शेवटच्या श्वासापर्यंत फुले-शाहू-आंबेडकर विचार जपणार : अॅड. पृथ्वीराज चव्हाण
अॅड. पृथ्वीराज चव्हाण आणि बापूसाहेब ठोकळे यांचा वाढदिनी भव्य सत्कार
सांगोला/प्रतिनिधी
फुले-शाहू-आंबेडकर यांनी देशाच्या पुरोगामित्वाची जडणघडण केली आहे. त्यांनी दिलेल्या सामाजिक समतेच्या तत्वानुसार चालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मी आयुष्यभर हेच विचार जोपासत आलो आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारच मला महत्त्वाचे वाटतात. शेवटच्या श्वासापर्यंत फुले-शाहू-आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार जपणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पृथ्वीराज चव्हाण तसेच बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथील भीमनगर येथे समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. शहाजीबापू पाटील, ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके, बाबुराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड होत्या. यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले, दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बनसोडे, डॉ. प्रभाकर माळी, बाळासाहेब बनसोडे, चंचल बनसोडे, माजी नगरसेवक प्रशांत धनवजीर, माजी नगरसेविका विजयाताई बनसोडे, दीपक एवळे, दीपक बनसोडे, ॲड. सागर बनसोडे, ॲड. आनंद बनसोडे, ॲड. सुयश बनसोडे, तानाजी बनसोडे आदी उपस्थित होते.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पृथ्वीराज चव्हाण तसेच बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथील भीमनगर येथे समस्त बौद्ध महिलांकडून ९१ पणत्या प्रज्वलित करून औक्षण करण्यात आले.
यावेळी आ. शहाजीबापू पाटील म्हणाले की, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगोला शहराचे नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. असंख्य गोरगरीब लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी सर्व समाज घटकातील लोकांच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.
प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की, अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून बौद्ध समाजबांधवांनी सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे. बौद्ध समाज रत्नपारखी आहे. हा समाज योग्य व्यक्तीची अगदी अचूकपणे पारख करतो. हा कार्यक्रम भीमनगर येथे आयोजित करून मोठा सन्मान केला आहे. बापूसाहेब ठोकळे यांनी आयुष्यभर अत्यंत तळमळीने गोरगरीब समाजातील विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक प्रश्नांवर काम केले आहे. हे दोन्ही सत्कारमूर्ती समाजासाठी आदर्श आहेत.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. पृथ्वीराज चव्हाण तसेच बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोकांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीशभाऊ सावंत व सामाजिक कार्यकर्ते किशोर बनसोडे यांच्या कुशल नियोजनामुळे कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला.
बापूसाहेब ठोकळे यांना शालेय साहित्य भेट
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही हार बुके यावर खर्च न करता गोरगरीब विद्यार्थ्याना वाटप करण्यासाठी शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य भेट दिले.