ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

जळत्या चितेच्या उजेडात ती शिकली.. तहसीलदाराने दत्तक घेऊन शिकवलं.. लेकीचा उद्या लग्न सोहळा

सांगोला स्मशानभूमीतील मसनजोगी कुटुंबाची थरारक कहाणी

Spread the love

प्रेतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मसणजोगी कुटुंबात जन्मलेली “ती” जळत्या चितेच्या उजेडात शिकली.. तिची शिक्षणाची जिद्द पाहून तहसीलदाराने दत्तक घेऊन तिला शिकवलं.. तिचा उद्या (रविवारी) मोठ्या दिमाखात लग्न सोहळाही होतोय… आंबेडकरी विचारांचा प्रभाव असलेल्या या कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तहसीलदार संजय खडतरे आणि बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केलेले प्रयत्न शब्दात वर्णन करण्यापलीकडचे आहेत.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
“सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥” संत तुकारामांनी केलेलं हे वर्णन सार्थ ठरवणारी चित्रपट कथेला साजेशी ठरणारी घटना सांगोला शहरातील स्मशानभूमीत घडली आहे. प्रेतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मसणजोगी कुटुंबात जन्मलेली “ती” जळत्या चितेच्या उजेडात शिकली.. तिची शिक्षणाची जिद्द पाहून तहसीलदाराने दत्तक घेऊन तिला शिकवलं.. तिचा उद्या (रविवारी) मोठ्या दिमाखात लग्न सोहळाही होतोय… आंबेडकरी विचारांचा प्रभाव असलेल्या या कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तहसीलदार संजय खडतरे आणि बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केलेले प्रयत्न शब्दात वर्णन करण्यापलीकडचे आहेत.

दगडाचं काळीज असलेल्या माणसालाही पाझर फुटेल अशी ही सांगोला येथील घटना आहे. बीड येथे भीक्षा मागून, पिना, फुगे विकत संसाराचा गाडा हाकणारे लक्ष्मण घनसरवाड कुटुंबीय भाकरीचा शोध घेत सांगोला शहरात आलं. लक्ष्मण घनसरवाड यांना एकूण पाच लेकरं. सांगोल्यात आल्यावर मारुतीआबा बनकर नगरसेवक असताना २०१६ मध्ये त्यांनी सांगोला स्मशानभूमीत काम मिळावे म्हणून अर्ज केलेला होता. एप्रिल २०१७ मध्ये स्मशानभूमीत सफाई कामगार म्हणून त्यांना काम मिळाले.

संघर्षमय परिस्थितीत शिकलेली अनुराधा घनसरवाड.

सुरुवातीला लक्ष्मण घनसरवाड हे सोबत पत्नी व धाकटा मुलगा घेऊन स्मशानभूमीत राहायला आले. कारण इतर मुलांचे शिक्षण बीडमध्ये चालू होते. येथे स्मशानभूमीत राहण्यासाठी घर नव्हते. हे सर्वजण जळत्या चितेकडे पाहत सुरुवातीस उघड्यावर राहत होते. सहा महिन्यानंतर नगरपालिकेने ठराव घेतला. परंतु नगरपालिकेने लवकर घर बांधून दिले नाही. उन्ह, वारा , पाऊस यांचा सतत त्रास होत होता. बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे हे स्मशानभूमित अंत्यविधीसाठी आले असताना ही परीस्थिती पाहून त्यांनी प्रशासनाला जागे केले. त्यानंतर शासकिय खोल्यांचे बांधकाम मार्गी लावले.

याच कुटुंबातील द्वितीय कन्या म्हणजे अनुराधा ही जळत्या चीतेच्या उजेडात शिकली. शिक्षण घेऊन मोठे व्हावे असे तिचे स्वप्न होते. मात्र परिस्थिती आडवी येत होती.

अंत्यविधीला आलेले लोक लक्ष्मण घनसरवाड यांची विचारपूस करित होते. तेव्हा सांगोला शहरातील व परिसरातील लोकांना कळाले की, मसनजोगी हा समाज व त्यांचे कुटुंब स्मशानभुमी सांगोला येथे वास्तव्यास राहत आहे.

२०१८ साली बापूसाहेब ठोकळे, बापूसाहेब भाकरे, दादा कटरे, अरविंद केदार, तहसिलदार संजय खडतरे असे विविध सामाजिक व राजकिय लोक दिवाळी सणानिमित्त स्मशानभूमीत या कुटुंबासाठी फराळ घेवून दिवाळी साजरा करायला आले होते. या कुटुंबाची त्यावर्षीची दिवाळी आनंदात व उत्साहात साजरी झाली. अस्तित्व समाज विकास संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, आपुलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनीही या कुटुंबास मोठी मदत केली आहे. याशिवाय मानवता एक्स्प्रेसचे संपादक दिवंगत दादासाहेब मागाडे यांनीही मोलाचे बळ दिले होते.

लक्ष्मण घनसरवाड यांची थोरली मुलगी २०१५ ला इयत्ता १० वीला ९१.२० % ऐवढे गुण घेऊन उत्तीर्ण झाली. गरीब परिस्थितीत शिक्षकांच्या मदतीने अभ्यास करून गुणवंत यादित आली. ही बातमी लोकमत, झी २४ तास आणि ए.बी.पी. माझा अशा विविध वृत्तवाहिन्यांवर झळकली. माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. महाराष्ट्रातील लोकांनी खूप मदत केली. पुढील उच्च शिक्षण करण्याची लक्ष्मण घनसरवाड यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. पण महाराष्ट्रातील लोकांनी आर्थिक मदत केली व पूजाचे पुढील शिक्षण पुर्ण होवू शकले.

ही सर्व परिस्थिती बहुजन नेते बापुसाहेबांनी तहसिलदार संजय खडतरे यांना सांगितली. सांगोला येथील तत्कालीन नायब तहसीलदार संजय खडतरे यांनी लक्ष्मण घनसरवाड यांची द्वितीय कन्या म्हणजे अनुराधा हीस शिक्षण व लग्नासाठी दत्तक घेतले. तीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी तीच्या इयत्ता बारावीपासून तर B.S.C. Coumputer होईपर्यंत सर्व खर्च केला. तहसीलदार खडतरे यांनी स्वतःच्या मुलीइतकी माया केली. प्रत्येक वस्तू पुरवली. तिला दत्तक पालक मिळाले व त्यांच्या मदतीने तिचे शिक्षण झाले. शिवण क्लास, पार्लर, संगणकाचे शिक्षण पूर्ण होवू शकले.

मूळचे सांगोला व सध्या पुणे येथे येथे कार्यरत असलेले तहसीलदार संजय खडतरे.
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे.

उद्या थाटामाटात होतोय विवाह सोहळा
उद्या रविवार,१४ मे रोजी अनुराधा हीचा विवाह थाटामाटात होणार आहे. स्वतःच्या मुलीइतकाच भव्य दिव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत असलेले संजय खडतरे हे स्वखर्चातून हे लग्न लावून देत आहेत. ते स्वतः कन्यादान करणार आहेत. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.

लग्न पत्रिका

हे जे सहकार्य मला मिळाले ते परिवर्तनवादी विचार व दलित पँथर चळवळीमुळे शक्य झाले. माझ्या मुलीचे शिक्षण व लग्नाचा खर्च तहसीलदार संजय खडतरे यांनी केल्यामुळे माझ्यावरचे आर्थिक ओझे व मानसिक ओझे कमी झाले. त्यामुळे मी तहसिलदार संजय खडतरे साहेबांचा ऋणी आहे. त्यांनी केलेल्या या कार्याला आम्ही भविष्यात कधीही विसरणार नाही. – लक्ष्मण घनसरवाड (मो. ७२६४९३०९९४)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका