पाचेगावात बहाद्दूर महिलांच्या पुढाकारातून भीमजयंती
सांगोला / प्रतिनिधी
मौजे पाचेगाव बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात पार पडली. सालाबादप्रमाणे डॉ. आंबेडकरांची जयंती साऱ्या विश्वात साजरी केली जात असली तरी डोंगराच्या कुशीत असलेल्या पाचेगाव बु. येथील भीम अनुयायांनी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची कमान महिलांनी मोठ्या हिमतीने सांभाळली.
5 मे रोजी झालेला जयंती उत्सव मोठया दिमाखाने संपन्न झाला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची संवाद्य मिरवणूक पाहून गावकर्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी खासकरून सेक्युलर मुव्हमेंटचे प्रदेश कार्याध्यक्ष भरत अण्णा शेळके यांनी आवर्जून भेट देऊन मंडळाचे कौतुक केले. संपूर्ण महिलांचे जयंती उत्सव मंडळ हे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असण्याची शक्यता आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील महिला मोलमजुरी करत आपले जीवन व्यथित करतात. परंतु बचत गटाच्या माध्यमातून आता महिला नेतृत्व करताना शहरांबरोबर ते खेड्यात सुद्धा बघायला मिळत आहे. याला अपवाद पाचेगाव बु. येथील महीला कशा असू शकतील. बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधत त्यांनी यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे नेतृत्व केले. रमाईच्या, सावित्रीच्या व जिजाऊंच्या लेकीनी आपल्याल्या संधी मिळाली तर आपणही समाजाचे नेतृत्व करू शकतो हे दाखवून दिले. त्यांच्या का कर्तृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नेहमीप्रमाणे बचत गटाच्या मिटिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कारण्यावर चर्चा झाली. त्यावेळी यावर्षीची जयंती आपण माहिलांनी साजरी करायची असे ठरवून जयंती उत्सव मंडळ तयार करण्यात आले. यामध्ये अध्यक्ष पदी कविता दगडू कांबळे, उपाध्यक्ष पदी प्रियांका कांबळे तर खजिनदार पदी लतिका कांबळे यांची निवड करण्यात आली.
तर सदस्य म्हणून मंदाकिनी कांबळे, प्रिया कांबळे, सरिता कांबळे, कमल कांबळे, सुवर्णा कांबळे, पुष्पा शिवशरण, नंदा कांबळे, सविता कांबळे, कौशल्या कांबळे, बायना कांबळे आदी सदस्यांची निवड करण्याट आली. पुढे हा प्रस्ताव समाजापुढे मांडून त्याला संमती मिळविली. त्यानंतर पोलीस स्टेशनची परवानगी, देणगी जमा करणे, कार्यक्रम आखणे आदी कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली.