थिंक टँक स्पेशल

बुद्धांचा कुशलकर्म सिद्धांत

यशवंत भंडारे

Spread the love

कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, असं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं. यासच धम्माचा मार्ग म्हटलं जातं. कुठलीही अद्भुत शक्ती ही नैतिक व्यवस्था सांभाळीत नसते तर कर्मच जीवनाचं नियम करत असतात. धम्मात नीतिलाही मुख्य स्थान देऊन कुशल कर्मानेच ते शक्य आहे, हे बुद्धांनी जगाला दाखवून दिलं आहे.

मानवी जन्म एकदाच आहे, तो परत परत मिळत नाही. त्यामुळं मिळालेलं आयुष्य सत्कर्मी लावायचं की अकुशल कामं करून घालवायचं हे माणसानंच ठरविलं पाहिजे.

तसे जगण्याचेही दोन मार्ग असतात, एक चांगला तर दुसरा वाईट. चांगला असतो तो सदगतीकडे, प्रगतीकडे घेऊन जातो तर वाईट मार्ग जो असतो तो दुर्गतीकडे घेऊन जातो. अर्थात सदगती म्हणजे प्रगतीच. दुर्गती म्हणजे अर्थच अधोगती. जे सदगतीचा मार्ग निवडतात त्यांचं जगणं नेहमी प्रसन्न आणि आनंदी असतं. जे अधोगतीचा मार्ग निवडतात त्यांचं जगणं हे नेहमी यातनामय, दुःखी आणि भीतीग्रस्त असतं. माणूस कुठल्या मार्गानं जात आहे, हे त्याच्या दैनंदिन जगण्यावरून, दैनंदिन व्यवहरातून, दैनंदिन आचार-विचारातून आणि वागण्यावरुन समजत असतं. या दैनंदिन कृतीलाच कर्म म्हटलं जातं.

‘कर्म’ म्हणजे काम तर ‘विपाक’ म्हणजे त्याचा परिणाम. जसा सुई मागून धागा येत असतो, तसाच कामामागून त्याचा परिणाम येत असतो. माणसाच्या कामावरुन तो कोणत्या गतीला जात आहे, हे ओळखता येतं. जे काम केल्यानं खंत वाटत नाही किंवा पश्चातापही होत नाही, ज्यातून आनंद मिळतो, मनाचं समाधान होतं, अशा कामाला कुशल काम म्हणतात. इतरांना आपल्यापासून त्रास होऊ नये, उलट आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा व्हावा, अशा कामाला कुशल कर्म म्हणलं जातं. अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी जे मदत करतात त्यांची नेहमी आठवण केली जाते, त्यांच्याबद्दल आदरभाव तयार होतो तर ज्यांनी मदत केली असेल त्यांनाही संकटात, अडचणीच्या वेळी एखाद्या मनुष्य मात्रास मदत केल्याचं समाधान खूप मोठं असतं. परंतु ज्या कामामुळं इतरांची फसवणूक होते, छळवणूक होते, पिळवणूक होते, नुकसान होते अशा कामांना अकुशल कर्म म्हणजेच वाईट काम म्हणतात.

एका माणसानं दुसऱ्या माणसाच्या मुलांचं अपहरण केलं, त्याच्या मुलांचा छळलं असेल तर अशा कर्माला अकुशल कर्म म्हणतात. लोखंडावर चढलेला गंज जसा लोखंडालाच नष्ट करीत असतो, तसेच अकुशल कर्म अकुशल कर्त्याला संपवित असतं. जसे बैलगाडीचे चाक बैलाच्यामागं सारखं धावत असतं, तसेच अकुशल कर्म सारखं माणसाचा पाठलाग करत असतं. एक-एक चांगलं काम करीत गेलं की कुशल कर्माचा संचय होत जातो. तेच कुशल कर्म मित्र म्हणून माणसाच्या नेहमी सोबतीला असते. संकटातून वाचवित असतं. जसे एखाद्याचं घर जळत असताना मदत करणाऱ्याकडून घरातील सामानाऐवजी प्रथम घरातील लोकांनाच आगीतून वाचवीनं आवश्यक असतं. यालाच कुशल कर्म म्हणतात.

कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, असं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं. यासच धम्माचा मार्ग म्हटलं जातं. कुठलीही अद्भुत शक्ती ही नैतिक व्यवस्था सांभाळीत नसते तर कर्मच जीवनाचं नियम करत असतात. धम्मात नीतिलाही मुख्य स्थान देऊन कुशल कर्मानेच ते शक्य आहे, हे बुद्धांनी जगाला दाखवून दिलं आहे. तथापि, हे सर्व त्या त्या माणसांवर अवलंबून असतं. कारण समाजात ज्या नैतिक किंवा अनैतिक घडामोडी होतात त्या फक्त माणसंच करीत असतात. सर्व चांगल्या किंवा वाईट संस्काराचं केंद्र मन असतं. जे मनात येतं, तेच माणूस बोलत असतो. कारण माणसाचे सर्व व्यवहार हे मनातूनच होत असतात. जसा भाव तशाच भावना तयार होत असते. एखादं व्यसन करायचं मनात आणले, तर माणूस व्यसनी होईल. तथापि, मनात तसे विचार आणले नसतील, तर तो माणूस निर्व्यसनी राहील . हाच तो भाव. सृष्टीचा हाच मूलभूत नियम म्हणजे कर्म नियम ठरतो. स्वतःचे कर्म माणूस स्वतःच निर्माण करीत असतो, म्हणून मन धावते तिथेच माणूस धावत असतो.

मन घडते तसाच माणूस घडतो. मनावर वाईट विचारांचे ढग गडद असतील, तर वाईटच प्रतिक्रिया उमटतील. क्रिया या कायिक, वाचिक आणि मानसिक असतात. त्याद्वारे जशी मनाची स्थिती असेल, त्यानुसार प्रतिक्रिया उमटत राहणार. व्यवहार होत राहणार. मनावर द्वेषाचा, मत्सराचा प्रभाव असेल तर द्वेषच बाहेर पडेल. मन प्रेमानं, करुणेनं पुरेपूर भरलेलं असेल, तर व्यवहारातून प्रेम नि करुणाच व्यक्त होईल. मनावर चांगल्या विचारांची पकड असेल तर हातून घडणारे कर्मही चांगलेच असणार. मन हे माणसाकडून घडणाऱ्या कर्माला आकार देत असतं. याचा अर्थ जे पेराल तेच-तेच उगवित असतं. जांभळाच्याच्या झाडाला जांभळंच लागणार. पपईच्या झाडाला आंबे कधीच लागणार नाहीत. जो कर्ता असेल त्याला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ येथेच मिळत असते. कधी-कधी माणसाच्या कर्माचा परिणाम दुसऱ्यालाही भोगावा लागतो.

समजा एखाद्या माणसानं वाईट कामं केली तर त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर होत असतात. समाजात अन्याय, अत्याचार, अनाचार, स्वैराचार, हिंसाचार वाढला की समजायचं इथली माणसं अकुशल कर्म अधिक करतात. शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली की माणसे कुशल कर्म (चांगले) करतात म्हणून समजायचे. जर चांगल्या मार्गावर जायचं असेल तर माणसाला तसं कर्तव्यही करावं लागत. हाच तर बुद्धांचा कर्मसिद्धांत आहे. कर्तव्य म्हणजे निभावयाच्या गोष्टी. पार पाडव्याच्या जबाबदारीची जाणीव होय. उदा. म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करणं, पत्नी-मुलाबाळांचा सांभाळ करणं, आप्तेष्टांचा आदर करणं, निराधारांना आधार देणं. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी देणं, हे प्रत्येक माणसाचं नैतिक कर्तव्य असतं. कर्तव्याची जाणीव झाली, तरच माणसाला दुःखातून सुखाकडं, अधोगतीकडून प्रगतीकडं जाता येईल. कारण मनुष्य दैनंदिन जी कामं करतो त्याच्यासाठी त्या कामाचा परिणाम असतोच.

समजा एखाद्यानं विशेष प्रयत्न करून स्पर्धेत प्राविण्य मिळविलं आणि त्याला त्या कामाबद्दल सन्मानाचं बक्षीस मिळालं तर विशेष प्रयत्न हे त्याचं काम आणि ‘सन्मानाचं बक्षीस’ हा त्या कामाचा चांगला मोबदला तथापि, चांगला परिणाम होय . उदाहरणार्थ समजा एखाद्यानं चोरी केली तर त्यास त्या कृत्यासाठी तुरुंगवास होऊ शकतो, हाच त्याच्या वाईट कामाचा परिणाम होय. तुम्ही कुणाचा अपमान केला तर तुम्हालाही अपमानाला सामोरे जावे लागू शकते. दुसऱ्याचा सन्मान कराल तर तुम्हालाही सन्मानच मिळू शकतो, म्हणजे चांगल्या कामाची चांगली निष्पत्ती वाईट कामाची वाईट निष्पत्ती हे निश्चित असते . कारण (हेतू) हेच बीज आहे, परिणाम हेच त्याची उत्पत्ती आहे. म्हणजे कारणांशिवाय काहीच घडत नसतं.

कोणतंही काम केलं नाही तर फळं कशी मिळणार? कुशल कर्मातून चांगल्या गोष्टीची निर्मिती, तर अकुशल कर्मातून वाईट गोष्टीची निर्मिती होत असते. एखादी वस्तू जितक्या वेगानं भिंतीला मारली जाते, ती तितक्याच वेगानं ती परत येते . माणसाचा दर्जा चांगला का वाईट हे सर्व त्याच्या कर्मावरूनच ठरतं. खरं तर माणसाला कोणीही बंदिस्त करीत नाही. माणूसच आपापल्या कर्मानं स्वतःला बंदिस्त करून घेत असतो. मनुष्य बुद्धिवादी, स्वतंत्र आणि भ्रामक समजुतींचा नायनाट करणारा असेल तर तो बंदिस्त कसा होणार?

काया, वाचा आणि मनाद्वारे
१) कुशल २) अकुशल कर्म केली जातात. मग कर्म हे कुशल करायचे की अकुशल करायचे, हे सर्व माणसावर अवलंबून असते.

कायेनं केलं जाणारं कुशल कर्म : कुणाला मदत करणं , सुख दुःखात सामील होणं , धम्माचरण करणं.

कायेनं केलं जाणारं अकुशल कर्म : चोरी करणं , व्याभिचार करणं , हिंसा करणं , खून करणं.

वाचेनं केलं जाणारं कुशल कर्म : सर्वांशी कुशल बोलणं.

वाचेनं केलं जाणारं अकुशल कर्म : निंदा करणं , चहाडी करणं , कुणाला दुखावणे , व्यर्थ बडबड करणं , खोटं बोलणं, कुणाला फसविण.

मनाद्वारे केले जाणारे कुशल कर्म : मनात मैत्री भावना ठेवणं , मन स्वच्छ ठेवणं , मनात चांगल्या विचारांना जागा देणं.

मनाद्वारे केले जाणारे अकुशल कर्म : मनात राग, द्वेष, मोह बाळगणं.

कर्माचा परिणाम तात्काळ, काही अवधिनंतर, दीर्घकाळानंतर होत असतो.

१) *तात्काळ फळ देणारे कर्म : तुम्ही कोणाला वाईट बोलाल तर त्याच्या लगल्या वाईट प्रतिक्रिया उमटतील. चांगलं बोलल्यास चांगल्या प्रतिक्रिया उमटतील. सापावर जाणूनबुजून पाय ठेवला , तर त्याची लगेच प्रतिक्रिया उमटेल. तो तुम्हाला चावेल . चोरी किंवा खून करणाऱ्याचा संशयावरून ताबडतोब पाठलाग सुरू होतो, यातून सुटकाही नाही. लोकांच्या पाळतीमुळं , शिक्षेच्या भीतीमुळं आणि बेचैनीमुळं अकुशल कर्म करणाऱ्याला शांत झोप लागत नाही.

२) *काही काळानंतर फळ देणारे कर्म :* आज रोप लावलं तर कालांतरानं त्याच वृक्षात रूपांतर होऊन काही वर्षांनंतर त्यास फळं यायला सुरुवात होईल . तसेच अमली पदार्थांचं सेवन आणि लैंगिक स्वैराचारामुळं माणसं काही वर्षांनी दुर्धर आजारांना बळी पडतात.

३) *दीर्घकाळानंतर फळ देणारे कर्म :* ज्या कर्माचे फळ उशीरानं मिळतं . काही कर्माची फळं तात्काळ मिळत नाहीत , त्यास काही कालावधी लागतो . महापुरुषांच्या कुशल कार्याचा आजवर दिसत असलेला परिणाम. काही माणसांच्या अकुशल कर्माचा परिणाम मृत्यूनंतर दिसायलाच लागतत् .

माणसाला चांगल्या कर्माची प्रेरणा मिळते कोठून ? तर बुद्धांच्या धम्मातून. कुशल कर्माची अनुभूती कधी यायला लागते ? धम्म आचरण करताना, धम्मदान करताना, दुसऱ्याला मदत करतांना, दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होताना, मैत्रीभावना वाढविताना ह्यातून कुशल कर्म होत असल्याची अनुभूती व्हायला लागते. बुद्धांनी सांगितलेल्या कर्मसिद्धांतात जीवनात कसे जगायचे आणि कसे वागायचे ह्याचं भान येतं . माणूस जीवनभर काही कष्ट न करता इतरांवर अवलंबून राहिला, तर त्याची प्रगती कशी होणार ? माणसाच्या कर्मावरच त्याचं सुख आणि दुःख अवलंबून असतं . एखाद बीज सडकं किंवा खराब असेल तर त्याची निपजही निकृष्ट दर्जाची असू शकते.

बीज जर चांगलं निरोगी असेल, तर त्याची फळंही उत्तम दर्जाची येणार. पूर्वी फळभाज्यांचा सात्विक आहार मिळायचा. त्यामुळं माणसं निरोगी आणि सुदृढ , आनंदी राहायचे . दीर्घ आयुष्य जगायचे . पण आज माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल तो मार्ग पत्करायला लागला. कच्च्या फळांना रासायनिक प्रक्रियेनं पिकवू लागला, रसायनानं जमिनीचा दर्जा घसरवू लागला, फळभाज्या हिरव्या आणि ताज्या दिसण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करू लागला, विषारी औषधांनी अन्नधान्य नासवायला लागलं, त्यामुळं माणूसच माणसाला रोगी बनवित चालला आहे. त्याची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस नष्ट करीत चालला आहे.

माणसाच्या रक्ता-रक्तात, नसा – नसात विष पसरल्यामुळं माणूस माणुसकी सोडून हैवानासारखा वागत चाललाय. त्याची बुद्धी भ्रष्ट होत चाललीआहे , नको ते करायला लागला आहे , क्षुल्लक कारणांसाठी माणूसच माणसाचा जीव घेऊ लागला आहे . जसे बियापासून रोपटं तयार होतं , त्याला फुलं – फळं लागतात . फळांमध्ये पुन्हा बिया तयर होणं निश्चित असतं , यालाच बौद्धच्या शब्दात व्यवस्थेचा नियम म्हटलं गेलं आहे. तसेच उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा येणं निश्चित असतं , दिवसानंतर रात्र होणं निश्चित असतं, अगदी त्याचप्रमाण कर्मनियमाप्रमाणाचा परिणाम निश्चित असतो.

कुशल कर्मानेच शिस्तपालन, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करता येते, असा सिद्धांत नेहमी माणसाला जागृत राहायला शिकवितो. जे लोक बुद्धांच्या कर्मसिद्धांताचं पालन करतात त्यांचं जीवन समृद्ध होत जातं. बुद्घ कोणतीही भीती न दाखवता आपणास याचं मनुष्य जीवनात येथेच सर्व काही द्यावं लागतं अनुभवावं लागतं . मृत्यूनंतर स्वर्ग – नरक नाही .याच आयुष्यात स्वतःच्या जीवनात सुखी , समाधानी , दुःख मुक्त रहाता येतं .मृत्यूनंतर मनुष्याचं काय होतं हे तर आपण दररोज अनुभवतोच . जाळलं तर राख ,पुरलं तर माती …त्यानंतर काय? याची कुणीही अनुभूती सांगितल्याचं ऐकण्यात नाही . म्हणून कुशल कर्म करा दुःख मुक्त राहा , हाच बुद्धाचा जीवन मार्ग आहे.

– यशवंत भंडारे, छत्रपती संभाजी नगर
मो .9860622328

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका