सांगोला तालुक्यातील सर्वच पशुधनांना लसीकरण करावे : ॲड.सचिन देशमुख
सांगोला/ विशेष प्रतिनिधी
दुष्काळी सांगोला तालुका सध्या पशुधनामुळे तरलेला आहे. त्यातच याच पशूमध्ये सध्या लंपी स्किन या त्वचेच्या आजाराने थैमान घातले आहे. आपल्या सांगोला तालुक्यातही दोन गावामध्ये याचा प्रादुर्भाव झालेला आहे.तरी दोन गावापुरतेच लसीकरण न करता,तालुक्यातील दीड लाख पशूधनाना ही लस टोचली पाहिजे,असे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी वरिष्ठांकडे मागणी केली आहे.
राज्यात लंपी स्किनने थैमान घातले असले तरी,त्याचा प्रसार आपल्या सांगोला तालुक्यातही सुरू झालेला आहे. हाच प्रसार जागेवरच थोपावयाचा असेल तर,सर्वच जनावरांना लसीची टोचणी करणे क्रमप्राप्त आहे. खीलर गायी, बैल तसेच संकरित जनावरांमध्ये याचा प्रसार मोठा आहे.हाच लंपी म्हैशीमध्ये होतो.
सध्या दुधाला चांगला दर असल्याने,जनावरांच्या किमतीही भरमसाठ वाढलेल्या आहेत. अशातच त्वचेच्या अर्थात चर्म रोगाने हे पशुधन धोक्यात आले आहे. यावर लागण होवू नये म्हणून,इलाज भरपूर आहेत.पण पशुपालकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्या सांगोला तालुक्याबरोबर माळशिरस,दक्षिण सोलापूर सह काही तालुक्यात प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. प्रशासन ही लागण झालेल्या गावातच लसीकरण मोहीम राबवित राबवित आहे.तर 5 किलोमिटर चा भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करीत आहे. पण त्या संपूर्ण परिसरात लसिकरणाची मोहीम राबविली जात नाही.हे संपूर्णपणे चुकीचे आहे.
आता सांगोला तालुक्यातील 102 गावांमध्ये याच देवीच्या रोगाच्या लसीची टोचणी करण्यासाठी प्रशासनाला भाग पडणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी याच लसीची सेसमधून खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे.मग कोठे घोडे अडले आहे? प्रशासनाने त्याचा तात्काळ पुरवठा करावा. तालुक्यात 1 लाख 47 हजार 802 इतके पशुधन आहे.संपूर्ण तालुकाभर 24 सरकारी दवाखान्यांच्या माध्यमातून मोफत लसीकरण देण्यासाठी शासनाला भाग पडणार आहे.पशुपालकांनी घाबरून न जाता मोठ्या प्रमाणात हे लसीकरण करून घ्यावे.असेही आवाहन ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.
सांगोला तालुक्यातील पाचेगाव, महुद,कोला चिकमहूद,शिवणे आदी गावात 9 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग दक्ष झालेला आहेे.
आता यागावात लसीकरण मोहीम सुरू आहे.तरी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण सांगोला तालुक्यातच ही लसीकरणाची मोहीम राबवावी.यासाठी मी उद्या सीईओ यांना भेटणार आहे, असेही ॲड.देशमुख यांनी सांगितले.
पाहा खास व्हिडिओ