शहाजीबापूंची पुन्हा पलटी, “पवार साहेब वडीलांसारखे”
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आपल्या अमोघ वक्तृत्वाने हजारो लोकांवर प्रभाव टाकणारे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) सातत्याने विविध कारणाने चर्चेत असतात. त्यांची भाषणे दणदणीत होत असली तरी ते आपल्या वक्तव्यावर ठाम राहत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. एरव्ही शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या बापूंनी प्रत्यक्ष शरद पवार हे स्टेजवर असताना जोरदार पलटी हाणली आहे. “दहा वर्षांनंतर पवार साहेबांचे दर्शन झाले. मी भावुक झालो. मी तुमच्या मुलासारखा आहे” असे सांगत चक्क शरद पवार यांनाच कोड्यात टाकले. असे असले तरी स्टेजवरील भाषणांत बापूंच्या भाषणाने हवा केली. (Talking about Sharad Pawar, Shahajibapu Patil became emotional)
सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड यांचा अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) बोलत होते. या वेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमालाताई गायकवाड आदी उपस्थित हेाते.
भावनिक झालो
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आपल्या भाषणात म्हणाले की, “मी आज सकाळी अंघोळ करताना भावनिक झालो. सुमारे दहा वर्षांनी मला आज पवार साहेबांचं जवळून दर्शन होणार होतं. हा योग बाबूराव गायकवाड यांनी घडवून आणला होता. त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. काही व्यक्ती अशा असतात, त्यांना पाहिलं तरी जीवनात एक जिद्द, विचारधारा निर्माण होते. आज त्या रुपाने साहेबांचं दर्शन झालं आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे.”
पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो
सांगोला तालुक्यातील जनतेच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की, साहेबांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, असे भावूक होत आमदार शहाजी पाटील यांनी पवारांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नुसता राडा झाला हुता
“मी आमदार असताना शरद पवार साहेबांनी एक अख्खा दिवस माझ्यासाठी दिला होता. सांगोला तालुयातील जुनोनीपासून कार्यक्रम सुरू केला आणि चिकमहुदला शेवट केला होता. आपण हेलिकॉप्टरने गेला होता, अजितदादांनी आपल्याला हेलिकॉप्टर पाठवले होते. चाळीस हजारांची गर्दी… नुसता राडा झाला हूता…” असे सांगत बापू हे शरद पवारांना जुन्या आठवणीत घेऊन गेले.
सत्कार बाबुराव गायकवाड यांचा, हस्ते शरद पवारांच्या, स्टेजवर इतरही दमदार राजकीय मंडळी… हवा मात्र शहाजीबापूंची असेच काहीसे चित्र या कार्यक्रमात दिसून आले.
आ. शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, “आठवडाभराने मी गायकवाड यांच्या घरी गेलो होतो. तर भिंतीवर पवारसाहेबांचे ४०-५० फोटो होते. भाऊ त्या फोटोकडे दररोज सकाळी बघायचे. कार्यक्रम मी घेतला होता, पैस मी खर्च केलं हुत.. मात्र सर्वात भारी फोटो बाबुराव गायकवाड यांचे निघाले होते.”
“परमेश्वराविषयी ज्या भावना आपल्या मनात निर्माण होतात, त्याच भावना काही व्यक्तींविषयी आपल्या मनात निर्माण होत असतात. गायकवाड यांच्या मनात पांडुरंगाविषयी जेवढ्या भावना आहेत, तेवढ्याच भावना पवारसाहेबांविषयी त्यांच्या मनात आहेत. मी सांगतो साहेब, शंभर वर्षे झाल्याशिवाय ते हार मानणार नाहीत”, असेही पाटील यांनी नमूद केले
साहेब, मी तुमचा मुलगा
आमदार शहाजीबापू पाटील यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत मी तुमच्या मुलासारखा असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, शरद पवार यांच्या सभेत हाच डायलॉग हाणून बापूंनी जोरदार गुगली टाकली.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, “एक अनामिक नातं आहे. तुम्हाला कोणाला माहिती नाही. कदाचित म्हणतो मी साहेब, मी तुमचा मुलगा आहे. सांगोला तालुका आणि बारामतीचं एक अनामिक नातं आहे. ते दैवी आणि भगवंताचं नातं आहे. माणसाचं नातं नाही. श्रीधर स्वामींचा जन्म नीरा नदीकाठी नाझरे येथे झाला. आज जो शिवलिलामृत ग्रंथ वाचला जातोय. त्याचे संपूर्ण भाषेत रुपांतर झाले आहे. श्रीधर स्वामींचा जन्म जरी नाझऱ्यात झाला असला तरी शिवलिलामृत ग्रंथ त्यांनी बारामतीच्या महादेव मंदिरात बसून लिहिला आहे. हे नातं बारामती आणि सांगोल्याचं आहे. म्हणून हे दैवी जिव्हाळे आहेत.”
हवा मात्र शहाजीबापूंची
सत्कार बाबुराव गायकवाड यांचा, हस्ते शरद पवारांच्या, स्टेजवर इतरही दमदार राजकीय मंडळी… हवा मात्र शहाजीबापूंची असेच काहीसे चित्र या कार्यक्रमात दिसून आले.