थिंक टँक स्पेशलराजकारण

चोरबाजारात राहुल आणि काँग्रेसची शेंदाड फौज

विजय चोरमारे यांचा खणखणीत लेख

Spread the love

नपुंसकाच्या चारित्र्याला किंमत नसते असे म्हणतात, त्याच धर्तीवर काँग्रेसजनांच्या अहिंसेला काडीची किंमत नाही, असे म्हणता येईल….असल्या शेंदाड फौजेसाठी राहुल गांधी यांनी जिवावरच्या जोखमी घेऊ नयेत, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

प्रवीण तोगडिया नामक एक हिंदु हृदयसम्राट होते. नव्वदनंतरच्या काळात ते जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा भाषणात सतत म्हणायचे, सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात, परंतु सगळेच दहशतवादी मुस्लिम कसे? त्यांचे हे वाक्य आता आठवण्याचे कारण म्हणजे अशाच आशयाच्या एका वाक्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे आणि पाठोपाठ त्यांच्यावर खासदारकीवरही गंडांतर आले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटकातील कोलारमधील एका सभेत त्यांनी `सगळेच मोदी चोर कसे?` असा प्रश्न विचारून ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांची नावे घेतली होती. त्यावरून गुजरातचे आमदार पूर्णेश मोदी यांनी बदनामीचा खटला दाखल केला आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यापर्यंत कारवाई पुढे गेली.

राहुल गांधी यांना गुजरातमधल्या जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्या शिक्षेच्या गुणवत्तेची चर्चा वरच्या न्यायालयात होईल. उच्च न्यायालयात होईल किंवा नाही सांगता येत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयात नक्की होईल, अशी आजघडीला तरी आशा वाटते. ही लढाई न्यायालयीन पातळीवर लढली जाईल. काँग्रेसपक्ष राजकीय पातळीवर फारसा निकराने लढेल, असे वाटत नाही. परंतु त्यापलीकडे जाऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ताजी वक्तव्ये बघितली तर त्यांची कीव वाटल्यावाचून राहात नाही.

राहुल गांधी यांचे वक्तव्य तेली समाजाचा आणि ओबीसी समाजाचा अपमान करणारे असल्याचा शोध अचानक भाजपच्या या दोन अध्यक्षांना लागला आहे. गड्डा यांच्या मेंदूत खड्डा पडला आहे काय, अशी शंका आल्यावाचून राहात नाही. नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत आणि हा समाज ओबीसीमध्ये येतो ही वस्तुस्थिती आहे. पण नीरव मोदी, ललित मोदी यांचीही नावे घेतली. नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीचे नाव घेतले. विजय मल्ल्या, अनिल अंबानी यांचीही नावे राहुल गांधी यांनी घेतली आहेत. भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणून ही नावे घेतली आहेत. या सगळ्या लुटारूंची नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली जवळिक लक्षात आणून देण्यासाठी ही नावे घेतली आहेत. राहुल गांधी त्या सभेत म्हणाले होते, “चोरांचा ग्रूप आहे, चोरांची टीम आहे. तुमच्या खिशातून पैसे काढतात, शेतक-यांचे पैसे हिसकावून घेतात, छोट्या दुकानदारांकडून पैसे घेतात आणि त्याच पंधरा लोकांना वाटून टाकतात. तुम्हाला सांगतात काळ्या पैशाविरुद्ध लढाई, तुम्हाला भर उन्हात बँकेपुढे रांगेत उभे करतात, तुमच्या खिशातून पैसे काढून बँकेत भरायला भाग पाडतात आणि तुम्हाला एके दिवशी कळते की, तुमचे पैसे घेऊन नीरव मोदी पळून गेला. ३५ हजार कोटी रुपये तुमच्या खिशातून काढून त्यांच्या खिशात घातले. मेहुल चोक्सी, ललित मोदी वगैरे. एक छोटासा प्रश्न या सगळ्या चोरांचे नाव मोदी कसे – नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी… आणखी शोधले तर आणखी काही मोदी सापडतील.“

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला, असे म्हणणा-यांच्या माहितीसाठी सांगावे लागते की, नीरव मोदीच्या कुटुंबात सात पिढ्यांपासून हि-यांचा व्यवसाय केला जातो. १९४०मध्ये नीरव मोदी यांचे वडिल हि-यांच्या कारभारासाठी बेल्जियमला गेले. पुढे मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून हिरे व्यवसाय शिकण्यासाठी नीरव मोदी भारतात परत आला. दोघा मामा-भाच्यांनी मिळून भारतीय बँकांना चौदा हजार चारशे कोटींचा चुना लावून ते देश सोडून पळून गेले. या चोरांना चोर म्हटले म्हणून ओबीसी समाजाचा अपमान झाला, असे नड्डा, बावनकुळे म्हणतात, याची गंमत वाटल्यावाचून राहात नाही.

आयपीएलचे जनक ललित मोदी यांचा जन्म दिल्लीतील एका मारवाडी कुटुंबात झाला. ललित मोदीचे वडिल कृष्णकुमार हे चार हजार कोटींच्या मोदी समूहाचे अध्यक्ष. त्याचे आजोबा राजबहादूर गुजरमल मोदी यांनी मोदीनगर वसवले. आयपीएल २०१० संपल्यानंतर ललित मोदी यांना दुराचार, नियमबाह्य वर्तन आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून बीसीसीआयने निलंबित केले. बीसीसीआयने त्यांची चौकशी सुरू केली आणि चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली. त्यांच्या आर्थिक अनियमिततांच्यासंदर्भात ईडीने चौकशी सुरू करण्याच्या काही काळ आधी ललित मोदीनी लंडनला पलायन केले. या ललित मोदीला चोर म्हटले म्हणून ओबीसींचा अपमान झाला, असे नड्डा-बावनकुळे म्हणतात.
नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलावे.? अख्खा देश गौतम अदानीच्या नावाने शंख करतोय, पण नरेंद्र मोदींनी त्याचे नावसुद्धा उच्चारलेले नाही. राफेल सौद्यांबाबत, अनिल अंबानींना दिलेल्या कंत्राटांबद्दल बरीच चर्चा झाली. परंतु रंजन गोगोई यांच्या सरन्यायाधीशपदाच्या काळात सगळ्या व्यवहाराला क्लीनचीट मिळाली, त्याचे बक्षिस म्हणून गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली, हा फार जुना इतिहास नाही. एक अकेला सबपर भारी हे भाषणात ठीक आहे, पण ते गौतम अदानीशी काय नाते आहे हेही सांगून टाकावे एकदा.

खरेतर एखाद्या समूहाचा अवमान होईल असे वक्तव्य कुणीही जबाबदार राजकीय नेत्याने करावयास नको. राहुल गांधी यांच्या वक्तव्याकडे नीटपणे पाहिले तर लक्षात येते की, तिथे कुठल्या समूहाचा संबंध नाही. पूर्णेश मोदी आणि आता भाजपच्या नेत्यांनी ते समूहावर ओढून घेतले आहे. कारण त्यांना त्याचे राजकारण करावयाचे आहे.

• राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली शुक्रवारी दुपारच्या आधीच. काँग्रेसजनांनी टीव्हीवर बाईट देऊन कर्तव्य पार पाडले. कुठेतरी चार-दोन ठिकाणी निदर्शने झाली असतील तेवढेच. बाकी शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी साजरी करून, आराम करून ताजेतवाने होऊन सोमवारी म्हणे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या इतिहासातील दुर्मीळ असा प्रसंग आला असताना दोन दिवस विश्रांती घ्यावीशी वाटते, यातच काँग्रेसची सरंजामी वृत्ती दिसून येते. अशा आळशी पक्षाला परमेश्वरही वाचवू शकणार नाही.

• राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर सायंकाळी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी होते. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा विषय असताना अभिषेक मनू सिंघवी यांनी पहिल्यांदा इंग्रजीत भूमिका मांडली. काँग्रेसने इथे देशापेक्षा राहुल गांधींचा वायनाड मतदारसंघच नजरेसमोर ठेवलेला दिसतो. सिंघवी यांचे निवेदन इंग्रजीत असल्यामुळे थोड्या वेळातच काही वाहिन्यांनी पत्रकार परिषदेचे थेट प्रसारण थांबवून त्या इतर बातम्यांकडे वळल्या. मुळात काँग्रेसची पत्रकार परिषद दाखवण्यासाठी कुणी उत्सुक नसावे. त्यात इंग्रजीतल्या निवेदनामुळे हिंदी, मराठी वाहिन्यांना आयती संधी मिळाली. धोरणात्मक पातळीवर किती गचाळपणा असावा, याचेही उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल.

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष तातडीने बरखास्त केला तरी फारसा फरक पडणार नाही. विधिमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले जातात आणि त्यावर पक्षाकडून एका पत्रकापलीकडे प्रतिक्रिया उमटत नाही. नपुंसकाच्या चारित्र्याला किंमत नसते असे म्हणतात, त्याच धर्तीवर काँग्रेसजनांच्या अहिंसेला काडीची किंमत नाही, असे म्हणता येईल. राहुल गांधी यांच्या फोटोला विधिमंडळाच्या आवारात जोडे मारले गेले असताना काँग्रेसजन स्वस्थ कसे बसू शकतात, हाच खरा प्रश्न आहे.

असल्या शेंदाड फौजेसाठी राहुल गांधी यांनी जिवावरच्या जोखमी घेऊ नयेत, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.


विजय चोरमारे यांचे गाजलेले लेख

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका