छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापना केली. त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात मराठा साम्राज्य विस्तारासाठी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरदेखील छत्रपती संभाजी राजे छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, मराठ्यांचे सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मराठा राज्य टिकवण्यासाठी व मराठा साम्राज्याच्या सिमा वाढवण्यासाठी लढा दिला. दरम्यानच्या काळात माळावाधिपती मल्हारराव होळकर यांनी साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज, पुण्याचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली राणोजी शिंदे, उदाजी पवार, नागपूरचे भोसले इत्यादी मराठा सरदारांना बरोबर घेवून उत्तरेत धडक मारली.
तलवारीच्या जोरावर मल्हारराव होळकर यांनी रजपुताना, गुजरात, पंजाब, बंगाल, लाहोर इत्यादी परिसरात मराठ्यांचा डंका वाजविला. मोगलांनी हिंदुस्थानात घुसून नागरिकांचा अनन्वीत छळ केला. या छळाला जनता कंटाळली होती. परकिय आक्रमक सत्ताधारी हिंदुस्थानातील हिंदू – देवदेवतांची तोडफोड करुन धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती. विशेषत : मोगलांनी हिंदुस्थानातील हिंदू लोकांना मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केली होती. ही परिस्थिती लक्षात घेवून मल्हारराव होळकर यांनी परकीयांविरुद्ध मोहिम आखून मोगलांना रोखण्याचा प्रयत्न केला.
मोगलांनी हिंदुस्थानातील हिंदूची मंदीरे तोडून त्याठिकाणी मशिदी मोगलांनी बांधल्या होत्या. हे मोगल सैनिक दिल्लीत परतल्यानंतर पुन्हा मल्हारराव होळकर यांच्यासह अनेक मराठा सरदारांनी मशिदी पाडून त्याठिकाणी मंदीरे उभारली. काशीविश्वेश्वर येथे देखील मंदीर तोडण्यात आले होते. त्याठिकाणी मशिद बांधण्यात आली. हिंदुस्थानात काशी हे हिंदूचे पवित्र स्थान समजले जाते. त्यामुळे मल्हारराव होळकर यांनी सदर मशिद तोडण्यासाठी फौजफाटा घेवून चालही केली होती.
परंतु स्थानिक लोकांचे सहकार्य न मिळाल्यामुळे मल्हारराव होळकर यांना परत यावे लागले. परंतु हिदुस्थानातील इतर अनेक ठिकाणी मल्हारराव होळकर यांच्या सैन्यांनी मशिदी पाडून टाकल्या. त्याठिकाणी कालांतराने होळकर राज्याच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी मंदीर उभारली. मोगलांनी हिंदूचे मंदीर तोडून मशिदी बांधल्या होत्या. अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याठिकाणी मंदीर होते त्याचठिकाणी पुन्हा मंदीरे उभारली. १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडात परकीय आक्रमण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी हिंदुस्थानात धुमाकूळ घातला होता. हिंदुस्थानातील लोकांना पकडून गुलाम बनविले जात होते. मुस्लिमांनी, ख्रिश्चन धर्मियांनी हिंदू लोकांना पकडून धर्मांतर करण्याचा सपाटा लावला होता.
विशेषतः मोगल साम्राज्याकडून हिंदुस्थानातील जनतेचा अनन्वित छळ मांडला होता. ते हिंदुस्थानात येवून हिंदूंची मंदीर पाडून लोकांना जबरदस्तीने आपला धर्म स्वीकारण्यास लावत होते. पुढे औरंगजेबानेही हिंदूस्थानातील हिंदूंची अनेक मंदीर तोडून नेस्तानबूत केली. परंतु ही मंदीरे पुन्हा बांधून हिंदू धर्म टिकवून ठेवण्याचे काम होळकरशाहीच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केली. काशी विश्वेश्वर असो, सोरटी सोमनाथ असो, किंवा अयोध्या येथील मंदीर असो या सर्व ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांनी मंदीरांची पुन्हा निर्मिती केली. काही मंदिरांचा जिर्णोद्धार केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ होळकरांच्या साम्राज्यात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात असलेल्या हिंदू देव – देवतांची मंदीरे पुन्हा बांधली.
मंदीरात पुजा – अर्जाची कायमस्वरुपी सोय केली. म्हणजेच परकीय आक्रमणांनी हिंदुस्थानातील मंदीरे तोडून हिंदू लोकांचा अनन्वित छळ करून हिंदू धर्म बुडवण्याचा प्रयत्न केला. परंतु अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वेश्वर येथील मंदीरसह हिंदुस्थानातील अनेक मंदीरे पुन्हा बांधली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वर येथील झालेल्या एका कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या धार्मिक कार्याविषयी आवर्जून उल्लेख केला. काशी विश्वेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांची भव्य पूर्णाकृती मूर्ती स्थापीत करण्यात आली असून भारताचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांना नतमस्तक होवून नमन केले. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या हिंदूस्थानातील धार्मिक कार्याची प्रचिती येते. एकंदर हिंदुस्थानातील देव देवतांना आणि मंदीरांना सुरक्षित ठेवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थानी हिंदूधर्मसंरक्षक आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानात मंदिरे बांधली, मंदिरांचा जीर्णोध्दार केला. १७०६ साली मोहम्मद आजम खान या धर्मांध व्यक्तीने श्री सोमनाथ मंदिरासह हिंदुस्थानातील अनेक हिंदूंची मंदिरे नष्ट केली. मोगलांनी पाडलेली ही सर्व मंदिरे अहिल्यादेवींनी पुन्हा बांधली. श्रीशैल येथे श्री मल्लिकार्जुन मंदिर, मध्य प्रदेशात ओंकारेश्वर , परळी वैजनाथ येथे श्री नागनाथ मंदिर, काशी येथे तारकेश्वर मंदिर , मनकर्णिका घाट , धर्मशाळा बांधल्या. अयोध्या येथे राम मंदिर बांधले. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे घाट, गोदावरी नदीवर पूल, घृष्णेश्वर येथे शिवालय तसेच १२ ज्योतिर्लिंगाप्रमाणे भारतातील सप्तपुरी, चारधाम, उत्तरेत बद्रीनारायण, दक्षिणेस रामेश्वर, काशी विश्वेश्वर, पूर्वेस जगन्नाथपुरी आणि पश्चिमेस द्वारका या ठिकाणीदेखील मंदिरांचा जीर्णोध्दार केला.
भारतात सुमारे २५ ठिकाणी अहिल्यादेवींनी शिवालयाची निर्मिती केली. अयोध्या येथील राम जन्मभूमी असलेले मंदिर देखील तोडण्यात आले होते. अहिल्यादेवींनी या ठिकाणी राम मंदिर बांधून धर्मशाळाही उभारली. तसेच शरयू नदीच्या काठावर घाट बांधला. या घाटालाच सध्या अहिल्यादेवी घाट असे म्हटले जाते. अयोध्या येथे केवळ राममंदिरच बांधले असे नाही तर तेथे दररोज पूजाअर्चाची कायमस्वरूपी सुविधा केली. अयोध्या येथे गेल्यानंतर भाविकांच्या निवासाची सोय व्हावी, यासाठी धर्मशाळा बांधली.
अहिल्यादेवी होळकर यांनी शेजारील राज्य आणि हिंदुस्थानातील अनेक राजे, महाराजे यांच्याशी राजकीय संबंध वाढविले होते. त्यांनी ग्वाल्हेरचे शिंदे आणि नेपाळचे महाराजे यांना राखी पाठविली होती. त्यावेळी दोन्ही राजांनी आपल्या बहिणीला काय ओवाळणी द्यावी, असा सन्मानपूर्वक प्रश्न विचारला होता. त्यावेळी अहिल्यादेवींनी शिंदे संस्थानची पहिली राजधानी उज्जैन या ऐतिहासिक शहरात असलेल्या महांकाळेश्वर मंदिर आणि नेपाळमधील काठमांडू येथील प्रसिध्द पशुपतीनाथ मंदिरातील पहिल्या पूजेचा मान होळकर संस्थानाला मिळावा, अशी विनंती केली होती.
या दोन्ही महाराजांनी ही विनंती तातडीने मान्य केली. आजही या दोन्ही मंदिरात पहिली पूजा होळकरांकडून केली जाते. जेजुरीचा खंडोबा म्हणजे होळकरांचे कुलदैवत. सुभेदार मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर, मालेराव होळकर, यशवंतराव होळकर यांच्यासह अनेक उत्तराधिकारी आपल्या परिवारासह दर्शनासाठी जेजुरीला येत होते. जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी होळकर संस्थानच्या वतीने अनेक विकासकामे करण्यात आली.
अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर १७७० मध्ये जेजुरी येथे सुमारे १८ एकर क्षेत्रांमध्ये भव्य पाण्याचा तलाव खोदला असून या तलावाला सुभेदार मल्हारराव होळकर व गौतमाबाई होळकर यांच्या स्मरणार्थ मल्हार – गौतमेश्वर तलाव असे नामकरण केले. हा तलाव चौकोनी आकाराचा असून संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. या तलावाच्या बाजूलाच चिंचेचे बन असून होळकर वाडादेखील बांधण्यात आला आहे. जेजुरी परिसरात असलेल्या डोंगरावरील अनेक झऱ्यांचे पाणी शुध्द होऊन शिस्तबध्द पध्दतीने या तलावात सोडण्यात आले आहे. या तलावातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरता यावे यासाठी उत्तम सोय करण्यात आली आहे.
तलावाच्या बाजूला पाणी उपसण्यासाठी दगडी मोट तयार करण्यात आली आहे. तलावाच्या भिंतीवर महाराजा होळकर इंदौर स्टेटचा संगमरवरी बोर्ड पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी हे अहिल्यादेवींचे जन्मगाव, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सोलापूर – औरंगाबाद या महामार्गावर चोराखळी नावाचे गाव आहे. हे अहिल्यादेवींचे आजोळ. बालपणी आईबरोबर अहिल्यादेवी चौंडीहून चोराखळीला अनेकवेळा जात. या आठवणींना उजाळा देण्यासाठी अहिल्यादेवींनी चोराखळी येथे असलेल्या पापनाश मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे . मोठ्या डोंगरामध्ये तळे खोदून पशू , पक्षी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
या सर्व सुविधांची निर्मिती करून गावच्या पाटलांमार्फत व्यवस्था लावण्यात आली. चोराखळी हा परिसर पुराणकाळातील दंडकारण्य म्हणून प्रसिध्द आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर रावणाने सीतेचे हरण केले. त्यावेळी सीतेच्या शोधासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दंडकारण्यातून फिरत होते. चोराखळी परिसरातच एका डोंगरावर श्री रामचंद्र विश्रांती घेत होते. लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून चोराखळी परिसरातच प्रभू रामचंद्र झोपले होते. त्या परिसरात असतानाच त्यांनी पूजेसाठी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंगाची पूजाअर्चा करण्यासाठी जलनिर्मिती व्हावी म्हणून तेथे डोंगरावर बाण मारून पाणी काढले, अशी आख्यायिका चोराखळी येथील ग्रामस्थ सांगतात.
डोंगरावरून खालच्या बाजूला पापनाश मंदिरातील कुंडात हे पाणी येते. आजही हे कुंड पाण्याने भरलेले दिसून येत आहे. चोराखळी या गावापासून एक किलोमीटर अंतरावर पापनाश मंदिर आहे. मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला पापनाश टेकडी आहे. टेकडीच्या उत्तरेला भुंगेश्वर ऋषींची शिला समाधी आहे. थोडे पुढे मंदिराकडे जाताना दक्षिणेला काळभैरवाचे स्थान आहे. पापनाश मंदिराच्या महाद्वारासमोर हनुमान मंदिर आहे.
या मंदिराशेजारी पापनाश मंदिराची पूजाअर्चा करणाऱ्या काही महाराजांची देखील मंदिरे आहेत. या सर्व मंदिराच्या पूजाअर्चाची कायमस्वरुपी सोय व्हावी यासाठी अहिल्यादेवींनी गावच्या पाटलांच्या नावाने द्रव्य पाठविले. आजही पूजाअर्चाची परंपरा नित्यनियमाने सुरु आहे. भुकेल्या लोकांना अन्नदान करण्याची हिंदुस्थानची फार मोठी परंपरा आहे. यासाठी अन्नछत्र व दासोह अनेक ठिकाणी आजही उपलब्ध आहे. अन्नछत्र म्हणजे गरजू, वाटसरू , प्रवासी , तीर्थक्षेत्रासाठी निघालेले भाविक , वृध्द , निराधार लोकांच्या भोजनाची व्यवस्था होय .
बहुतेक ठिकाणी अन्नछत्रामधील जेवण एकच प्रकारचे असते . म्हणजे सर्वांसाठी एकच थाळी दिली जाते . परंतु ब्राह्मण , जैन साधक , पुरोहित आणि व्रतवैकल्य करणारी मंडळी कांदा , लसूण खात नाहीत.
काही मंडळी देवाच्या नावाने तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने त्यांच्या आवडीचे पदार्थ वर्ज्य करतात. त्यामुळे अशा लोकांची अन्नछत्रात सोय होत नाही. परंतु अहिल्यादेवी होळकर यांनी भुकेल्या लोकांना अन्नदान करीत असताना या सर्व बाबींचा विचार केला होता. म्हणजेच होळकरशाहीच्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी ठिकठिकाणी अन्नछत्र उघडण्यात आले होते . विशेष म्हणजे ज्यांना जे हवे आहे अशा पध्दतीचे भोजन दिले जात होते . काहींचा उपवास असेल तर फळे आणि उपवासाचे पदार्थ आवर्जून दिले जात होते . काही पुरोहित किंवा इतर गरजू लोकांना भोजनाऐवजी धान्य आणि शिधा देण्याची सोयदेखील अहिल्यादेवींनी केली होती , अन्नछत्र आणि इच्छा भोजन यासाठी अहिल्यादेवींनी खासगी ट्रस्टमधून व्यवस्था केली होती . महेश्वर , इंदौर यासह राज्यातील अनेक ठिकाणी अन्नछत्राची व्यवस्था त्यांनी केली होती.
राज्याच्या बाहेर देखील हिंदुस्थानात अनेक ठिकाणी भुकेल्या लोकांना पोटभर अन्न मिळावे , यासाठी आजही अन्नछत्र सुरु आहेत . पंढरीचा राजा म्हणून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षभर वारकरी येत असतात . विशेषत : राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालख्या आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येतात . पंढपुरात परगावहून येणाऱ्या वारकऱ्यांची निवासाची सोय व्हावी यासाठी पंढरपुरात भव्य असा होळकरवाढा बांधला . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विवाह झाल्यानंतर आपले पती खंडेराव यांच्याबरोबर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या.
पंढरीच्या विठ्ठलाची महती संबंध हिंदुस्थानात होती. या विठ्ठलासाठी अहिल्यादेवींनी हिरे , माणिक आणि जड जवाहिऱ्यांनी मढविलेला आकर्षक सोन्याचा मुकुट दान केला . तसेच पांडुरंगाला होळकर राज्याच्या वतीने महानैवेद्य देण्यासाठी दरवर्षी ४५ रुपयांची कायमस्वरूपी मदत केली . तसेच मंदिरातील रुक्मिणीसाठी अनेक अलंकार दिले . आपण केलेल्या दानाचा विनियोग विठ्ठलासाठी व्हावा , या अनुषंगाने त्यांनी पंढरपूरच्या उत्पातांना पत्रही लिहिले . त्यात त्या म्हणतात , श्री पंढरपूर येथील समस्त उत्पात यांचे नावे ताकीद पत्र की श्री मातोश्री रखमाबाई चरणी पायाचे रमझोन (सोन्याच्या तोरड्या ) ह्या सदैव श्री चरणी घालीत असावें . अंतर पडू नये.
अहिल्यादेवी होळकर या भगवान शंकराच्या भक्त होत्या . त्यांनी हिंदुस्थानात अनेक ठिकाणी महादेव मंदिरे बांधली . याचबरोबर काही मंदिरात होळकर राज्याच्या वतीने पूजा करण्याची कायमस्वरूपी सुविधादेखील करून ठेवण्यात आली आहे . पंढरीच्या विठ्ठलाची महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होळकर सरकारच्या वतीने पूजा केली जाते . गंगा , यमुना यासह पाच पवित्र नद्यांचे जल घेऊन होळकर सरकारचा प्रतिनिधी दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी पंढरीत येतो . मध्यरात्रीच्या वेळी होळकरांच्या वतीने श्री विठ्ठलाची पूजा केली जाते. आजही ही पूजा चालू आहे .
एकंदर अहिल्यादेवी होळकर यांचे संपूर्ण हिंदुस्थानातील धार्मिक कार्य पाहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने हिंदूधर्म संरक्षक आहेत , असे म्हणायला काही हरकत नाही . सध्या हिंदू धर्माच्या नावावर राजकारण सुरु असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मात्र धार्मिक कार्य करीत असताना कधीच गाजावाजा केला नाही , हे लक्षात घ्यायला हवे . होळकरांच्या संस्थांबाहेरदेखील अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदूंच्या मंदीरांच्या जिर्णोद्धार केला . हिंदूंची मंदीरे बांधताना त्यांनी मशिदीला कधी हात लावला नाही. त्यामुळे हिंदुस्थानात मंदीराशेजारीदेखील मशिदी दिसून येतात . हिंदू धर्माचे संरक्षण करीत असतानाच इतर धर्माचा द्वेश कधी केला नाही . मानवता हाच सर्वश्रेष्ठ आहे , असाच विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगासमोर मांडला होता.
– उज्ज्वलकुमार माने, सोलापूर
मो. नं. ९९२२४२४६९९
(लेखक हे नामवंत पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर विपुल लेखन केले आहे. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत.)