शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, भाई कै. गणपतराव देशमुख हे देशातील विक्रमीवेळा निवडून आलेले आमदार. त्यांना लोक आदराने ‘आबासाहेब’ संबोधतात. आबासाहेबांचा आणि एसटीचा तसा जवळचा संबंध. आबासाहेबांनी आयुष्यभर एसटीतून प्रवास केला. एरव्ही आमदारकीच्या पहिल्या टर्मलाच ५० लाखांच्या अलिशान कारचा धुरळा उडवणारे आमदार एकीकडे तर दुसरीकडे साध्या लालपरितून राज्यभर प्रवास करणारे आबासाहेब हे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेय. आबासाहेबांचे काही महिन्यांपूर्वी निधन झालेय. त्यांनी स्वतः एसटीतून प्रवास करून एसटीसोबत ऋणानुबंध तर जोडलेच होते शिवाय कामगारांच्या विविध प्रश्नांवरही ते आवाज उठवत होते. आज आबासाहेब हयात नाहीत. ते असते तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विधिमंडळाला हादरवून सोडले असते.
आबासाहेब तथा गणपतराव देशमुख यांना लिहिलेले अनावृत पत्र..
प्रिय आबासाहेब…
तुम्हाला जाऊन तीन महिने सरले. तुमची आठवण येत नाही असा एकही दिवस नाही. तुम्ही आता आमच्यामध्ये राहीला नाही याचं दुःख आज खूपच जाणवत आहे. कारण आयुष्यभर तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या लाईफ लाईन (एस.टी) ने प्रवास केला ती आणि तिचे कर्मचारी आज संकटांत असताना तुमची उणीव नक्कीच भासत आहे. आज जर तुम्ही असता तर नक्कीच यासाठी आवाज उठवला असता. कारण ज्या एस. टी मध्ये आमदारांना एक सीट राखीव असते तीचा उपयोग घेणारे तुम्ही एकमेव आमदार होता.
सध्या सत्तेत असणारे सर्वपक्षीय आमदार हे फक्त सत्ता उपभोगण्यासाठी सत्तेत आहेत आणि जी सत्ता माणसांना घायकुतीला आणते, मरणाच्या दारात उभी करते ती सत्ता मुरदाड असते. निष्प्राण देहासारखीच इथली व्यवस्था मुरदाड झालीय. त्यांना सर्वसामान्य लोकांच्या समस्यांची काही जाणीव उरली नाही.
आबा, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार होत नाही. मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याची योग्य सोय नाही. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही. अशा एक ना अनेक समस्यातून सध्या एस. टी आणि त्यांचे कर्मचारी जात आहेत. ज्या एस. टी.मध्ये आमदारांना सीट राखीव असते त्याचा सदुपयोग घेणारे तुम्ही एकटेच. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या व्यथा समजल्याही असत्या आणि तुम्ही त्यांना न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्नही केला असता. सद्यस्थितीत सरकार आणि विरोधक कोणालाही राजकारण करण्याव्यतिरिक्त काही घेणंदेणं उरलं नाही.
खरं तर महाराष्ट्र शासनाने विधानसभा, विधानपरिषद आमदारांना एस.टी.तील रिझर्व्ह सीट बंद करायला हरकत नाही. कारण कधी त्यांनी त्या गोष्टीचा उपयोग केला नाही. त्यांना कधी त्यांचं महत्त्व कळलं नाही. जोपर्यंत एसटीत राखीव असलेल्या लोकप्रतिनिधींच्या सिटवरती बसून न लाजता लोकप्रतिनिधी प्रवास करण्यास सुरुवात करत नाहीत तोपर्यंत एसटी अडचणीतच राहणार.
महाराष्ट्रासाठी एस.टी. का आणि किती महत्वाची आहे बघायचं असेल तर आता आपल्या शेजारच्या कुठल्याही एसटी स्टँड वर जाऊन बघावं “लूट मची है बाजार मैं” अशी परिस्थिती आहे. एस.टी. कर्मचारीही माणसं आहेत. त्यांनाही कुटुंब आहे आणि घर फक्त आश्वासनावर चालत नाही. मागच्या सरकारच्या काळात एस.टी. संपाला पाठिंबा देणारे आता स्वतः सत्तेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्या मागण्या मान्य करून योग्य तो मोबदला कर्मचाऱ्यांना कसा मिळेल हे सरकारने बघितले पाहिजे. सरकारला हे दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्यावरची पट्टी जनताच काढेल येणाऱ्या निवडणुकीत.
सरकार कुठलंही असो ते दिखाऊपणा करण्यात तरबेज असतं. एसटी कामगारांवरही सर्वच पक्षांच्या सरकारांनी डोळेझाकच केलीय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या तळ्यात मळ्यात करण्यानं या कामगारांना मात्र नैराश्याचं जीवन जगावं लागतंय. सामान्यांशी थेट कनेक्ट असलेल्या या बांधवांना न्याय मिळायलाच हवा.
आबा… तुम्ही आज असता तर एसटीच्या राखीव सीटची किंमत काय असते आणि कशी करायची हे तुम्ही नक्कीच दाखवून दिलं असतं. बघा जमलं तर या मुर्दाड झालेल्या व्यवस्थेतील तुमच्या एखाद्या सहकाऱ्यांना स्वप्नात जाऊन या गोष्टीची जाणीव करून द्यावी. काही फरक पडलाच तर कोणीतरी या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची उपेक्षा ठेवून थांबतो.
(थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे)