थिंक टँक स्पेशलराजकारण

शरद पवारांच्या निवृत्तीनंतर कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ का?

संजय आवटे यांचा खळबळजनक लेख

Spread the love

शरद पवार पायउतार झाले आणि या पक्षाचे कौटुंबिक प्रारूप उघड झाले. जणू काही हा पवार कुटुंबाचा झमेला आहे, असे स्वरूप या ‘वाटणी’ला आले. पक्षासाठी जिवाचे रान करणारी माणसं एकटी पडली. अगतिक झाली. उद्या काय होईल, या काळजीनं भांबावली. नव्या अध्यक्षांकडे बहुसांस्कृतिक समज नसेल, तर अनेकांचे राजकीय करीअर तर संपेलच, पण विचारधारा म्हणूनही दीर्घकालीन नुकसान होईल… या विचाराने ती शोकव्याकुळ झाली.


“शरद पवारांच्या निवृत्तीनंतर कार्यकर्ते आणि नेतेही एवढे का रडताहेत?”, असा मध्यमवर्गीय प्रश्न अनेक फेसबुकी विचारवंतांना पडतोय. जणू काही शरद पवार आता ८३व्या वर्षी प्रतिभाताईंसोबत दररोज बागेत फिरायला जाणार आहेत, असेही अनेकांना रोमॅंटिक वाटू लागले आहे.

कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ आहेत.
त्याला कारण आहे.
ही निवृत्ती नाही.
निर्णय आहे.
नवा मार्ग आहे.
मुख्य म्हणजे,
सत्तांतर आहे.

शरद पवार पक्षाचे अध्यक्ष असणे ही गोष्टच वेगळी. शरद पवारांच्या राज्यात पारंपरिक राजकारणाची स्पेस होती. सरंजामी सरदारांनाही जागा होती. पण, त्याचवेळी, आर. आर. पाटील होते आणि हसन मुश्रीफ- नवाब मलिकही होते. मधुकर पिचड होते आणि फौजिया खानही होत्या. सक्षणा सलगर होती आणि मेहबूब शेखही होता. जयदेव गायकवाड होते आणि जितेंद्र आव्हाड – छगन भुजबळही होते.

पक्षाला भाजपच्या दावणीला बांधणा-या अजित पवारांना परतीचे दरवाजे खुले असले तरीही जयंत पाटलांना स्पेस होती. ॲकॅडॅमिशियन ॲड. वंदना चव्हाणांपासून डॉ. जनार्दन वाघमारेंपर्यंत आणि विद्या चव्हाणांपासून ते रूपाली चाकणकरांपर्यंत सगळ्यांना आपला आवाज होता. ‘शरद पवार’ या नावालाच आदर्शवाद मानून चांद्यापासून बांद्यापर्यंतची सर्व समूहातली माणसं उभी राहिली. हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे, याची त्यांना खात्री वाटली.

शरद पवार पायउतार झाले आणि या पक्षाचे कौटुंबिक प्रारूप उघड झाले. जणू काही हा पवार कुटुंबाचा झमेला आहे, असे स्वरूप या ‘वाटणी’ला आले. पक्षासाठी जिवाचे रान करणारी माणसं एकटी पडली. अगतिक झाली. उद्या काय होईल, या काळजीनं भांबावली. नव्या अध्यक्षांकडे बहुसांस्कृतिक समज नसेल, तर अनेकांचे राजकीय करीअर तर संपेलच, पण विचारधारा म्हणूनही दीर्घकालीन नुकसान होईल… या विचाराने ती शोकव्याकुळ झाली.

शरद पवारांच्या पश्चात एखादा अध्यक्ष निवडला गेला असता, तर त्याला विरोध तरी करता येणे शक्य होते. पवारांच्याच समोर नव्या अध्यक्षांना स्वीकारणे ही जोखीम! त्याला पुन्हा विरोध करणे ही त्याहून मोठी पंचाईत.

अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत आहेत, त्यात एकही नाव असे नाही, ज्याच्याविषयी ही बहुसांस्कृतिक खात्री आहे आणि त्याला तशी प्रगल्भ राजकीय समजही आहे!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यानंतरचा प्रवास त्यामुळेच खडतर असणार आहे.
आधीच या पक्षाची मोठी व्होटबॅंक उद्धव यांच्या शिवसेनेने बळकावली आहे. शिवसेनेकडे सध्या एवढ्या संख्येने दलित आहेत की प्रकाश आंबेडकरांनाही शिवसेनेसोबत जाण्यात राजकीय शहाणपण वाटते. चक्क मुस्लिमही शिवसेनेसोबत येताहेत.

याउलट, राष्ट्रवादीचे तेज कमी होते आहे.
अनेक समाजघटक दुरावताहेत.
मुद्दा तेवढाच नाही.
भाजपला दूर करण्यासाठी महाराष्ट्रात चमत्कार करूनही पवारांविषयी लोकांना खात्री वाटत नाही. शरद पवार कधीही ‘गडबड’ करतील, असे संशयाचे धुके पूर्वीपासून होते. तरीही एकवेळ पवारांविषयी आशा असते. अजित पवार तर संशयाची चादरच ओढून बसलेले आहेत.
चिंता ती आहे.

शरद पवार हे या देशातले पहिले ‘करिअरिस्ट पॉलिटिशियन’.
अजित पवार हे व्यावसायिक, व्यवहारकुशल आणि मुत्सद्दी असे ‘स्टेट्समन’.
सुप्रिया म्हणजे या दोघांचे मिश्रण. त्या उत्तम संसदपटूही. पण, फरक इतकाच की, अद्याप तरी त्यांच्यासोबत तसे ‘केडर’ नाही. ‘स्टेट्सवुमन’ म्हणूनही त्यांना आणखी प्रवास करायचा आहे. थेट नेतृत्वाचा कस त्यांचा आणखी लागायचा आहे.
जयंत पाटील हे महत्त्वाचेच नेते, पण त्यांचे स्थान काय, हे आणखी कळायचे आहे.

अशावेळी, नवा अध्यक्ष कसा असेल?
“आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल”… असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे!
तो मुत्सद्दी आहे, पण सरंजामी आणि तत्त्वशून्य असेल तर?
अथवा ‘लिबरल’ आणि ध्येयवादी आहे, पण तसा मुत्सद्दी नसेल, तर?
सारे आहे, पण केडरला मान्य नसेल तर?
काळ असा आहे की, अशावेळी पक्षात राहण्याचा निर्णयच आत्मघातकी ठरू शकतो.

भवताल कठीण आहे आणि ही अनेकांच्या परीक्षेची घडी आहे.
कार्यकर्ते आणि नेतेही रडताहेत, तो केवळ भावनिक उमाळा नाही.
त्याला ही व्यावहारिक कारणे आहेत.

– संजय आवटे 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका