सोलापूर राष्ट्रवादीत भूकंप, दिग्गज नेत्याचा आज शिंदे गटात प्रवेश
आसबे न्यूज ब्युरो (सूर्यकांत आसबे)
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप कोल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांनी आसबे न्यूज ब्यूरोशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उद्या सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी आसबे न्यूज ब्यूरोशी बोलताना सांगितले. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या दिलीप कोल्हे यांच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव विद्या लोलगे यांनी भाऊबीजेच्या दिवशी दिलीप कोल्हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मनधरणी केली होती. आणि राष्ट्रवादी पक्षातच त्यांनी रहावे यासाठी दिलीप कोल्हे यांच्याकडून ओवाळणी मागितली होती. परंतु दिलीप कोल्हे यांनी विद्या लोलगे यांना भावाच्या नात्याने साडी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. परंतु आपण राष्ट्रवादी पक्ष का सोडत आहोत याबाबत कोणीही चर्चा करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान दिलीप कोल्हे यांच्या यापूर्वीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या भेटीगाठी होऊन जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि अमोल शिंदे तसेच शहरप्रमुख मनोज शेजवाल यांनी त्यांना त्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन सत्कारही केला होता. त्यानंतर दिलीप कोल्हे यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आल्याचे बोलले जात होते.
राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्षपद दिलीप कोल्हे यांना देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते .परंतु त्यानंतर वाटाघाटी फिसकटल्याचे सांगण्यात आले. आणि अखेर बुधवारी दिलीप कोल्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या जिल्हाप्रमुखांनी आसबे न्यूज ब्यूरोशी बोलताना सांगितले.
बुधवारी सकाळी मुंबईला जाण्यासाठी सोलापुरातून वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून दिलीप कोल्हे यांच्यासोबत काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांनीसुद्धा दिलीप कोल्हे यांचा उद्या बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे आता दिलीप कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूर गेले असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दिलीप कोल्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिंदे सेनेची सोलापुरातील ताकद नेमकी किती वाढणार हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतच दिसून येणार आहे.
हेही पाहा
दिल के टुकडे 35, मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये, मुंडके पाहत “तो” झोपायचा