गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले
सोमाआबा मोटेंनी करून दाखविले
सांगोला/ नाना हालंगडे
सबसे कातिल गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलचं नाव पोहोचलं आहे. राज्यातल्या कोणत्याही भागात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असो, लोकांची तुफान गर्दी होते. लोकं झाडावर चढून, घराच्या-दुकानाच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहताना दिसतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा झालाच पाहिजे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा असं जणून समीकरणंच बनलं आहे. मात्र, सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासपचे नेते सोमाआबा मोटे यांनी आयोजित केलेला गौतमीचा कार्यक्रम शांततेत आणि दणक्यात पार पडला. गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.. सोमाआबा मोटेंनी करून दाखविले अशाच शब्दांत याचे वर्णन करावे लागेल.
रासपचे नेते सोमाआबा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाढदिवस म्हटले की, जाहिराती, बॅनरबाजी असा “वायफळ” खर्च आलाच. मात्र, हा खर्च टाळून, अशा “वायफळ” खर्चाला फाटा देवून एक उदात्त सामाजिक हेतू ठेवून गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तगडा पोलीस बंदोबस्त
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला (Sangola) तालुक्यात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमाआबा मोटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी पाहाता सांगोल्यातील कार्यक्रमात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला होता.
यात तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात होते. पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटे यांनी पाच लाख रुपये पोलीस स्टेशनला जमा केले.
कार्यक्रमापेक्षी बंदोबस्ताचा खर्च जास्त
गौतम पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, वाद आणि मारहाण असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबरोबरच पेड पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांना पैसै द्यावे लागणार आहेत.
म्हणजेच गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. त्याची झलक सांगोला तालुक्यातील पोलीसांनी दाखवून दिली. गौतमी पाटीलचा कार्यक्रम घ्यायचा आहे ना, तर मग तगडा बंदोबस्त तैनात केला तरच कार्यक्रमास परवानगी मिळेल. बंदोबस्त फुकट दिला जाणार नाही. कारण हा सामाजिक हिताचा उपक्रम नव्हे. या धोरणातून राज्यात सर्वत्र हा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.
सोमाआबांचे धाडस
सांगोला तालुक्यातील महुद तसेच इतर भागात गौतमी पाटील हिच्या लावणीचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र, घेरडी, जवळा परिसरात प्रथम हा कार्यक्रम घेण्याचे धाडस सोमाआबांनी दाखविले. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम असल्याने कार्यक्रम यशस्वी झाला. गौतमी पाटील हिचे रग्गड मानधन, दणदणीत साऊंड, स्टेज, पोलीस बंदोबस्तावर केलेला खर्च यातून सोमा मोटे यांची आर्थिक ताकद दिसून आली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.