राजकारण

सांगोला सूतगिरणीच्या चेअरमनपदी डॉ.प्रभाकर माळी

Spread the love

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला शेतकरी सह.सुतगिरणी चेअरमनपदी डॉ.प्रभाकर माळी व व्हा.चेअरमनपदी ऍड.नितीन गव्हाणे यांची सर्वानुमते निवड आली.

मागील काही दिवसांपूर्वी सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवड प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक बिनविरोध करण्यात शेतकरी कामगार पक्षाला यश आले होते. आज चेअरमन पदासाठीची निवड प्रक्रिया झाली. यामध्ये डॉ. प्रभाकर माळी यांची चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

व्हा.चेअरमनपदी ऍड.नितीन गव्हाणे यांची निवड करण्यात आली.

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह सर्व नेतेमंडळींनी नवनिर्वाचित चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले. डॉक्टर प्रभाकर माळी यांना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार क्षेत्रातील चांगला अनुभव आहे.

त्यांच्या या अनुभवाचा फायदा सूतगिरणीला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉक्टर प्रभाकर माळी यांनी दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या सहवासात अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांना सूतगिरणीच्या वाटचालीचा दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर सूतगिरणीची वाटचाल नेत्र दीपक होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे यांच्यासह दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. या निवडणुकीत राजकारण काय घडतंय याची तालुकावासियांना उत्सुकता लागली होती.

शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणूकीमध्ये ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले जात होते. मात्र निवडणूक बिनविरोध होताना मोठे राजकीय नाट्य घडले.

बिनविरोध करण्यात शेकाप यशस्वी
स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सूतगिरणीची प्रथमच निवडणूक होत असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जात होते. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या हयातीत अत्यंत सचोटीने ही सूतगिरणी चालविली. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी सामंजस्याने निवडणुका बिनविरोध केल्या. भाई गणपतराव देशमुख यांच्या शब्दाला किंमत होती.

त्यामुळे विरोधकही त्यांचा शब्द मानत होते. इतर ठिकाणच्या सूतगिरणी प्रमाणे या सूतगिरणीत टोकाचे राजकारण शिरू नये अशी त्यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांच्या या भूमिकेशी सहमत होऊन विरोधी पक्षाचे नेतेही निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करत होते. याही वेळी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बिनविरोध परंपरा अबाधित ठेवली आहे.

यंदा भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच ही निवडणूक घोषित झाली. नेहमीप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा ठेवून शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले.

एकूण 11 हजार 560 मतदार
सूतगिरणीच्या 11 हजार 560 सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी 7 हजार 93, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी 4 हजार 467 असे एकूण 11 हजार 560 सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदार संख्या 81 आहे.

१९८० साली उभारणी
भाई गणपतराव देशमुख यांनी शेतीबरोबरच परिसराच्या औद्योगिक विकासाकडेही अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले. सांगोल्यात १९८० साली ‘शेतकरी सहकारी सूतगिरणी उभारली. आज वार्षिक शंभर कोटी रु.हून अधिक उलाढाल करणारी ही सूतगिरणी भारतातच नव्हे तर जगातील सहकारातील एक आदर्श सूतगिरणी म्हणून ओळखली जाते.

चीन, बांगलादेश, इजिप्त, मलेशिया, इंडोनेशिया या देशात येथून सूत निर्यात केले जाते. महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या सहकारी सूतगिरण्यांची अवस्था विकलांग होत असताना आबासाहेबांनी स्थापलेली ही सूतगिरणी अतिशय उत्तम काम करत आहे. याचे कारण सहकारातील सर्व दोष टाळण्याला त्यांनी प्राधान्य दिले होते.

दिग्गज उमेदवारांची माघार
सलग 15 वर्षे सूत गिरणीचे चेअरमन राहिलेले नानासाहेब लिगाडे, माजी संचालक बाबुराव गायकवाड, शहाजीराव नलवडे, गोविंद जाधव, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, अंकुश येडगे या दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

दोघा डॉक्टर बंधूंचा लागला कस
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच या सूतगिरणीच्या निवडणुकीची प्रक्रिया झाली. भाई गणपतराव देशमुख हे हयात असताना त्यांचा शब्द विरोधकही मानत होते. त्यामुळे आजपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होत होती. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीला सामोरे गेला. भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षाची तसेच सूतगिरणीचे धुरा त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच डॉ. अनिकेत देशमुख सांभाळत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी या दोन्ही बंधूंना मोठी कसरत करावी लागली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका