सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शरद पवारांच्या गाडीचे केलेले सारथ्य, भर स्टेजवर डॉ. बाबासाहेब देशमुखांना जवळ बोलावून शरद पवारांनी धरलेला हात आणि दुसरीकडे भर सभेत शहाजीबापूंनी “पवारांना मी मुलासारखा” असल्याचे सांगून हाणलेली पलटी… हा पॉलिटिकल सिन पाहून सांगोल्याची जनता धन्य झाली… (NCP President Sharad Pawar’s visit to Sangola)
सांगोला तसा दुष्काळी तालुका. मात्र इथली माणसं भोळी भाबडी… एखाद्यावर विश्वास टाकला की टाकला… नेते म्हणतील ती पूर्वदिशा.. एकाच पक्षाला मतदान करून दोन पिढ्या खपल्या.. अशीही माणसं याच तालुक्यात आहेत.. तर एखादा भोंदू बुवा ज्याप्रमाणे येड्यात काढतो तशी भाषणाला भुलून येड्यात निघालेली जनताही इथलीच.. तर असं एकंदरीत वातावरण इथलं आहे..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार म्हटल्यावर एक चैतन्य निर्माण झाले होते.. माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे शरद पवारांच्या अगदी जवळचे असल्याने साहजिकच पवारांच्या गाडीचे सारथ्य त्यांच्याकडे होते.. त्यांनी पवारांची गाडी चालविण्याची ही पहिली वेळ नव्हती. माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण मतदासंघांच्या दौऱ्यात गाडीचे सारथ्य केले होते. मात्र आताच्या संपूर्ण दौऱ्यात दीपकआबांच्याच हातात पवारांच्या गाडीची स्टिअरिंग असल्याने शरद पवार आणि आबा यांचे नाते घट्ट असल्याचे दिसून आले. (NCP leader Deepak Salunkhe-Patil, MLA Shahajibapu Patil Sangola, Dr. Babasaheb Deshmukh Sangola)
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शेकापला साथ न देता विरोधी गटातील शहाजीबापू पाटलांना मदत करून निवडून आणले होते. तेव्हा काही काळ दीपकआबा हे पक्षापासून दूर होते. मधल्या काळात पुन्हा ते सक्रिय झाले आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांना मिळाले. शेकापला मदत न केल्याचा राग शरद पवारांनी कधी दाखवला नाही.(Shetkari Kamgar Paksh Sangola)
शिंदे गटात वजनदार आमदार म्हणून आमदार शहाजीबापू पाटील आहेत. शिंदे गटाची सत्ता आल्यापासून त्यांनी करोडो रुपयांची विकास कामे आणल्याचे सांगण्याचा झपाटा लावला आहे. बापूंच्या फेसबुक पेजवर विविध विकासकामांसाठी मिळालेल्या निधीची रक्कम लाखात, कोटीत आहे.. हे आकडे बघून डोळे दिपून जातात.. मात्र ही विकासकामे नेमकी कुठे सुरू आहेत? जी सुरू आहेत ती किती वर्षांनी पूर्ण होणार? निधी मंजूर झाला पण कामे कधी सुरू होणार? असे अनेक सवाल जनतेच्या मनात आहेत…
बाबासाहेबांचा धरला हात
परवाच्या सभेत शरद पवार यांनी भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जवळ बोलावून बराच वेळ त्यांचा हात धरला होता. हे दृष्य शेकाप कार्यकर्त्यांनी वाऱ्यासारखे व्हायरल केले. चक्क शरद पवार यांनी आपल्या नेत्याचा हात धरला म्हणजे यंदाची निवडणूक फिक्स असाच जणू त्यांचा समज झाला.. त्यामुळे शेकापचे कार्यकर्ते भलतेच खुशीत आहेत. पवारांनी फक्त हात धरून उपयोग नाही.. शहाजी बापूंना निवडून आणण्यात ज्यांचा हात होता त्या दीपकआबांनी शेकापला साथ दिली तरच चित्र बदलू शकते हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. असो…
बापूंचं भलतंच
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील हे बाबुराव गायकवाड यांच्या सत्कार कार्यक्रमात खुद्द शरद पवारांच्या स्टेजवर दिमाखात विराजमान होते. शिंदे गटाची सत्ता आल्यापासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार, अजित पवार, संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली होती. पवारांनीही ही गोष्ट फारशी सिरियस घेतली नव्हती. मात्र, तो मी नव्हेच या आविर्भावात आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांच्या समोरच दणदणीत भाषण केले.
पौराणिक दाखले दिले. “सांगोला आणि बारामतीचे दैवी नाते आहे. तब्बल दहा वर्षानंतर पवार साहेबांचे दर्शन झाले. मी त्यांना मुलासारखा आहे” असे कोड्यात टाकत बापूंनी ३६० अंशात यू टर्न घेतला… नेहमीप्रमाणे टाळ्या मिळाल्या…
विकासाचे काय?
