स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलाच नाही!

बळीराजाच्या दुःखाचे जळजळीत वास्तव

Spread the love

सांगोला : डॉ. नाना हालंगडे
जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे पुरता हतबल झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरतो न सावरतो तोच विजेच्या संकटामुळे पुन्हा एकदा महासंकट उभे ठाकले आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष उलटूनही आजही जर तुम्ही साधे शौचालय बांधू शकत नसाल, निसर्गाच्या प्रकोपाला तयारीने सामोरे जाऊ शकत नसाल, तुम्ही तुटपुंजा सबसिड्या-कर्ज माफी मिळवून स्वतःला धन्य समजत असाल, तर तुम्ही भ्रमात आहात. शासन तुम्हाला तारत नसून मारत आहे. गाव तंटामुक्त, हागणदारी मुक्त, आदर्श गाव, निर्मल गाव या असल्या भाकड संकल्पनांनी तुम्ही कधीही आर्थिक स्वयंपूर्ण होणार नाहीत. ज्या दिवशी तुम्ही स्वतः उद्योगपूर्ण गाव, स्वतः भाव ठरवणारे गाव, आरोग्य शिक्षण सुविधांनी युक्त गाव, ज्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टीची मागणी कराल ते स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल असेल. तुमचे नेते ह्या पद्धतीने खेड्यांचे विकासाचे व्हिजन आखतील. त्यादिवशी शेतकऱ्यांना सरकारच्या संडासाची गरज नसणार. आर्थिक सुबत्ता यावी यासाठी एकही नेता प्रयत्न करत नाही. गावात मंदिरासाठी दहा लाख वीस लाख देतील पण पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी निधी देणार नाहीत. स्मशानभूमीसाठी निधी देतील पण पाहिजे त्याला सौरपंप देणार नाहीत. हा शाश्वत विकास नाही. शेत शिवाराचे रस्ते चिखल मातीचे आहेत त्यात बदल नाही. शेतकऱ्यांमध्ये रस्त्यांवरून वाद होतात ते वाद सरळ कोर्टात जाऊन त्यांचा न्यायनिवाडा व्हावा, तहसीलदारांकडे या गोष्टींचा निर्णय लागत नसतो. शेत शिवाराचा रस्ता हा प्रत्येक शेतकऱ्याचा मूलभूत हक्क आहे. आणि तो कुणीही अडवू नये. ज्याला रस्ता नाही तिथे सरकारने हस्तक्षेप करून त्याला रस्ता करून द्यावा, म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. परंतु आपसातले वाद कधीही न मिटवता ते कायम ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही आपसात भांडण करून, कायम लाचारी व गरिबीत मरावे. यामुळे शेतकऱ्यांची कधीही एकी होत नसते.

माझा भाऊ त्या पक्षात मी या पक्षात. राजकारणातल्या छोट्या-छोट्या कुरघोड्या आपसातल्या छोट्या भांडणामुळे शेतकरी एकमेकांचे रस्ते अडवायला तयार होतात, डोकी फोडायला तयार होतात. वास्तविक तुमचा खरा शत्रू कोण आहे याचे भान शेतकऱ्यांना नसते, कुणाशी लढावं याची जाणीव नसते, बांधाशेजारील शेतकऱ्यांशी लढण्यापेक्षा सरकारशी कायद्याने लढावे. याची जाणीव तुम्हाला यामुळेच होत नाही. नको त्याला शत्रू समजतात आणि जो शत्रू आहे त्याला मायबाप समजतात. याचा फायदा कायम नेत्यांनाच होतो. तुमची भांडणं मोडायला नेतेच येतात. तुमच्या समस्यांमध्ये तुम्हाला असे गुंडाळण्यात आलेले आहे. हा गुंता मोडण्याचे काम आजपर्यंत झालेले नाही. याचे व्हिजन त्यांनी तयार करून ठेवलेले आहे, जर तुमच्या शेताचा रस्ता चांगला असेल तर तुमचा उत्पादन खर्च कमी होतो. तुम्ही यंत्राने आपल्या पिकाची काढणी करून मजुरी वाचू शकता. दिवसा लाईट आजही मिळत नाही हा प्रश्न कायम आहे.

या असल्या प्रश्नांकडे मुद्दामहून कानाडोळा केला जातो. आणि नको त्या गोष्टींवर शासन आपल्या सर्वसामान्य लोकांचे पैसे उधळत असतात आणि त्या बांधकामातून त्यांची ठेकेदार पोसले जातात. ठेकेदार नेत्यांची टक्केवारी बरोबर पोचवतो. हाच पैसा सामान्य लोकांना विकत घेऊन कायम ते तुमच्यावर राज्य करतात. मग त्यांची मुलं तुमच्यावर राज्य करतील. कारण ते दिवसागणिक पैसेवाले होत राहतील आणि तुम्ही कंगाल होत राहावं यासाठी नवनवीन योजना आखत राहतील. म्हणजे तुम्ही कायम विकले जाणार आणि ते कायम विकत घेत राहणार. यातून एकच नागरीकांचा शाश्वत फायदा व्हायला नको, अशीच मानसिकता सध्या नेत्यांची दिसते. आजतागायत मोठ्या धरणांची कामे राज्यभरात कुठेही चालतांना दिसत नाही. जे प्रकल्प आहेत तेही आता नुकसानग्रस्त झालेली आहेत. दळणवळणाची साधने बुलेट ट्रेन वरती अमाप पैसा खर्च केला जातो. त्यापेक्षा देशात देशांतर्गत विमान सेवा अधिक प्रभावी करून, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवता आल्या असत्या. देशांतर्गत विमान सेवेचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला असता. परंतु शेतकर्‍यांचा फायदा व्हावा यासाठी शासन एकही पाऊल उचलायला तयार नाही .एकंदरीत शासन शेतकऱ्यांचं सर्वात मोठा शत्रु म्हणून काम करत आहे .जेणेकरून मूठभर लोक कायम सत्तेत तुमच्या आमच्यासारखे लोक कायम ढोर कष्ट करून मरावे हीच मानसिकत या लोकांची आहे. सर्वसामान्य माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही. ही आमची लोकशाही आहे.

कारण गरिबाला पाचशे हजाराचे आमिष दाखवून लोकशाहीला काळीमा फासला जात आहे. यात पैसे घेणारे तितकेच गुन्हेगार आहेत. सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवणे स्वप्नात सुद्धा विचार करत नाही. कारण याला जबाबदार सर्वसामान्य माणूसच आहे.

शेतकऱ्यांचे साखर कारखाने केव्हाच नेत्यांचे झाले, शेतकऱ्यांच्या बँका केव्हाच लुटल्या गेल्या. तरी आम्हाला आमच्या गुलामीची जाणीव होत नाही, आणि आम्ही शेतामध्ये विक्रमी उत्पादन काढण्याच्या नादात दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललो. परत आमची बँकेमध्ये कर्जासाठी अडवणूक केली जाते. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न कायम प्रश्नच राहतील, शेती उपयोगी प्रत्येक गोष्ट महाग आहे ही शेतकऱ्याची महागाई आज ही मीडिया कधीच दाखवत नाही. कारण येथे प्रत्येकाला शेतकऱ्यांना लुटून मोठं व्हायचं आहे. अनेक पिढ्या तुमच्या गुलामीत गेल्या अजूनही तुम्हाला स्वातंत्र्याचे अनुभूती नाही, अजूनही तुम्ही स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेलाच नाही, स्वातंत्र्य काय आहे याचा अनुभव अजूनही तुम्हाला नाहीच, अनुभव जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आजच आत्ताच आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला एकत्र व्हा नाहीतर काळ्या इंग्रजांचे गुलाम तर तुम्ही आहातच.

जमीन अधिग्रहण कायदा आवश्यक वस्तू कायदा कमाल जमीन धारणा कायदा परिशिष्ट 9 मुळे तुमची न्याय बंदी अडीचशे पेक्षा जास्त कायदे हे शेतकरी विरोधी कायदे आहेत हे जोपर्यंत नष्ट होत नाही. तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्याची पहाट अनुभवता येणार नाही.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका