आत्मभान देणारे साहित्य पुढे यावे : योगीराज वाघमारे
स्मृतीशेष एफ. एन. कसबे यांच्या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन
कळंब : विशेष प्रतिनिधी
स्मृतीशेष एफ.एन. कसबे यांनी आयुष्यभर उभे केलेले कार्य हे चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा “जीवनयात्री : एक संघर्षगाथा” हा ग्रंथ नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. आंबेडकरी चळवळीतील लेखकांनी समाजाला आत्मभान, प्रेरणा आणि ऊर्जितावस्था देणारे असे साहित्य निर्माण करावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले.
स्मृतीशेष ज्येष्ठ साहित्यिक एफ. एन. कसबे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कळंब येथे “जीवनयात्री : एक संघर्षगाथा” या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे, समीक्षक डॉ. सारीपुत्र तुपरे उपस्थित होते. यावेळी मंचावर “थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर”चे संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे, ज्येष्ठ साहित्यिक के. व्ही. सरवदे, पंडित कांबळे, रमेश बोर्डेकर इत्यादी उपस्थित होते.
प्रारंभी स्मृतीशेष एफ. एन. कसबे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मान्यवर आणि उपस्थितांनी अभिवादन केले.
योगीराज वाघमारे पुढे म्हणाले की, वाचन प्रेरणेतून विद्यार्थी घडत असतात. त्यांना नवनिर्मितीवर आधारित साहित्य वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि सतत प्रेरणा द्यावी.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे म्हणाले की, “साहित्य हे समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असते, साहित्य आपली अस्मिता आणि आत्मभान चिरंतन तेवत ठेवत असते. त्यामुळे साहित्यिकांच्या लेखणीतील नायकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिर्माणाची चळवळ सांगितली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची प्रभावी मांडणी आजच्या साहित्यातून झालेली दिसून येत नाही. त्यामुळे तरुण साहित्यिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्कालीन भूमिकांचे अभ्यासपूर्ण चिंतन करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिर्माणाची चळवळ सांगितली पाहिजे.
प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाला केंद्रबिंदू मानून एफ. एन. कसबे यांनी वैचारिक साहित्यनिर्मिती केली. “जीवनयात्री : एक संघर्षगाथा” हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांना दिशादर्शक आहे. स्मृतीशेष एफ. एन. कसबे यांच्या प्रत्येक पैलूंवर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे. या ग्रंथाचे वाड्मयीन मूल्य मोठे आहे. आंबेडकरी साहित्य विश्वात हा ग्रंथ दखलपात्र ठरेल.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघरत्न कसबे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. अरविंद खांडके यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास कळंब शहरातील अनेक साहित्य रसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, राजरत्न कसबे, आनंद कसबे, प्रा. अनिल कांबळे, बालाजी गायकवाड, रतन उबाळे, डी. डी. गायकवाड, राजपाल गायकवाड, तुषार रणदिवे इत्यादींनी परिश्रम घेतले.
हा लेख नक्की वाचा