शिंदे गटात वजनदार आमदार म्हणून आमदार शहाजीबापू पाटील आहेत. शिंदे गटाची सत्ता आल्यापासून त्यांनी करोडो रुपयांची विकास कामे आणल्याचे सांगण्याचा झपाटा लावला आहे. बापूंच्या फेसबुक पेजवर विविध विकासकामांसाठी मिळालेल्या निधीची रक्कम लाखात, कोटीत आहे.. हे आकडे बघून डोळे दिपून जातात.. मात्र ही विकासकामे नेमकी कुठे सुरू आहेत? जी सुरू आहेत ती किती वर्षांनी पूर्ण होणार? निधी मंजूर झाला पण कामे कधी सुरू होणार? असे अनेक सवाल जनतेच्या मनात आहेत…
हे झालं बापूंचं…
भाई गणपतराव देशमुख यांनी प्रदीर्घ काळ निष्कलंकपणे तालुक्याचे नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात शेकापची धुरा त्यांच्या दोन्ही नातूंवर आहे. पैकी डॉ. बाबासाहेब देशमुख हे थोडे जास्त सक्रिय असल्याने त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा होत्या.. त्या किती पूर्ण झाल्या? विरोधक म्हणून त्या किती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हे शेकापच सांगू शकेल… आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत हे शेकापचे नेते विसरले असल्याचे दिसून येते.
सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर मिसळून शेकापचे अगदी उत्तमपणे सुरू आहे.. तालुक्यात कोणी विरोधकच असू नये ही भूमिका शेकापने मान्य करून अवलंबली असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते…
“सहकारात राजकारण नको” या भूमिकेतून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेकापने सत्ताधारी गटासोबत साटेलोटे करण्याची घेतलेली भूमिका खूप काही सांगून जाते. सहकारात राजकारण नको म्हणून जसे एक होता.. पदे, जागा वाटून घेता तसेच आमदारकीच्या निवडणूकीतही सर्वांनी एकच उमेदवार देवून बिनविरोध करावा किंवा निवडून आणावा… लोकांची डोकी फोडण्याचे राजकारण टाळावे असाही सूर तालुकावासिय व्यक्त करत आहेत.
डाळींब बागा उध्वस्त.. नेते मात्र मस्त
सांगोला तालुक्यातील शेकडो एकरावरील डाळिंब बागा तेल्या, मर, पिन होल बोरर रोगाने उधवस्त झाल्या आहेत. शेकडो एकर बागा काढून टाकण्यात आल्या आहेत. तालुक्याचे अर्थकारण जोपासणारी डाळिंब बागायती डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत असताना अपवाद वगळता कोणाही नेत्याला याचे सोयर सुतक नाही… तालुक्याचे सुदैव असे की, विदर्भ, मराठवाड्यासारखे इथे कोणी आत्महत्या केल्या नाहीत. मात्र, ती वाट नेते पाहत आहेत का? असाही सवाल उभा राहताना दिसतो… शरद पवार हे सत्तेत नसले तरी त्यांच्या इतकी शेतीची जाण असणारा नेता देशात नाही. सांगोला दौऱ्यात त्यांना विनंती करून हा मुद्दा केंद्रस्थानी आणला असता तर?…. असो..
इकडे सत्तेत असलेले शहाजीबापू भाषणे दणाणून ठोकतात… मात्र त्यांना मुद्दे पुरवणारे लोक डाळिंबाच्या प्रश्नाबाबत अडाणी असल्याने कदाचित बापूंना ही परिस्थिती कळत नसावी… किंवा डाळींब प्रश्नावर बोलल्यावर टाळ्या मिळत नसाव्यात म्हणून ते बोलत नसावेत असे म्हणायलाही वाव आहे…
तालुक्यातील विरोधी पक्ष ही भूमिका मानायला तयार नसलेल्या शेकापकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. नष्ट होणारी डाळींब बागायती किंवा तालुक्याच्या विविध प्रश्नांवर रान उठवून जनतेचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे नैतिक कर्तव्य शेकापचे असताना ते त्यांनी केले नाही…
शेकापने सत्तेशी लगट सुरू केल्याने, विरोधी पक्ष म्हणून त्यांची बाजू लुळी पडल्याने तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे…
असो… जशी जनता असते तसे नेते वागत असतात… ही नेत्यांची चूक नाही… जनताच या परिस्थितीला कारणीभूत आहे असे म्हणायला वाव आहे…
आबांचे ड्रायव्हिंग, बाबासाहेबांचा पवारांनी धरलेला हात, बापूंची पलटी हे सर्व साक्षात डोळ्यांनी पाहून जनता धन्य झाली एवढे मात्र नक्की…