थिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

सांगोल्यातील आंबा उत्पादक संकटात

भुरी, तुडतुड्याने आणले जेरीस

Spread the love

डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले. त्यामुळे डाळिंब रोगामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या. पीक पद्धत बदलून केशर आंबा, तैवान पेरू, गोल्डन सिताफळ, आवळा ,पपई, कलिंगड ,खरबूज अशा फळ लागवडीकडे वळला आहे.

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे
सततच्या हवामान बदलामुळे सांगोला तालुक्यातील केशर आंबा बागांवर पडलेल्या भुरी व तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोहोर गळती वाढल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बागांवर महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे सततच्या फळ गळतीमुळे यंदा आंबा उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.


या बातमीच्या खाली व्हिडिओ लिंक आहे. नक्की पाहा.


डाळिंबाचा कॅलिफोर्निया

डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले. त्यामुळे डाळिंब रोगामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या. पीक पद्धत बदलून केशर आंबा, तैवान पेरू, गोल्डन सिताफळ, आवळा ,पपई, कलिंगड ,खरबूज अशा फळ लागवडीकडे वळला आहे.

१ हजार हेक्टरवर केशर आंबा लागवड
तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंबा लागवड केली आहे. चालू वर्षी नोव्हेंबर मध्ये बागांना पहिला मोहोर निघाला. परंतु तो फारसा तग धरू शकला नाही. त्यानंतर हवामान बदलामुळे डिसेंबर व फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या बहारात मोहोर निघाला. बागा मोहोराने बहरलेल्या असताना भुरीमुळे मोहोर पांढरा पडून तर तुडतुड्या रोगामुळे बागेवर चिकटपणा येऊ लागल्याने फळे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.

शेतकरी अडचणीत
एकीकडे डाळिंब उदध्वस्त झाल्या असताना दुसरीकडे शेतकरी फळपीक बदलून उभारी घेण्यासाठी धडपडत आहे. अशातच केशर आंबा बागांवर पडणाऱ्या रोगामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान महूद येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप नागणे यांनी २ एकर क्षेत्रावर केशर आंबा लागवड केली आहे. यंदा हवामान बदलामुळे डिसेंबर व फेब्रुवारी झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली.

मात्र मोहोराने झाडे बहरली असताना बागेवर भुरी व तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले म्हणून त्यांनी रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आत्तापर्यंत बागेवर १४ फवारण्या करुनही फळ गळती थांबत नाही. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी आंबा मोहोर संरक्षणासाठी हेक्झाकोनझोल १० मिली किंवा बावीस्टीन १० ग्राॅम + योग्य किंवा क्विनाॅलफाॅस-१५मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे बागेवर फवारणी करावी. – शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी.

गतवर्षी 15 लाखाचा केशर आंबा विकला होता. पण यावर्षी याच आंबा बागेवर परिणाम झाला आहे. मोहरही म्हणावा तसा नाही. माझी हीच केशरची 1 हजार 400 झाडे आहेत. हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे आंब्यांचे प्रमाणही कमीच असणार आहे.- राजू वाघमारे, केशर आंबा बागायतदार जवळा

आंबा पिकाचे महत्त्व
आंबा सगळ्यांच्याच आवडीचं फळ. नुसतं फळच नाही तर फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. आंब्याच्या सीझनमध्ये आंबा न खाणारा विरळाच असेल. पण, त्याचा सीझन यायला काही अवधी लागतोच. शक्यतो कडक उन्हाळ्यातच आंबा बाजारात दिसायला लागतो. एकदा बाजारात आला की जूनपर्यंत मुक्काम ठोकून, मग सरळ पुढच्याच उन्हाळ्यात बाजारात अवतरतो. सगळेच जण आंब्याच्या सीझनचा मनमुराद आनंद घेतात. ज्याला जसा परवडंल तसा, आंबा विकत घेतला जातो.

आंब्याविषयी थोडक्यात
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे 4000 वर्षापासून आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख मे.टन उत्पादन दरवर्षी मिळते. तसेच, महाराष्ट्रातून आंब्याची दरवर्षी सर्वाधिक निर्यात केली जाते. जवळपास 17 जातींच्या आब्यांचा यात समावेश आहे. निसर्गाने चांगली सोबत केल्यास उत्पादनाचा आकडा वाढतो.

आंबा उष्ण – दमट हवामानातच चांगला बहरतो. त्यामुळे हे हवामानच आंब्याला अधिक मानवते. इतर हवामानातही आंब्याची वाढ होते. मात्र कडाक्याची थंडी, कोरडे हवामान त्याला मानवत नाही. बराच काळ थंडी व कोरडे हवामान राहिले तर फळधारणेची शक्यता राहत नाही. आंब्याला कितीही उन्हाचा तडाखा बसला तरी तो वाढतो. मोहोर येण्याचा आणि फळांचा काळ डिसेंबर ते जूनपर्यंत असतो. फळ त्यानुसार मागे-पुढे येवू शकतात.

केसर आंब्याचे महत्त्व
ही जात मूळची गुजरातमधील मात्र, महाराष्ट्रात सर्वत्र या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. ठाण्यात ही याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच, सोलापूरमधील केसर आंब्याने सातासमुद्रापार मजल मारली आहे. हापूसपेक्षा 3 ते 4 पटीने जास्त उत्पादन देणारी जात असल्याने या जातीचे लागवड देशभर केल्या जात आहे. फळांचा स्वाद उत्तम आणि चवीला गोड असतात. फळ पिकल्यानंतर 5 ते 6 दिवस टिकते. त्यामुळे तातडीने फळांना बाजारात घेवून जाणे, आवश्यक असते.

व्हिडिओ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका