सांगोल्याच्या डाळिंबाला वातावरणातील बदलाचा फटका
महासंकटात डाळिंब-2: 'मर', 'करपा' आणि तेल्या रोगाला पोषक वातावरण
सांगोला / डॉ. नाना हालंगडे
बदलत्या वातावरणामुळे सांगोल्याच्या डाळिंबाला फटका बसत आहे. हे वातावरण ‘मर’ आणि तेल्या रोगाला पोषक ठरत आहे. अगोदर आलेली कोरोनाची महामारी, त्यानंतर अतिवृष्टीचे संकट व सध्या डाळिंबावर तेल्या व मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव. या संकटामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक कोसळण्याच्या वाटेवर आहे. (Pomegranate in India)
पाऊस व हवामानाचा फटका
सध्या तालुक्यात अधून-मधून पडणारा पाऊस, मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अतिवृष्टीनंतर झालेल्या फुल गळतीमुळे शेतकऱ्यांनी कसेतरी मोठा खर्च करून, नानाविध औषधे वापरून डाळिंबाची सेटिंग केली. परंतु सध्या हवामानातील बदलामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्यांना तेल्याग्रस्त डाळिंब तोडून ती फेकून द्यावी लागत आहे. मागील दोन वर्षापासून शेतकर्यांना याच परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. मोठा खर्च करून आलेल्या बागाही तेल्याने जळून जात आहेत.
- हेही वाचा : स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलाच नाही!
- सोलापूर जिल्हा माहिती अधिकारीपदी सुनील सोनटक्के रुजू
- ‘वंचित’ला आणखी एक धक्का, प्रदेश महासचिवाचा भाजपात प्रवेश
जिल्ह्यात सुमारे 80 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब उत्पादन
दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सुमारे 80 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन आणि निर्यात करण्यात पंढरपूर व सांगोला तालुक्याचा मोठा वाटा आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा डाळिंब शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. हवामानातील बदलामुळे डाळिंब बागांवर तेल्या, मर, करपा या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे सांगोला, पंढरपूर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावरील डाळिंबा बागा उध्दवस्थ झाल्या आहेत. तेल्यारोगामुळे फळांना तडे गेले आहेत. तर करप्यामुळे डाळिंबाची झाडे जागेवरती वाळू लागली आहेत.
डाळिंब उत्पादक हतबल
किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करुन थकले आहेत. औषध फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च करुनही प्रादुर्भाव कमी होत नसल्याने तो वाया गेला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक आता हतबल झाले आहेत. यावर्षी उत्पादन निघाले नाही तर औषध फवारणी आणि मजूरीचा वाढत्या खर्चामुळे डाळिंब शेतकरी कर्ज बाजारी होतील.
हवामानबदलाचे परिणाम व पर्यायी व्यवस्थापन
ऋतुचक्रावर परिणाम होऊन पावसाळ्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टी आणि महापूर, हिंवाळ्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस तर उन्हाळ्यात गारपीट यामुळे ऋतुचक्राच्या बदलास प्रभावित करणारी परिस्थिती सातत्याने निर्माण होण्यामुळे त्या त्या हंगामातील पिके आणि पीक पद्धती धोक्यात आली आहे. अज्ञसुरक्षा अडचणीत आली आहे.
वाढती वाहनांची संख्या, वाढती कारखानदारी, वाढत्या एअर कंडिशनिंग इमारती या सातत्याने कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन वाढवीत आहेत. जनावरांचे रवंथ करण्यामधून मिथेन वायुचे उत्सर्जन वाढत आहे. अतिरिक्त नायट्रोजन खतांचा वापर नायट्रस ऑक्साइड्चे प्रमाण वाढवत आहे. त्यामुळेच एका बाजूस वायूप्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. तर दुस-या बाजूस कार्बन डाय ऑक्साइड वापरणारी वने व वनस्पती मोठ्चा प्रमाणावर नष्ट होत आहेत.
आशिया खंडातील ६0 दशलक्ष हेक्टर जंगल, आफ्रिका खंडातील ५५ दशलक्ष हेक्टर जंगल आणि लॅटिन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्टर जंगल मानवाने आजपर्यंत नष्ट केली आहेत. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साइड वापरणारी यत्रणा मानवाने नष्ट केली आहे. त्यामुळे हवेत कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा व उष्णता कार्बन डाय ऑक्साइड वायू धरून ठेवतो. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे. त्यामुळेच त्याला जागतिक तापमान वाढ असे नामकरण केले आहे. जेंव्हा हवेचे तापमान वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. वारा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतो, तेंव्हा बाष्प घेऊन येतो आणि जेथे हवेचे दाब कमी असतील तेथे पाऊस आणि अतिवृष्टी होते. तर जेथे तापमान सरासरीपेक्षा कमी राहते तेथे हवेचे दाब वाढतात आणि दुष्काळी परिस्थिती ओढवते. यासच आपण हवामान बदल असे संबोधतो. काही भागात अवकाळी आणि अवेळी होणारा पाऊस आणि त्यातून होणारे शेतीचे नुकसान हे नेहमीचेच झाले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता डाळिंब उत्पादन खूपच जोखमीचे बनले आहे.
(क्रमशः)