी अवलंबले. त्यांनी अनेक जुन्या मंदिराचा जिर्णोध्दार केला, नविन मंदिराची निर्मिती केली, शेकडो घाट बांधले. मंदिर आणि मशिदींकरिता खर्च भागविण्यासाठी म्हणून सालाने उत्पन्न मिळावे म्हणून जमीन दान दिली. त्यांनी बांधलेले वाडे, धर्मशाळा, बारव, विहरी या वास्तू म्हणजे स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ठ नमूना आहेत.

6) आर्थिक, व्यापारी दृष्टीकोनातून भरभराटी व्हावी म्हणून जधानी महेश्वर येथे उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. व्यापारी व लष्करासाठी व्यापारी मार्ग बनविले. पुणे ते महेश्वर टपालव्यवस्था सुरु केली. नगरविकासासाठी बाजारपेठा व धर्मशाळा प्रार्थना, रस्ते, वैद्याच्या नेमणुका व त्यांच्या गावापर्यंत सेवा उपलब्ध करून दिल्या.

7) अहिल्यादेवींची त्या काळातील पर्यावरणनीती व आजच्या काळातही मार्गदर्शक स्वरुपाची आहे. अहिल्यादेवींनी रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, लिंब, चिंच अशा झाडांची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले. वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन दिले. पर्यावरण समतोल राखण्यासाठी शेती जंगलामध्ये पशु-पक्षी प्राणी यांना स्वतंत्र राखीव कुरणे आरक्षित केली.

8) अहिल्यादेवींचे सांसारिक जीवन दु:खाने भरलेले होते. जवळच्या नात्यातले अनेक मृत्यू त्यांनी पाहिले. पती खंडेराय होळकर, सासरे मल्हारराव होळकर. मुलगा मालेराव याशिवाय सासू, आई, वडील, भाऊ, जावई, मुलगी, नातू अशा २७ जणांचे मृत्यू पाहिले. जवळच्या नात्यातील पुरुष मंडळी नसताना संसारातले हे दुख: पचवून २९ वर्ष जिद्दिने, बाणेदारपणे आपला कर्मयोग आचरत राहिल्या. हा त्यांच्या मनाचा खंबीरपणा अभ्यासनीय आहे.

अहिल्यादेवींनी प्रशासन, प्रेम व शक्ती या गोष्टीचा वापर करुन राज्याची प्रगती साकारण्याचा प्रयत्न केला.

माणसातल्या माणूसपणाला दूर करणान्या रूढी परंपरांना छेद दिला. त्याचे आदर्श राज्यकर्त्या, पुरोगामी व प्रबोधनाचे कार्य प्रेरणादायी ठरते.

9) वर्तमानकाळात बेटी बचाओ – बेटी पढावो, महिला सबलिकरण, संधीची समानता, उद्योगधंद्यांना प्रोत्साहान गुड गर्व्हनन्स्, गतीमान प्रशासन, पारदर्शी न्याय व्यवस्था, पर्यावरणाचे रक्षण, जबाबदार शासन पद्धती या संकल्पना प्रभावी होत असताना, आठराव्या शतकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अवलंबलेले लोककल्याणकारी प्रशासनाचे निस्वार्थ डोळस धार्मिक धोरण हे आजदेखील दिशादर्शक स्वरुपाचे आहे.

10) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेले विविध वास्तू, स्मारके, मंदिरे, घाट याचे आपण सर्वांनी मिळून जतन केले पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याचे डॉक्युमेंटेशन व कन्झर्वेशन केले पाहिजे. त्यांचा कालखंडातील पारदर्शी व गतीमान प्रशासनाचे धडे आपण आत्मसात केले पाहिजे. विचारामध्ये श्रध्दायुक्त भाव ठेवून, निष्काम कर्म करण्याची निस्वार्थीवृत्ती निर्माण केली पाहिजे. म्हणजे पुढील काळात समाजापुढे आपण चांगले आदर्श निर्माण करु शकू.

सर्वांना पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा!

– डॉ. प्रभाकर कोळेकर
(संचालक – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका