भाईंची देवराई प्रकल्प प्रेरणादायी : डॉ. विधीन कांबळे
देवराईत 25 घरट्यांची सुविधा
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
मानवाला जगण्यासाठी पोषक पर्यावरण आवश्यक आहे आणि हे कार्य निसर्ग मुक्तपणाने करत असतो. परंतु मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे संपूर्ण पर्यावरण व परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. ज्या योगे ते मानवी जीवणास हानिकारक ठरत आहे. अशाचवेळी आपल्या सांगोला तालुक्यात स्व.आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या नावाने जो प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, तो भावी पिढीला पर्यावरणाचे महत्व पटवून देणारा आहे. हे काम खूपच उचित ठरणारे आहे. परंतु समाजातील अनेक लोक पृथ्वी वरील जीवांच्या कल्याणासाठी आपले योगदान देत असतात. त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यात अनेक संस्था आणि व्यक्ति त्यासाठी प्रयत्नशील आहेत, ही फार महत्वाची बाब आहे. पर्यावरण संवर्धनाचे काम करणारा भाईंची देवराई हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी तथा डॉ. विधिन कांबळे यांनी केले.
सांगोला हा दुष्काळी तालुका असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात मानवाच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्याबरोबरच वन्यप्राणी,पक्षी यांच्या जगण्याचा संघर्ष अधिक गंभीर होत असतो. याचा हेतूने यांनी सांगोला तालुक्यात प्राणी-पक्षी प्रेमी ग्रुप सातत्याने प्रयत्न करीत असून, सांगोला महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. विधिन कांबळे यांच्या मार्गदशनात विविध उपक्रम गेली ८ ते १० वर्ष राबवले जात आहेत.
रविवार 26 मार्च रोजी भाईंच्या देवराईत सांगोला येथील पक्षी प्रेमी ग्रुपच्या वतीने घरट्याचे नियोजन करण्यात आले होते. सांगोला तालुक्यात वारंवार पत्रकार राजेंद्र यादव व डॉ. विधिन कांबळे, प्राणी- पक्षी ग्रुपच्या सदस्यांच्या पुढाकाराने सांगोला तालुक्यातील सार्वजनिक उद्याने शासकीय इमारती, इत्यादि ठिकाणी पक्ष्यांसाठी घरटी व पिण्याच्या पाण्याची सोय प्रत्येक उन्हाळ्यात केली जाते. सांगोला शहर व तालुक्यातील अनेक गावात पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या अंगणात पाण्याची सोय अनेक विद्यार्थी व नागरिक करीत असतात. हे पक्षी प्रेमी ग्रुपने सुरू केलेल्या चळवळीचे फलित आहे.
मागील ८-९ वर्षांपासुन २० ‘मार्च जागतिक चिमणी दिनाच्या’ निमित्ताने ग्रुपच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची घरटी व व पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांडी बसवण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना, विविध संस्था व नागरिकांना पक्ष्यांची घरटी मोफत वाटण्यात येतात.
प्रा. डॉ. विधिन कांबळे यांनी स्वखर्चाने अनेक प्रयोगानंतर मातीपासून पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत. ही घरटी लाकडी किंवा कागदी घरट्या पेक्षा खूप प्रभावी आहेत. चिमण्या व इतर लहान पक्षीही घरटी जलद वेगाने स्वीकारतात असे निरीक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात चिमण्यांची संख्या मागील ७-८ वर्षांच्या तुलनेत झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. त्यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद व सहभाग लाभत आहे. सुमारे ५ हजार घरट्यांचे वाटप करण्यात आले आहे.
आम्ही प्राणी-पक्षीप्रेमी ग्रुप मध्ये सांगोला तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, सामान्य नागरिक व पक्षी प्राणी प्रेमी मंडळी मोठ्या हिरीरीने सहभागी होत असतात.
दरवर्षी वन विभाग सांगोला व आम्ही प्राणी-पक्षी प्रेमी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पक्षीप्रेमी ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी वन विभाग सांगोला यांच्या वतीने पक्षीप्रेमी ग्रुपच्या सदस्यासाठी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येते. हा दिवस सदस्यांसाठी खूप आनंदाचा व अविस्मरणीय दिवस असतो.
आज भाईंची देवराईमध्ये वृक्ष सवर्धनाबरोबरच पक्षी संवर्धन होण्याच्या उद्देशाने पक्ष्यांसाठी घरटी बसवण्यात आली. सांगोला सारख्या दुष्काळी तालुक्यात वन संवर्धन होण्यासाठी नाना हालंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम ही प्रेरणादाई असून,ही चळवळ गावोगावी घेतली पाहिजे. अशी भावना व्यक्त करून यांचे प्राणी-पक्षी प्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी कौतुक केले.
यासाठी आम्ही प्राणी- पक्षीप्रेमी ग्रुपचे प्रा. डॉ. विधिन कांबळे, त्यांची पत्नी तेजश्री कांबळे, पत्रकार राजेंद्र यादव, सर्पमित्र प्रशांत नकाते,राजू गेजगे सर,संतोष करांडे,बंडू वाघमोडे,प्रकाश भुसनर, दादासो भूसनर,अजय साळुंखे,संजय पाटील उपस्थित होते.