बेदाण्याला चकाकीसाठी चक्क निरम्याचा वापर
सांगलीतल्या घटनेने महाराष्ट्र हादरला
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
तुम्ही रोजच्या आहारात बेदाणे खात असाल तर सावधान. बेदाण्याला चकाकी येण्यासाठी चक्क डिटर्जेंट पावडरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली येथे समोर आला आहे. (use of nirma to make currants shine)
अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत 7 लाख 63 हजाराचा बेदाणा जप्त केला. कुपवाड एमआयडीसीमधील मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, मे. बाबा ड्राय फ्रुटस आणि मे. चौगुले ट्रेडींग या तीन बेदाणा वॉशिंग आणि रिपॅकिंग सेंटरची तपासणी करत असताना हा प्रकार समोर आला.
तपासणीदरम्यान या सेंटरना परवाना नसल्याचे आणि वॉशिंग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे तसेच बेदाणा वॉशिंगकरता डिटर्जेंट पावडर वापरली जात असल्याचे आढळले. या सर्व पेंढ्याना व्यवसाय थांबवण्याची नोटीस देण्यात आली असून पुढील कारवाई लवकरच होणार आहे.
कुपवाडमध्ये छापे
जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नवीन बेदाणा वॉशिंग, रिपॅकिंग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे आणि स्वामी यांच्या पथकाने कुपवाड एमआयडीसी येथील काही पेंढ्यावर छापे टाकले. या तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे आणि वॉशिंग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले.
चकाकी येण्यासाठी डिटर्जेंटचा वापर
बेदाण्याला चकाकी येण्यासाठी चक्क डिटर्जेंट पावडरचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने उघडकीस आणला. या ठिकाणाहून 7 लाख 63 हजाराचा बेदाणा जप्त करण्यात आला. जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नविन बेदाणा वॉशिंग व रिपॅकींग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे व श्री. स्वामी यांच्या पथकाने कारवाई केली.
कुपवाड एमआयडीसी सांगली येथील विजय संजय सावंत यांच्या मालकीच्या मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, रणजित शिवाजी मुळीक यांच्या मालकीच्या मे. बाबा ड्राय फ्रुटस आणि अशोक चौगुले यांच्या मालकीच्या मे. चौगुले ट्रेडींग या तीन बेदाणा वॉशिंग आणि रिपॅकिंग सेंटरची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे आणि वॉशिंग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले. मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन या पेढीमध्ये बेदाणा वॉशिंग करता डिटर्जेंट पावडर वापरली जात असल्याचं आढळले.
सदर पेढीमधून बेदाणा आणि डिटर्जेंट पावडर यांचे नमुने विश्लेषणाकरता घेवून 7 लाख 67 हजार 210 रूपये किंमतीचा बेदाण्याचा उर्वरीत 4 हजार 513 कि.ग्रॅ. साठा जप्त करण्यात आला. मे. बाबा ड्राय फ्रुटस आणि मे. चौगुले ट्रेडींग या पेढ्यांमध्ये रिपॅकिंग केल्या जात असलेल्या बेदाणा पॅकिंग लेबलवरती अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला उत्पादनाचा, रिपॅकिंगचा पत्ता, रिपॅकिंग आणि मुदतबाह्य दिनांक, न्युट्रीशनल माहिती, बॅच नंबर, परवाना क्रमांक इत्यादी नमूद नसल्याने दोन्ही सेंटरना त्यांचा व्यवसाय थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे.
कुपवाड एमआयडीसी येथील मे. सांगली ट्रेडींग आणि श्री दत्त कोल्ड स्टोरेज या पेढ्यांची तपासणी केली. मे. सांगली ट्रेडींग कंपनी विना परवाना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच विक्री करीता साठविलेल्या बेदाणा पॅकिंग लेबलवरती आवश्यक मजकूर नसल्याचे आढळल्याने सदर पेढीस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
श्री दत्त कोल्ड स्टोरेज ही पेढी देखील विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आणि मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा साठविल्याचे आढळल्याने कीड लागलेली पेंडखजूर या अन्न पदार्थांचे 5 कि.ग्रॅ. चे 110 बॉक्स नष्ट करण्यात आले. या पेढीस व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.